100 कोटींचा प्रकल्प! सिद्धिविनायक मंदिराचा विस्तार, नव्या सुविधा तयार होणार

Prabhadevi Siddhivinayak Temple Expansion : मुंबईतील प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टने एक मोठा निर्णय घेतला आहे. मंदिराच्या विस्तारासाठी शेजारी असलेली तीन मजली राम मॅन्शन इमारत खरेदी करण्याचं ठरवलं आहे. अंदाजे 100 कोटी रुपयांच्या या खरेदीमुळे मंदिरास दर्शनासाठी अतिरिक्त जागा मिळणार आहे, ज्यामुळे दर्शन रांगेत भक्तांना होणारा त्रास कमी होईल.
सिद्धिविनायक कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी
टाईम्स ऑफ इंडियाने सिद्धिविनायक मंदिराचे (Siddhivinayak Temple) कोषाध्यक्ष आचार्य पवन कुमार त्रिपाठी यांच्या हवाल्याने 100 कोटींच्या खरेदीचे वृत्त दिलंय. कोषाध्यक्ष आचार्य पवन कुमार त्रिपाठी यांनी सांगितले की, राम मॅन्शन इमारत खरेदीसाठी अंतिम चर्चा सुरू आहे. सिद्धिविनायक कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीसोबतही वाटाघाटी चालू आहेत. या जागेमुळे मंदिरास एकूण 1,800 चौरस मीटर अतिरिक्त क्षेत्र उपलब्ध (Mumbai) होईल. या जागेत भक्तांसाठी प्रसाद कक्ष, स्वच्छतागृहे आणि इतर सुविधा उभारण्याचा मानस आहे.
साईबाबा मंदिरासारखा रांग कॉम्प्लेक्स
राम मॅन्शन ही इमारत काही वर्षांपूर्वी जुन्या चाळीच्या जागेवर बांधण्यात आली असून, इमारतीत २० छोटे 1BHK फ्लॅट आहेत. शेवटच्या मजल्यावर मालक राहत असून काही खोल्या भाड्याने दिल्या आहेत. या इमारतीचे प्रवेशद्वार सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टच्या समोरच असल्याने जागा मिळून दर्शनासाठी शिर्डीमधील साईबाबा मंदिरासारखा रांग कॉम्प्लेक्स तयार करता येणार आहे.
राज्य सरकारकडूनही सकारात्मक प्रतिसाद
सिद्धिविनायक ट्रस्टचे अध्यक्ष सदा सरवणकर म्हणाले की, रहिवाशांना दिली जाणारी रक्कम बाजारमूल्याच्या जवळपास दुप्पट आहे. त्यामुळे खरेदीमध्ये कोणतीही अडचण येणार नाही. राज्य सरकारकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून, हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर भक्तांना दर्शनासाठी लागणारी वेळ कमी होईल आणि त्यांची सोयी-सुविधा वाढेल. या खरेदीने मंदिराच्या सुविधेत आणि भक्तांच्या अनुभवात मोठा बदल घडवून आणण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. ट्रस्टच्या या निर्णयामुळे भविष्यात भक्तांसाठी अधिक सुव्यवस्थित आणि आरामदायी दर्शन व्यवस्था सुनिश्चित होईल.