पितृसत्ताक व्यवस्थेमुळेच हवामान बदल, दिया मिर्झाच्या वक्तव्यावरून सोशल मीडियात वाद; अभिनेत्रीने दिले स्पष्टीकरण

हवामान बदल आणि पर्यावरणीय संकटासाठी पितृसत्ताक व्यवस्थेला जबाबदार धरणाऱ्या तिच्या विधानावरून सोशल मीडियावर मोठा वाद निर्माण झाला आहे.

  • Written By: Published:
Untitled Design 8

Dia Mirza’s statement sparks a controversy on social media : बॉलिवूड अभिनेत्री आणि पर्यावरणप्रेमी दिया मिर्झा सध्या तिच्या एका वक्तव्यामुळे चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे. हवामान बदल आणि पर्यावरणीय संकटासाठी पितृसत्ताक व्यवस्थेला जबाबदार धरणाऱ्या तिच्या विधानावरून सोशल मीडियावर मोठा वाद निर्माण झाला आहे. अनेकांनी तिच्या मतावर टीका केली असून, वाढत्या वादानंतर दियाने स्वतः सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

अभिनेत्री असण्यासोबतच दिया मिर्झा ही युनायटेड नेशन्स एन्व्हायर्मेंट प्रोग्रॅम अर्थात UNEP ची गुडविल अँबेसिडर म्हणून देखील कार्यरत आहे. नुकतीच ती अभिनेत्री सोहा अली खान हिच्या पॉडकास्टमध्ये सहभागी झाली होती. यावेळी हवामान बदल आणि पर्यावरणीय संकटावर चर्चा करताना दियाने एक महत्वपूर्ण विधान केले. दियाच्या मते, हवामान बदलला कारणीभूत ठरणाऱ्या अनेक धोरणांमध्ये आणि निर्णयप्रक्रियेत पुरुषप्रधान व्यवस्थेचा मोठा प्रभाव राहिला आहे. चर्चेदरम्यान सोहा अली खानने पुरुषी अहंकार हा मुद्दा उपस्थित केला.

त्यावर प्रतिक्रिया देताना दियाने सांगितले की, जगभरातील अनेक शोषणकारी आणि वर्चस्ववादी व्यवस्था पर्यावरणीय हानीसाठी जबाबदार आहेत आणि व्यवस्थांचे नेतृत्व बहुतांश वेळा पुरुषांकडे राहिले आहे. दियाच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या. अनेक युजर्सनी तिच्या विधानाला पुरुषांविरोधातील भूमिका असल्याचे म्हणत तिच्यावर टीका केली. काहींनी हवामान बदलासारख्या जागतिक समस्येला लिंगभेदाच्या चौकटीत बसवणे चुकीचे असल्याचे मत व्यक्त केले. मात्र वाढत्या ट्रोलिंगनंतर दियाने सोशल मीडियावर सविस्तर पोस्ट शेअर करत आपली भूमिका स्पष्ट केली.

दिल्लीतील महत्त्वाच्या बैठकीला गैरहजर राहिलेल्या 6 खासदारांना ठाकरे गटाचा दणका; पक्षाकडून कारणे दाखवा नोटीस

तिने म्हटले की, हवामान बदल हे केवळ पर्यावरणीय संकट नसून ते सामाजिक, आर्थिक आणि संरचनात्मक असमानतेशीही जोडलेले आहे. शतकानुशतके निसर्गाकडे केवळ संसाधन किंवा साधन म्हणून पाहण्याच्या वृत्तीमुळे आजची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. दियाने पुढे नमूद केले की, हवामान बदलाचे परिणाम सर्वप्रथम आणि सर्वाधिक प्रमाणात महिला आणि मुलींना भोगावे लागतात. पाणीटंचाई, अन्नसुरक्षेचा प्रश्न, विस्थापन, उपजीविकेचे नुकसान आणि आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांचा महिलांवर अधिक परिणाम होतो. असे असतानाही पर्यावरणविषयक निर्णयप्रक्रियेत महिलांचा सहभाग अजूनही मर्यादित असल्याकडे तिने लक्ष वेधले.

दरम्यान, दियाच्या या स्पष्टीकरणानंतरही तिच्या वक्तव्यावरून सोशल मीडियात चर्चा आणि वाद कायम असून, हवामान बदलासारख्या जागतिक प्रश्नांकडे पाहण्याच्या विविध दृष्टिकोनांवर पुन्हा एकदा मोठी चर्चा सुरू झाली आहे.

follow us