Nitin Desai Death: नितीन देसाई प्रकरणात मोठी अपडेट; मृत्यूच्या ५ दिवसांनी ‘या’ कंपनीच्या मालकाची चौकशी
Nitin Desai Death :प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई (Nitin Chandrakant Desai) यांच्या आत्महत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. आर्थिक विवंचनेत असताना कर्ज घेतलेल्या कंपनींकडून त्यांचा मानसिक छळ करण्यात आल्याचं स्पष्ट होत असल्याचे दिसत आहे. मृत्यूआधी त्यांनी रेकॉर्ड केलेल्या काही ऑडिओ क्लिप्समधून या धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. तसेच देसाई यांची पत्नी नेहा देसाई यांनी नवऱ्याच्या आत्महत्येप्रकरणी खालापूर पोलीस स्टेशनमध्ये (Khalapur Police Station) जबाब देखील नोंदवला आहे.
देसाई कुटुंबाची तक्रार आणि देसाई यांनी रेकॉर्ड केलेल्या ऑडिओनंतर पोलीस यंत्रणा चांगलीच कामाला लागली आहे. रायगड जिल्हा पोलीस हद्दीतील खालापूर पोलिसांनी आत्महत्येचा गुन्हा दाखल करून कसून चौकशीला सुरुवात केली आहे. ‘एडलवाईस’ या कंपनीच्या आर्थिक संचालकांची आज कसून चौकशी होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
नितीन देसाई आत्महत्या प्रकरणात खालापूर पोलिसांनी एडलवाईस कंपनीच्या आर्थिक संचालकांना चौकशीसाठी बोलावल्याचे सांगितले जात आहे. देसाई यांना कर्ज कोणत्या प्रक्रियेद्वारे देण्यात आले होते. यानंतर कर्ज वसूल करण्याची नेमकी प्रक्रिया हाती घेण्यात आली होती. तसंच एनसीएलटी म्हणजेच राष्ट्रीय कंपनी वाद न्यायालयामध्ये कशा स्वरूपात संपूर्ण खटला एडल्ट आर्थिक विभागाने चालविण्यात आला, त्याविषयीची सखोल चौकशी केली जात आहे.
नितीन देसाई यांनी आत्महत्येपूर्वी ज्या ऑडिओ रेकॉर्ड केले आहेत, त्यामध्ये त्यांनी एडलवाईस आर्थिक कंपनीने त्यांची कोणत्या पद्धतीने पिळवणूक केली, कर्जाचे पैसे वसूल करत असताना नियमबाह्य पद्धतीने त्यांना कसा त्रास देण्यात आला. या सर्व गोष्टी त्यांनी रेकॉर्ड करून ठेवल्या असल्याचे स्पष्ट होत आहे. याच माहितीच्या आधारे खालापूर पोलिसांनी एडलवाईस कंपनीवर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी आता ऍडलवाईस कंपनीच्या आर्थिक संचालकाची कसून चौकशी केली जात आहे.
माझ्या नवऱ्याने कष्टानं उभारलेला एनडी स्टुडिओ हडपण्यासाठी (Edelweiss) ऍडलवाईस कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून काही आश्वासने देण्यात आली होती. मोठं कर्ज देण्यात आले, परंतु कोरोना काळात संपूर्ण व्यवसाय ठप्प झाला होता. त्यावेळी कर्ज फेडण्यासाठी अनेक प्रकारे दबाव टाकण्यात आल्याचा आरोप नेहा देसाई यांनी तक्रारीमध्ये सांगितले आहे. नितीन देसाई यांनी त्यांच्या ऑडिओ क्लिपमध्ये ऍडलवाईस कंपनीच्या काही लोकांची नावे घेतली आहेत. ५ जणांमध्ये रशेष शहा, केयूर मेहता, स्मित शहा, आरके बन्सल आणि जितेंद्र कोठारी यांचे नावे समोर आली आहेत.