स्टार प्रवाहवरून बंद झालेली ‘मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले’ आता युट्यूबवर; अमोल कोल्हेंची मोठी घोषणा

Mee Savitribai Jyotirao Phule ही ऐतिहासिक मालिका गेल्या काही दिवसांपासून चर्चेत होती आता नव्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Savitribai Jotirao Phule

‘Mee Savitribai Jyotirao Phule’, Marathi Serial ended on Star Pravah now coming to YouTube Amol Kolhes major announcement : मराठी दूरचित्रवाणी विश्वात गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेली ‘मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले’ ही ऐतिहासिक मालिका आता नव्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. स्टार प्रवाह वाहिनीवरून ही मालिका अचानक बंद करण्यात आल्यानंतर प्रेक्षकांमध्ये मोठी नाराजी व्यक्त होत होती. मात्र मालिकेचे निर्माते आणि खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी आता या मालिकेच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी दिली आहे. ही मालिका आता युट्यूबवर प्रदर्शित केली जाणार असून 20 जूनपासून तिचा नवा प्रवास सुरू होणार आहे.

टीआरपीच्या कारणावरून मालिका बंद

सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुले यांच्या सामाजिक कार्यावर आधारित असलेल्या या मालिकेला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत होता. स्त्री शिक्षणासाठी सावित्रीबाईंनी केलेला संघर्ष, समाजातील रूढी-परंपरांविरुद्ध उभारलेला लढा, भिडे वाड्यात सुरू झालेली भारतातील पहिली मुलींची शाळा आणि क्रांतीगुरु लहुजी वस्ताद यांचे योगदान या मालिकेत प्रभावीपणे साकारण्यात आले होते.मात्र अपेक्षित टीआरपी मिळत नसल्याचे कारण देत स्टार प्रवाहने ही मालिका केवळ 152 भागांमध्येच संपवण्याचा निर्णय घेतला. या निर्णयावर प्रेक्षक, सामाजिक कार्यकर्ते तसेच विविध राजकीय नेत्यांनीही आक्षेप नोंदवला होता.

अमोल कोल्हेंची भावनिक प्रतिक्रिया

मालिका बंद झाल्यानंतर डॉ. अमोल कोल्हे यांनी सोशल मीडियावरून आणि पत्रकार परिषदेतून आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांनी सांगितले की, ही केवळ मालिका नसून महाराष्ट्राच्या सामाजिक परिवर्तनाचा इतिहास आहे. त्यामुळे हा प्रवास इथेच थांबू देणार नाही.यावेळी कोल्हे म्हणाले, “तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने हे शिवधनुष्य उचलतोय. महाराष्ट्राचा डीएनए हा रडणारा नाही, लढणारा आहे. त्यामुळे ही मालिका नव्या माध्यमातून पुन्हा प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा निर्णय घेतला आहे.”

20 जूनपासून युट्यूबवर प्रीमियर

डॉ. अमोल कोल्हे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले’ ही मालिका 20 जून 2026 रोजी संध्याकाळी 6 वाजता युट्यूबवर प्रीमियर होणार आहे.ही मालिका मराठी वारसा या युट्यूब चॅनेलवर प्रदर्शित केली जाणार आहे. त्यामुळे टीव्हीवरून मालिका बंद झाल्यानंतरही प्रेक्षकांना ती पाहण्याची संधी उपलब्ध होणार आहे.

मराठी मनोरंजन क्षेत्रातील अनोखा प्रयोग

डॉ. अमोल कोल्हे यांच्या मते, मराठी मनोरंजन विश्वात एखादी लोकप्रिय मालिका टीव्ही वाहिनीवरून बंद झाल्यानंतर थेट युट्यूबवर नव्या स्वरूपात सुरू करण्याचा हा पहिलाच प्रयोग आहे.याबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, “हा आपला इतिहास आहे, आपला अभिमान आहे. तो त्याच दिमाखात लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे. म्हणून हा प्रयोग करण्याचा निर्णय घेतला आहे.”

प्रेक्षकांकडून सकारात्मक प्रतिसादाची अपेक्षा

मालिका बंद झाल्यानंतर सोशल मीडियावर #MeSavitribaiJyotiraoPhule हा विषय मोठ्या प्रमाणात ट्रेंड झाला होता. अनेकांनी ऐतिहासिक आणि सामाजिक आशय असलेल्या मालिकांना टीआरपीच्या निकषावर मोजू नये, अशी भूमिका मांडली होती. अशा परिस्थितीत युट्यूबवरील पुनर्प्रसारणामुळे मालिकेला नव्या पिढीपर्यंत पोहोचण्याची संधी मिळणार आहे.सावित्रीबाई फुले यांच्या प्रेरणादायी जीवनकार्याचा वारसा अधिक व्यापक पातळीवर पोहोचवण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा मानला जात असून, 20 जूनपासून प्रेक्षक या मालिकेचा पुन्हा एकदा आनंद घेऊ शकणार आहेत.

follow us