Kiran Mane: ‘तर मी दुकानाचं शटर ओढलं’, लेकीसाठी किरण मानेंची खास पोस्ट…

Kiran Mane: ‘तर मी दुकानाचं शटर ओढलं’, लेकीसाठी किरण मानेंची खास पोस्ट…

प्रेरणा जंगम

Kiran Mane: ‘मुलगी झाली हो’ या मालिकेतून अभिनेता किरण माने लोकप्रिय झाला आहे. नाटक, मालिका, चित्रपटांमधून अनेक वर्षे काम करत असताना ‘मुलगी झाली हो’ (Mulgi Zali Ho) या मालिकेतील किरण मानेंनी साकारलेली वडिलांची भूमिका पसंत केली. मात्र या मालिकेतून त्यांना निघावं लागलं. ही मालिका प्रसारित होत असलेल्या वाहिनीसोबत किरण माने यांचा वाद समोर आला. त्यानंतर मात्र बिग बॉस मराठीच्या (Bigg Boss Marathi) चौथ्या सिझनमध्ये किरण माने झळकले आणि पुन्हा एकदा लोकप्रियता मिळाली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kiran Mane (@kiranmaneofficial)


या सगळ्यात किरण माने सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असतात. याच सोशल मिडीयावर (Social media) आपल्या मुलीसाठी (Eesha Mane ) खास पोस्ट किरण माने यांनी लिहीली आहे. किरण माने यांची मुलगी ईशाच्या वाढदिवसानिमित्त ही पोस्ट करण्यात आली आहे. ज्यात मुलीसाठी अभिनय क्षेत्र कस सुरु ठेवलं याबाबत ते लिहीतात. ते लिहीतात की, “तो दिवस अजून आठवतोय. स्कूटरवरून माझ्या इंजिन ऑईलच्या दुकानात जाता-जाता हॉस्पीटलमध्ये थांबलो. माझी एक दिवसाची छोटी छकुली हातात घेतली… गोड हसली माझ्याकडं बघून… मनात विचार आला ही मोठी झाल्यावर “तुझे बाबा काय करतात?” या प्रश्नाचं काय उत्तर देईल?


म्हणेल,”ते दुकानदार आहेत. ऑईल, स्पेअरपार्टस् विकतात.” माझ्या अंगावर सर्रर्रर्रकन काटा आला ! म्हन्लं नाय नाय नाय नाय… मला ही ओळख नको. दुकानदारी करणं वाईट नाही… पण माझी पॅशन, माझा श्वास, माझ्या रक्तात ‘अभिनय’ आहे. कितीही संकटं येऊदेत. काहीही होऊदेत. जग इकडचं तिकडं होऊदेत. मला अभिनय करत रहाण्याचा आनंद घ्यायचाय. माझ्या पोरीनं कधीही अभिमानानं सांगीतलं पायजे “माझे बाबा ॲक्टर आहेत.”

ते पुढे लिहीतात की, “अस्वस्थ झालो… सैरभैर अवस्थेत स्कूटर काढली… स्कूटर तिरकी करून दहा किका मारल्याशिवाय स्टार्ट होत नव्हती… विचारात असल्यामुळं किक मारताना पाय सटकून नडगीवर दणका बसला…खण्ण्णकन. मेंदूत कळ गेली. पण दुर्लक्ष केलं. कारण त्यापेक्षा काळजातली उलघाल जास्त जीवघेणी होती. दुकानात येऊन बसलो. मनात तेच विचार… मला अभिनेता म्हणून जगायचंय… ही दुकानदारी, ही हिशोबाची वही, हा गल्ला, हे माझं जग नाही. सगळ्या ऑईलच्या कॅन्समध्ये मी गुदमरून चाललोय असा भास व्हायला लागला…

त्याचदिवशी मी पेपरात जाहिरात बघितली: ‘पं. सत्यदेव दूबे यांची पुण्यात अभिनय कार्यशाळा’… तो किस्सा मी यापूर्वी पोस्टमधून लिहीलाय. खूप व्हायरल ही झालाय. पण त्या आधीची ही गोष्ट खूप कमी लोकांना माहीतीये……तर मी दुकानाचं शटर ओढलं आणि दूबेजींकडे जाऊन अभिनयाचा ध्यास घेतला. बेभरवशाचं क्षेत्र निवडल्यामुळं लै ओढाताण झाली. पैशाची कायम चणचण. घरातलं टेन्शन तर स्ट्रगलर्सच्या पाचवीला पुजलेलं. रोजचे खर्च भागवणं मुश्कील असायचं. पण कुणी विचारल्यावर लहानगी ईशा जेव्हा बोबड्या पण खणखणीत आवाजात सांगायची ना, “माजे बाबा ॲक्टल आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kiran Mane (@kiranmaneofficial)


“…तेव्हा लै लै लै भारी वाटायचं मला. सगळा ताण निवळून जायचा. आज तिला बघितलं की लोक म्हणतात, “ही ईशा, ॲक्टर किरण मानेंची मुलगी.” ईशाला ते रोजचं सवयीचं झालंय… पण मी जेव्हा-जेव्हा ऐकतो, तेव्हा मी आतून खूप सुखावतो. वाढदिवसाच्या मनभरून शुभेच्छा ईशा… तू माझ्या आयुष्यात बहार घेऊन आलीयेस… तुला आयुष्यात जे पायजे ते भरभरून मिळो… खूप आनंदी रहा, हसतमुख रहा… तुझ्या प्रत्येक निर्णयात तुझा बाप पहाडासारखा तूझ्या पाठीशी उभा राहिल. लब्यू.”

राखी सावंतच्या भावाला मुंबई पोलिसांकडून अटक, 22 मे पर्यंत कोठडीत रवानगी

अशी ही भावुक पोस्ट किरण माने यांनी मुलीसाठी लिहीली आहे. किरण माने यांची मुलगी ईशाला देखील अभिनयात रस आहे. बिग बॉस मराठीच्या फॅमिली एपिसोडमध्ये ती आई आणि भावासोबत दिसली होती. मुलगी ईशा, पत्नी आणि लहान मुलगा असा किरण मानेंचा परिवार आहे. या पोस्टसह त्यांनी खास फॅमिली फोटो देखील सोशल मिडीयावर शेयर केला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube