‘धर्म बघून अन्नदान करणाऱ्या…’, शाहरुख खानबद्दलची किरण मानेंची पोस्ट व्हायरल
Kiran Mane On Shahrukh Khan : आज बॉलीवूडचा बादशहा म्हणून ओळखला जाणारा शाहरुख खानचा (Shahrukh Khan) वाढदिवस. शाहरुख खान आज आपला 59 वा वाढदिवस साजरा करत आहे. त्याच्या घराबाहेर चाहत्यांची मोठी गर्दी जमली आहे. संपूर्ण जगभरातून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे. यातच मराठी कलाकार किरण माने (Kiran Mane) यांनी देखील शाहरुखला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहे. त्यांनी फेसबुकवर (Facebook) एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी शाहरुखच्या समाजकार्यावर भाष्य केलं आहे. सध्या किरण माने यांची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
किरण मानेंनी या पोस्टमध्ये लिहिले आहे की, ॲसिड ॲटॅक झालेल्या महिलांवर उपचार करणं, त्यांच्या विद्रुप झालेल्या चेहर्यावर स्वखर्चानं प्लॅस्टिक सर्जरीसारखी महागडी ऑपरेशन्स करणं, त्यांच्यावर मानसिक उपचार करुन त्यांच्या मनाला उभारी देणं आणि त्यांना स्वत:च्या पायांवर उभं रहाण्यासाठी सगळी आर्थिक मदत करणे. ही सगळी कामं तो गेली कित्येक वर्ष करतोय ! आपल्या आईवडिलांच्या आठवणीसाठी नानावटी हॉस्पिटलमध्ये त्यानं लहान मुलांच्या कॅन्सरवरच्या उपचारांसाठी एक वाॅर्ड उभा केलाय, ज्यासाठी तो सतत मोठ्ठी आर्थिक मदत करत असतो.
2012 साली त्यानं देशभरातली बारा खेडेगांवं दत्तक घेतली. तिथं स्वखर्चानं वीज-पाणी-शाळा आणि औषधं अशा सुविधा उपलब्ध करून देण्याचं काम त्यानं केलं. अजूनही तिथं नवनविन सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याचं काम तो आजतागायत करतोय! 2008 साली बिहार पूरग्रस्तांच्या मदतीसाठी त्यानं जगभर लाईव्ह काॅन्सर्टस् करून तीस दशलक्ष रूपये जमा करुन दिले! 2015 मध्ये चेन्नई पूरग्रस्तांसाठी एक कोटी रूपये, 2013 मध्ये उत्तराखंड पूरग्रस्तांसाठी तेहेतीस लाख रूपये तर डाॅ. मनमोहन सिंग यांच्या ‘त्सुनामी रिलिफ फंड’साठी पंचवीस लाख रुपये त्यानं स्वत:च्या खिशातून दिले. एक पत्रकार त्याची मुलाखत घेऊन परत जात असताना, त्या पत्रकाराचा ॲक्सीडेंट झाला. तो गंभीर जखमी झाला. मृत्यूशी झुंज सुरू झाली. अशावेळी त्या पत्रकाराचा बरा होईपर्यंत सगळा हाॅस्पीटल खर्च त्यानं उचलला, जो दर दिवशी दोन लाख रूपये होता.
भारतभरातल्या झोपडपट्ट्यांमधल्या लहान मुलांच्या छोट्या-मोठ्या इच्छा-स्वप्न पूर्ण करणाऱ्या या ‘मेक अ विश फाऊंडेशन’ या समाजसेवी संस्थेबरोबर तो काम करतो! 2009 मध्ये ओरीसामधल्या सात खेडेगांवांमध्ये त्यानं स्वखर्चानं सोलर इलेक्ट्रिसिटी प्रोजेक्ट सुरू केले. ज्यामुळे स्वातंत्र्यानंतर तब्बल 61 वर्षांनंतर त्या गांवांमध्ये ‘लाईटस्’ आले. आयपीएल सिझन सात मध्ये त्याची टीम विजेता ठरली. बक्षिस म्हणून पंधरा कोटी रूपये मिळाले. ती सगळीच्या सगळी रक्कम त्यानं मुंबई आणि कलकत्त्यामधील गरीब कॅन्सर पेशंटस् वरील उपचारांसाठी दान करून टाकली!
महाराष्ट्रातल्या आत्महत्या केलेल्या शेतकर्यांच्या कुटूंबीयांसाठी त्यानं जगभर काॅन्सर्ट करुन कोट्यावधी रुपये उभे केले तर इंडियन आर्मीमधील जवानांसाठी सात कोटी रूपये दिले. कोरोनाकाळात त्यानं स्वत:चं चार मजली ऑफीस बीएमसी ला दिलं. लाॅकडाऊनमध्ये मुंबईत 1000 गरीब कुटूंबांना तेल, पीठ, तांदूळ, डाळ इत्यादी सामान पुरवलं. अगदी हातावर पोट असलेल्या 200 लोकांना रोज ताजं अन्न दिलं. बंगालमधल्या अतिशय दुर्गम खेड्यापाड्यांमध्ये जाऊन राशन आणि सॅनिटायझर पुरवले.
शाहरूखच्या समाजकार्याबद्दल काय काय सांगू? मी लिहीत जाईन पण तुम्ही वाचून वाचून थकून जाल. त्याच्याविषयी कुणी कितीही अफवा पसरूद्यात. कुणी म्हणेल पाकिस्तानला त्यानं ह्यॅव दिलं आणि त्यॅव दिलं. सगळ्या थापा आहेत हो. अहो, अन्नदान करतानासुद्धा धर्म बघून करणाऱ्या त्या दळभद्र्या जमाती… त्यांना ‘द ग्रेट शाहरूख खान’ कसा झेपणार? त्यांनी कितीही ट्रोल केलं तरी सगळ्या जगात शाहरूखनं भारतीय कलाकारांचा सन्मान वाढवलाय हे सत्य लपणार नाही ! त्यानं केलेल्या समाजोपयोगी कार्यासाठी त्याला जर्मनीमध्ये झालेल्या 20 व्या युनेस्को अवाॅर्डस्मध्ये स्पेशल अवाॅर्ड देऊन सन्मानित करण्यात आलंय.
जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराची मोठी कारवाई, दिवाळीत दहशत माजवण्याचा कट फसला
साऊथ कोरीयानं त्याला ‘गुडविल ॲम्बॅसीडर’ म्हणून सन्मानित केलंय. इंग्लंडमधल्या सर्वात मोठ्या ‘लाॅ युनिव्हर्सिटी‘तर्फे त्याला ह्यूमन राईटस् आणि ॲक्सेस टू जस्टिस ॲन्ड क्राईम मधील कार्यासाठी स्पेशल डाॅक्टरेट देण्यात आलीय.तो फक्त अभिनयातला बादशाह नाही, तर ‘माणूस’ म्हणून सुद्धा किंग आहे! सलाम शाहरुख खान… कडकडीत सलाम !! कुठल्याही सच्च्या भारतीयाला तुझा अभिमानच वाटेल.. आज तू साठाव्या वर्षात पाऊल ठेवतोयस. तुला वाढदिवसाच्या मनाच्या तळापास्नं शुभेच्छा असं किरण मानेंनी या पोस्टमध्ये लिहिले आहे.