विविध राष्ट्रातील शिष्टमंडळाची दादासाहेब फाळके चित्रनगरीला भेट, केली भारतीय सिनेसृष्टीची सफर

Dadasaheb Phalke Cinema City : जागतिक स्तरावरील सर्जनशीलता वाव देत भारताला आशयनिर्मितीचे केंद्र बनवण्यासाठी मुंबईत आयोजित करण्यात आलेली वेव्हज शिखर परिषद (Waves Summit) सध्या सगळीकडे चर्चेचा विषय ठरली आहे. या शिखर परिषदेच्या निमित्ताने मुंबईत आलेल्या आंतरराष्ट्रीय पाहूण्यांनी शनिवारी दादासाहेब फाळके चित्रनगरीला भेट देत भारतीय सिनेसृष्टीविषयी सविस्तर माहिती घेतली.
वेव्हज शिखर परिषदेकरिता भूतान, म्यानमार, कझाकिस्तान, आफ्रिका, मेक्सिको, मोरोक्को, मलेशिया, श्रीलंका, टांझानिया, तुर्कमेनिस्तान, ब्राझील, उझबेकिस्तान यांसह विविध देशातील शिष्टमंडळ मुंबई दौऱ्यावर आहेत. या शिष्टमंडळातील सदस्यांनी शनिवारी खास दादासाहेब फाळके चित्रनगरीला भेट दिली. यावेळी त्यांचा महामंडळाचे सह व्यवस्थापकीय संचालक प्रशांत साजणीकर यांच्या हस्ते यथोचित सन्मान करून त्यांना भारतीय चित्रपटांसह येथील मनोरंजन उद्योगाची माहिती देण्यात आली.
भारत हा जगातील सर्वाधिक चित्रपट निर्मिती करणारा देश आहे, मुंबई ही भारतीय चित्रपटसृष्टीची जन्मभूमी. यावेळी भारतात निर्माण होणाऱ्या चित्रपटांची कार्यपद्धत शिष्टमंडळाने जाणून घेतली. इथे येऊन भारतीय चित्रपटांचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दादासाहेब फाळके चित्रनगरीला भेट देणे ही आमच्यासाठी अतिशय महत्वाची संधी होती असे मत यावेळी पाहुण्यांनी व्यक्त केले.
पर्यटन, कला आणि टेक्नॉलॉजीचे दर्शन महाराष्ट्रच्या स्टॉलवर, पाहण्यासाठी लोकांची गर्दी…
याप्रसंगी मुख्य प्रशासकीय अधिकारी गीता देशपांडे, वित्तीय सल्लागार तथा मुख्यलेखा वित्त अधिकारी चित्रलेखा खातू रावराणे, उप अभियंता (स्थापत्य) विजय बापट, व्यवस्थापक कलागरे संतोष खामकर यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते.