पहिल्याच दिवशीच परीक्षा घेतली अन्…  ‘बटवारा 1947’ च्या सेटवरील प्रीती झिंटाचा मजेशीर खुलासा

Batwara 1947 : तब्बल अनेक वर्षांनंतर रुपेरी पडद्यावर पुनरागमन करणारी अभिनेत्री प्रीती झिंटा सध्या तिच्या आगामी 'बटवारा 1947' या चित्रपटामुळे

Batwara 1947
Batwara 1947 : तब्बल अनेक वर्षांनंतर रुपेरी पडद्यावर पुनरागमन करणारी अभिनेत्री प्रीती झिंटा सध्या तिच्या आगामी ‘बटवारा 1947’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटातून एकीकडे सनी देओल आणि दिग्दर्शक राजकुमार संतोषी ही गाजलेली जोडी तब्बल तीन दशकांनंतर पुन्हा एकत्र येत आहे, तर दुसरीकडे प्रीती झिंटाचाही हा महत्त्वाचा कमबॅक ठरण्याची शक्यता आहे. नुकत्याच झालेल्या माध्यमांशी संवादात प्रीतीने चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यानचे अनेक रंजक किस्से सांगत सर्वांनाच खळखळून हसवले.

प्रीतीने सांगितले की, राजकुमार संतोषींसोबत काम करण्याची तिची अनेक वर्षांची इच्छा होती. मात्र पहिल्याच दिवशी त्यांनी तिची चांगलीच परीक्षा घेतली. “पहिल्या दिवशी एखादा साधा सीन, चालण्याचा किंवा ओळख करून देणारा शॉट असेल, अशी माझी अपेक्षा होती. एकूणच पहिला दिवस हा तशा अर्थाने रूटीन सेट करण्याच्या दृष्टीने केला जातो, हा शिरस्ता असतो पण इथे माझ्यासमोर तर काहीतर वेगळेच वाढून ठेवलं होतं आणि मला त्याची कल्पनाच नव्हती.

संतोषी सरांनी थेट चित्रपटातील सर्वात आव्हानात्मक प्रसंगाचे चित्रीकरण सुरू केले. त्या क्षणी मला अक्षरशः काय करावे, हेच सुचत नव्हते. मी फक्त सनीकडे पाहत होते आणि घाबरले होते,” असे ती हसत म्हणाली.

याच वेळी सनी देओलने दिलेला धीर आजही तिच्या लक्षात असल्याचे प्रीतीने सांगितले. “सनीने मला शांत करत सांगितले, ‘सगळं होईल. अजिबात काळजी करू नकोस. संतोषी सरांना रिटेक्स आवडतात, त्यामुळे काही बिघडत नाही.’ त्यानंतर त्याने अगदी सहज विचारलं, ‘काही खाशील का?’ त्याचा हा मोठेपणा आणि साधेपणा मला खूप भावला. तो केवळ मोठा स्टार नाही, तर अत्यंत मनमिळावू, मोठ्या मनाचा आणि सहकलाकारांची काळजी घेणारा माणूस आहे,” असे म्हणत तिने सनीचे भरभरून कौतुक केले.

प्रीतीने आणखी एक मजेशीर अनुभवही सांगितला. चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी ती नुकतीच विमानातून उतरली होती. त्यात तिचे सामानही वेळेवर पोहोचले नव्हते. लगेच लूक टेस्ट झाली. दुसऱ्या दिवशी दोन-तीन वेळा संवादांची तालीम झाली आणि त्यानंतर थेट रात्रभर चित्रीकरण सुरू झाले. “पहिल्याच दिवसापासून आम्ही सलग रात्रभर शूटिंग करत होतो. सुरुवातीला खूप तणाव होता, पण नंतर सर्व काही सहज होत गेले,” असे ती म्हणाली.

या चित्रपटात प्रीती आणि सनी देओल चौथ्यांदा एकत्र झळकणार आहेत. याआधी दोघांनी ‘फर्ज‘ (2001), ‘द हिरो : लव्ह स्टोरी ऑफ अ स्पाय’ (2003) आणि ‘भैयाजी सुपरहिट’ (2018) या चित्रपटांत एकत्र काम केले आहे. ‘हिरोज’ (2008) मध्येही दोघे होते, मात्र त्यांचे एकत्र सीन नव्हते.

सनी देओलमध्ये इतक्या वर्षांत काही बदल जाणवला का, असा प्रश्न विचारला असता प्रीतीने हसत उत्तर दिले, “देवाचे आभार की त्याच्यात काहीच बदल झालेला नाही. आजही तो तितक्याच उत्साहाने काम करतो, सेटवर शांत असतो आणि चांगल्या जेवणाचा तितकाच चाहता आहे.” मात्र याचवेळी तिने सनीच्या अभिनयाबद्दल एक वेगळाच अनुभव सांगितला. “या चित्रपटात एक अतिशय भावनिक आणि तीव्र प्रसंग होता. शॉट सुरू होण्यापूर्वी आम्ही सगळे हसत-खेळत गप्पा मारत होतो, पण कॅमेरा सुरू होताच सनी पूर्णपणे त्या पात्रात शिरला. त्याचा अभिनय इतका प्रभावी होता की सेटवर उपस्थित असलेले आम्ही सगळेच काही क्षण हादरलो. त्याची ती एनर्जी आणि सीनमधील तीव्रता पाहून अक्षरशः अंगावर शहारे आले,” असे प्रीतीने सांगितले. दरम्यान, भारताच्या फाळणीच्या पार्श्वभूमीवर आधारित ‘बटवारा 1947’ हा चित्रपट 14 ऑगस्ट रोजी देशभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार असून, या चित्रपटाकडून प्रेक्षकांना आणि बॉक्स ऑफिसलाही मोठ्या अपेक्षा आहेत.

follow us