जलसंपदा विभागाचे तत्कालीन अभियंता विजय पांढरे यांचा अजित पवारांच्या आरोपांवर गंभीर खुलासा
अजित पवार हे स्वतः त्यांच्या तोंडाने जलसंपदा खात्यातील घोटाळ्याची कबुली देत असल्याचा आरोप पांढरे यांनी केला आहे.
Then engineer Vijay Pandhare’s serious revelation on Ajit Pawar’s allegations : पुरंदर सिंचन घोटाळ्याबाबत जलसंपदा विभागाचे तत्कालीन अभियंता विजय पांढरे यांनी गंभीर खुलासा केला आहे. अजित पवार हे स्वतः त्यांच्या तोंडाने जलसंपदा खात्यातील घोटाळ्याची कबुली देत असल्याचा आरोप पांढरे यांनी केला आहे. अजित पवारांनी युती सरकारच्या काळाचा संदर्भ देत 1996-97 मध्ये सरकार सत्तेत आल्यानंतर कृष्णा खोरे महामंडळ सुरू झाल्याचं सांगितलं आहे. पुरंदरमधील सिंचन योजना ही कृष्णा खोरे महामंडळाअंतर्गतच येते. मात्र, पांढरे यांच्या म्हणण्यानुसार कृष्णा खोऱ्यात सुरू झालेल्या केवळ एक-दोनच नव्हे, तर अनेक योजनांमध्ये अशाच प्रकारचे गैरव्यवहार झाले आहेत.
अजित पवार हे या घोटाळ्याचा आकडा सुमारे 100 कोटी रुपये असल्याचं सांगत असले, तरी प्रत्यक्षात हा घोटाळा हजारो कोटींचा असल्याचा आरोप विजय पांढरे यांनी केला आहे. भाजपने या भ्रष्टाचाराचा पाया घातला, तर त्यावर भ्रष्टाचाराची इमारत उभारण्याचं काम अजित पवारांनी केलं, असा घणाघाती आरोप त्यांनी केला. आजपर्यंत जलसंपदा खातं बहुतांश काळ अजित पवारांकडेच राहिलं आहे. सत्ताधारी आणि विरोधक, सगळेच या भ्रष्टाचारात सामील असून, एकमेकांचे घोटाळे झाकण्याचं काम राजकीय पातळीवर केलं जात असल्याचा आरोपही पांढरे यांनी केला आहे. अजित पवारांचा भ्रष्टाचार फडणवीस आणि मोदी सरकारने झाकल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.
‘हे सगळे मांडीला मांडी लावून बसलेले असून, ही लुटारूंची टोळी आहे,’ अशा शब्दांत त्यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली. या प्रकरणी आपण सचिव आणि राज्यपालांना पत्र दिली असून, त्यानंतर चितळे समितीची स्थापना झाली. या समितीने देखील अहवाल सादर केला असल्याचं त्यांनी सांगितलं.
25 वर्षांनंतर अजित पवारांनी हा घोटाळा बाहेर काढणं हे केवळ राजकारणाचा भाग असून, भाजप आणि अजित पवार दोघेही एकमेकांपासून पस्तावले असल्यामुळेच हे आरोप-प्रत्यारोप सुरू असल्याचं पांढरे यांनी म्हटलं. ’70 वर्षांत काँग्रेस सरकारने जितका भ्रष्टाचार केला नसेल, त्याहून अधिक भ्रष्टाचार भाजपने मागील 10 वर्षांत केला आहे,’ असा आरोप करत हा एकटाच घोटाळा नसून, राज्यातील अनेक ठिकाणी अशाच पद्धतीने खर्च वाढवून मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचं त्यांनी सांगितलं. हे सर्व चितळे समितीच्या अहवालात नमूद असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
पुरंदर सिंचन घोटाळ्यापेक्षा देखील मोठे घोटाळे राज्यात झाले असून, महामार्गांच्या कामांमध्ये सिंचन घोटाळ्यांपेक्षा मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोपही त्यांनी केला. अजित पवारांना स्वतःला आपण काय केलं आहे याची पूर्ण जाणीव असल्यामुळेच ते निवृत्त अधिकाऱ्यांची नावे घेत नाहीत, असं म्हणत या घोटाळ्याशी अजित पवारांचा थेट संबंध असल्याचा आरोप विजय पांढरे यांनी केला आहे. या सर्व घोटाळ्यांमध्ये अधिकारी, मंत्री आणि कंत्राटदार एकत्र येऊन महाराष्ट्राला लुटत असल्याचा गंभीर आरोप करत, आतापर्यंतच्या सर्व घोटाळ्यांची यादी आपण देऊ शकतो, असंही विजय पांढरे यांनी स्पष्ट केलं आहे.
