… तर काचा फुटणार, मल्टीप्लेक्स मालकांना मनसे चित्रपट प्रमुख अमेय खोपकरांचा इशारा

Ameya Khopkar : राज्यात गेल्या काही दिवसांपासून हिंदी- मराठी भाषेवरुन जोरदार राजकारण पाहायला मिळत आहे. विद्यार्थ्यांवर हिंदी सक्ती नको या मागणीसाठी मनसेकडून (MNS) आक्रमक भूमिका घेण्यात येत आहे. तसेच राज्य सरकारविरोधात आंदोलन देखील करण्यात येत आहे. तर आता हाच वाद सिनामागृहात देखील पोहचला आहे. मनसेच्या चित्रपट सेनेचे प्रमुख अमेय खोपकर (Ameya Khopkar) यांनी मल्टीप्लेक्स मालकांना इशारा दिला आहे. सैयारा (Saiyara) या चित्रपटाला मल्टीप्लेक्स मालकांनी जास्त स्क्रीन दिले असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. अमेय खोपकर आज माध्यमांशी बोलत होते.
पत्रकार परिषदेमध्ये बोलताना मनसे चित्रपट सेनेचे प्रमुख अमेय खोपकर यांनी मराठी सिनेमा ‘येरे येरे पैसा 3’ (Yere Yere Paisa 3) च्या स्क्रिन्स कमी करण्यात येत असल्याचा आरोप केला आहे. तसेच माझ्या चित्रपटासाठी मी आंदोलन करणार नाही मात्र इथून पुढे काचा फुटणार असा इशारा देखील त्यांनी मल्टीप्लेक्स मालकांना दिला. मराठी सिनेमासाठी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलेल्या पाठराखणीसाठी त्यांनी त्यांचे आभार मानले आहे तर मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली आहे.
पत्रकार परिषदेमध्ये बोलताना अमेय खोपकर म्हणाले की, ये रे ये रे पैसा 3 ला चांगला प्रतिसाद मिळत आहे आणि त्याच दिवशी सैय्यारा चित्रपटही प्रदर्शित झाला त्यालाही प्रतिसाद मिळाला आहे. मात्र दुसऱ्या आठवड्यात थिएटरमध्ये ये रे ये रे पैसा 3 ला अक्षरशः एकही शो दिलेला नाही असा आरोप पत्रकार परिषदेमध्ये बोलताना अमेय खोपकर यांनी केला. तर हा माझ्यावर असलेला राग मल्टीप्लेक्स वाल्यांनी काढला आहे. माझ्या चित्रपटासाठी मीच आंदोलन करावे असे मला वाटत नाही मात्र इथून पुढे मल्टीप्लेक्सच्या काचा फुटतील असा इशारा देखील त्यांनी दिला.
तर दुसरीकडे संजय राऊतांनीही पक्ष न बघता मराठी चित्रपटासाठी ट्विट केलं आणि सुशांत शेलारांनीही पाठराखण केली यासाठी अमेय खोपकर यांनी त्यांचे आभार मानले. तर ज्यांच्यासाठी मी आजवर उभा राहिलो, त्यांच्यासाठी केसेस अंगावर घेतल्या ते आज एक शब्द बोलत नाही असा टोला मराठी कलाकारांना अमेय खोपकर यांनी लावला. जेव्हा स्वतःच्या चित्रपटाला थिएटर मिळत नाही तेव्हा शिवतीर्थवर येता आज तुम्ही एका शब्दानंही बोलत नाही. अशी टीका देखील त्यांनी मराठी कलाकांरवर केली .
नितेश राणेंना प्रत्युत्तर
मराठी चित्रपट थिएटरमध्ये लागावा याकरता सरकारकडे विनंती करावी लागत असेल तर हेच दूर्देव आहे. नितेश राणेंची ही कुठली भाषा झाली. तुम्ही सरकारकडे या मग आम्ही बघु, मी काही सरकारदरबारी वगैरे जाणार नाही. असं या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना मनसे चित्रपट सेनेचे प्रमुख अमेय खोपकर म्हणाले.
कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, EPFO मध्ये मोठा बदल, नॉमिनीला मिळणार 50,000 रुपये
काय म्हणाले होते नितेश राणे?
या प्रकरणात बोलताना मंत्री नितेश राणे म्हणाले की, आम्ही बोलतो डिस्ट्रिब्युटर्सला, त्यांना आम्ही स्क्रीन मिळवून देतो. त्यांनी सरकारकडे यावं सरकार त्यांना मदत करेल. असं माध्यमांशी बोलताना मंत्री नितेश राणे म्हणाले होते.