‘चिकीझिंग’ मध्ये गाण्यातून रंगणार मामाच्या गावाची सफर; 19 नोव्हेंबरला चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला…

Upendra Limaye : बालपणातील निरागस खोड्या, कल्पनाविश्वातील गमतीजमती, भीतीचे अनुभव आणि लहानग्यांच्या भावविश्वातील असंख्य रंग मोठ्या

  • shakir sayyad
  • Written By: Published:
Upendra Limaye

Upendra Limaye : बालपणातील निरागस खोड्या, कल्पनाविश्वातील गमतीजमती, भीतीचे अनुभव आणि लहानग्यांच्या भावविश्वातील असंख्य रंग मोठ्या पडद्यावर अनुभवण्याची संधी ‘चिकीझिंग’ या आगामी मराठी चित्रपटातून मिळणार आहे. बऱ्याच काळानंतर बालकांच्या भावविश्वाला केंद्रस्थानी ठेवणारा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत असल्याने या चित्रपटाबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. ग्रामीण जीवनाचा गंध, बालमनातील कल्पनांचे विश्व, खोडकरपणा आणि मनोरंजनाची धमाल यांची सांगड घालणाऱ्या या चित्रपटातील ‘चला चला मामाच्या गावाला…’ हे नवे गाणे व्हिडीओ पॅलेसच्या सहकार्याने प्रदर्शित झाले आहे. अभिनेते उपेंद्र लिमये यांच्या आवाजाने सजलेल्या या गाण्यात ग्रामीण बोलीचा खट्याळ बाज, मुलांच्या मनातील धाक आणि गमतीदार प्रसंगांची रंगत अनुभवायला मिळते. राजेंद्र बगाटे आणि वैभव कुलकर्णी यांच्या लेखन-दिग्दर्शनातून साकारलेला हा चित्रपट १९ नोव्हेंबरला चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे.

दीपक वाणी आणि जयप्रकाश भांडे प्रस्तुत या चित्रपटाची निर्मिती ए थीमटीम स्टुडिओ प्रॉडक्शनने कीफ्रेम प्रॉडक्शनच्या सहकार्याने केली आहे. सुप्रिया बगाटे यांनी निर्मितीची धुरा सांभाळली असून शब्बीर साबुवाला, रचना वोरा, हृषिकेश देशमुख, सिड विंचुरकर, करण चव्हाण आणि उमेश कुलकर्णी हे सहनिर्माते आहेत. राजेंद्र बगाटे आणि वैभव कुलकर्णी यांनी चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन केले आहे. ‘चला चला मामाच्या गावाला…’ या गाण्याचे खास आकर्षण म्हणजे उपेंद्र लिमये यांचा आवाज! केवळ सुरांतून शब्द गुंफण्यापुरते मर्यादित न राहता त्यांनी आवाजातील चढ-उतार, दरडावणीचा आविर्भाव, खट्याळ हास्य आणि विविध पात्रांच्या ढंगातील संवादफेक यांमधून गाण्याला जिवंत केले आहे. त्यांच्या आवाजातील नाट्यमयता गाण्याला जणू एखाद्या छोटेखानी गोष्टीचे रूप देते. सतीश तांदळे यांनी लिहिलेल्या या गीतात ग्रामीण बोलीचा अस्सल बाज, थेटपणा आणि खोडकर विनोद यांचा सुंदर मिलाफ साधला आहे. अभ्यासाकडे पाठ फिरवणाऱ्या एका खोडकर मुलाला धाक दाखवून शिस्त लावण्याच्या प्रसंगांची मांडणी रंजक शब्दांत करण्यात आली आहे. हृषिकेश कुलकर्णी यांच्या संगीताने या गाण्यातील नाट्याला सुरेल रंग चढवला आहे. वेगवान ठेका, बालगीतांचा गोडवा आणि भीतीदायक प्रसंगांनुसार बदलणारे पार्श्वसंगीत यांमुळे गाण्याची लय सतत बदलत राहते. ग्रामीण भागातील साधे घर, कौलारू घरे, मोकळी शेतं आणि निसर्गरम्य परिसर यांचा दृश्यरचनेत सुरेख वापर करण्यात आला आहे. ‘चिक्या’ची भूमिका साकारणाऱ्या बालकलाकार कृष्णराज वाईंगडे याने चेहऱ्यावरील भाव, मनातील धास्ती आणि निरागस खोडकरपणा यांचा सुंदर समतोल साधला आहे. स्वप्नातून दचकून जागे होण्यापासून ते आई आणि बहिणीशी होणाऱ्या संवादापर्यंत विविध प्रसंगांत सहज अभिनयाची झलक दिसते. कॅमेऱ्याचे विविध कोन ग्रामीण परिसराची भव्यता आणि मुलाच्या मनातील भीती एकाच वेळी प्रभावीपणे टिपतात.

दिवाळी विशेष भागात सोनाली कुलकर्णी येणार ‘कोण होणार करोडपती’च्या मंचावर; होणार मनोरंजनाची आतिषबाजी-

प्रभाकर मोरे, सेजल कोरे, अमृता सुरेश, गायत्री देशपांडे, आदित्य घनश्याम, राहुल कुलकर्णी, डॉ. सोनाली घाटणेकर आणि बालकलाकार कृष्णराज वाईंगडे यांच्या भूमिका चित्रपटातील व्यक्तिरेखांना अधिक समृद्ध करतात. प्रवीण सोनावणे यांनी छायांकनाची जबाबदारी सांभाळली असून शेखर गुरव आणि एस. शंकर यांनी संकलन केले आहे. श्रीनिधी व्यंकट आणि हृषिकेश कुलकर्णी यांच्या संगीताची जोड चित्रपटाला लाभली आहे. सुरेश कुंभार यांनी कला दिग्दर्शन आणि वेशभूषेची जबाबदारी समर्थपणे पेलली आहे. बालविश्वातील गंमत, ग्रामीण जीवनाचा गंध आणि कल्पनारम्य प्रसंगांची रंगत घेऊन येणारा ‘चिकीझिंग’ हा चित्रपट येत्या १९ नोव्हेंबरला चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे.

follow us