श्री सिद्धिविनायकाच्या आशीर्वादाने ‘निर्धार’ चित्रपटाचे कुतूहल जागवणारे फर्स्ट लूक पोस्टर प्रदर्शित…

Nirdhar Movie : आजवर बऱ्याच मराठी चित्रपटांनी समाजाला आरसा दाखवण्याचं काम केलं आहे. समाजात घडणाऱ्या घटनांचे प्रतिबिंब नेहमीच रुपेरी पडद्यावर

  • Written By: Published:
Nirdhar Movie

Nirdhar Movie : आजवर बऱ्याच मराठी चित्रपटांनी समाजाला आरसा दाखवण्याचं काम केलं आहे. समाजात घडणाऱ्या घटनांचे प्रतिबिंब नेहमीच रुपेरी पडद्यावर उमटल्याचे पाहायला मिळाले आहे. याद्वारे काही चित्रपटांनी समाजाला नवी दिशा देण्याचेही काम केले आहे. याच वाटेवरील ‘निर्धार’ हा आगामी मराठी चित्रपट येत्या 28 नोव्हेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक मंदिरामध्ये गणरायाच्या आशीर्वादाने ‘निर्धार’ चित्रपटाचे कुतूहल जागवणारे पहिले पोस्टर प्रदर्शित करण्यात आले. याप्रसंगी श्री सिद्धिविनायक मंदिर विश्वस्त श्री. महेश मुदलीयार आणि जितेंद्र राऊत चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक, कलाकार आणि तंत्रज्ञ मंडळी उपस्थित होती.

जयलक्ष्मी क्रिएशनच्या बॅनरखाली निर्मात्या पद्मजा वालावलकर यांनी ‘निर्धार‘ चित्रपटाची निर्मिती केली आहे. दिनानाथ वालावलकर यांनी लिहिलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन दिलीप भोपळे यांनी केले आहे. प्रदर्शित करण्यात आलेले पोस्टर देशभक्तीची भावना जागवणारे आहे. पोस्टरवरील तिरंग्याची अनोखी झलक क्षणार्धात लक्ष वेधणारी आहे. आजवर अनेक व्यक्तिरेखांमध्ये जीव ओतणारे डॉ. गिरीश ओक आणि नायकाच्या रूपातील सौरभ गोगटे पोस्टरच्या केंद्रस्थानी आहेत. त्यांच्या जोडीला इतर कलाकारांनी साकारलेल्या व्यक्तिरेखाही पाहायला मिळतात. पोस्टर पाहिल्यावर हा ‘निर्धार’ खूप मोठा उठाव करणारा असून, वैचारीक लढाईला चालना देणारा असल्याचे जाणवते. या चित्रपटातील तरुणाई वास्तवातील तरुणाईला भ्रष्टाचाराबाबत काय सांगू पाहते आणि कोणत्या मुद्द्यावर एकवटली आहे हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. भ्रष्ट समाजव्यवस्थेवर प्रहार करण्याचा प्रयत्न या चित्रपटात करण्यात आला असून, त्या विरोधातील युद्ध पाहायला मिळणार आहे. भ्रष्टाचारीरूपी राक्षसाला भस्मसात करण्यासाठी संघर्ष करत समाजापुढे नवा आदर्श ठेवणाऱ्या तरुण पिढीची कथा या चित्रपटात आहे.

या चित्रपटाच्या निर्मात्या पद्मजा वालावलकर म्हणाल्या की, समाजात वावरत असताना आणि समाजासाठी कार्य करीत असताना आपणही समाजाचे काही देणे लागतो याची जाणीव कायम मनात होती. त्याच भावनेतून ‘निर्धार’ या प्रेरणादायी आणि स्फूर्तीदायक चित्रपटाची निर्मिती केली आहे. हा निर्धार कसला, कोणी आणि का केला आहे हे पाहणे प्रेक्षकांसाठी उत्सुकतेचे ठरणार आहे. ‘निर्धार’चे पहिले पोस्टर खऱ्या अर्थाने कुतूहल जागविणारे असून, चित्रपटाबाबत उत्सुकता वाढवणारे आहे. हा चित्रपट नक्कीच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल असा ठाम विश्वासही पद्मजा वालावलकर यांनी व्यक्त केला.

लेखिका आणि आशियातील पहिल्या महिला सिनेमॅटोग्राफर बी.आर. विजयालक्ष्मी यांचे सोनम कपूरकडून कौतुक

डॉ. गिरीश ओक आणि सौरभ गोगटे यांच्या जोडीला ‘निर्धार’मध्ये पल्लवी पटवर्धन, प्रज्ञा केळकर, मिलिंद ऊके, उमेश बोळके, अभिनव कुरणे, जान्हवी सावंत, ऋतुजा कनोजिया, अभय पाटील, श्रेयस मोहिते, दिनानाथ वालावलकर, युवराज झुगर, केतकी पाटील, पल्लवी प्रसाद, आनंद पाटील, सुरेंद्र केतकर, विद्या डांगे, एन. डी. चौगुले, कोमल रणदिवे, आदी कलाकारांनी विविध व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. पिकल एंटरटेनमेंट या चित्रपटाचे वितरण करणार आहेत. रंगभूषा अतुल शिधये करत असून, वेशभूषा प्रशांत पारकर यांनी केली आहे. डिओपी अतुल सुपारे यांनी सिनेमॅटोग्राफी केली असून, विकी बिडकर यांनी कला दिग्दर्शन केलं आहे. राहुल पाटील सहदिग्दर्शक या चित्रपटाचे असून, संतोष जाधव प्रमुख सहाय्य्क दिग्दर्शक आहेत. निर्मिती व्यवस्थापक कैलास भालेराव, तर अजय खाडे लाईन प्रोड्युसर आहेत. नृत्य दिग्दर्शन संग्राम भालकर यांनी केले असून, क्रिएटिव्ह प्रोड्यूसर अथर्व वालावलकर आहेत.

follow us