रजत बेदींची मराठी सिनेमात एन्ट्री; ‘बंधू’च्या माध्यमातून नव्या प्रवासाला सुरुवात
मराठी सिनेमातील नव्या इनिंगबद्दल रजत बेदी यांनी हा प्रवास आपल्यासाठी विशेष असल्याचे म्हटले आहे.
हिंदीसह दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत काम केलेले (Film) अभिनेता रजत बेदी आता मराठी सिनेमात पदार्पण करत आहेत. आगामी ‘बंधू’ या मराठी चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते म्हणून ते प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. जे एस् डी स्टुडिओ आणि ट्राईफ्लिक्स एंटरटेंमेंट यांच्या सहकार्याने हा चित्रपट तयार करण्यात आला असून, 20 नोव्हेंबरला तो मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. नितीन सिंधूविजय सुपेकर यांनी चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन केले आहे, तर प्रणव देसाई, जुही देसाई आणि कुलदीप सुनील ओझा यांनी निर्मितीची जबाबदारी सांभाळली आहे.
रजत बेदी यांच्या मराठी सिनेमातील प्रवेशाला त्यांच्या कुटुंबाच्या चित्रपटसृष्टीतील समृद्ध वारशाची पार्श्वभूमी आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक-निर्माते नरेंद्र बेदी यांचे ते पुत्र, तर ज्येष्ठ उर्दू साहित्यिक, पटकथाकार आणि दिग्दर्शक राजिंदर सिंह बेदी यांचे नातू आहेत. ‘मधुमती’, ‘अभिमान’, ‘अनुपमा’, ‘सत्यकाम’, ‘देवदास’ आणि ‘एक चादर मैली सी’ यांसारख्या गाजलेल्या चित्रपटांच्या लेखनातून राजिंदर सिंह बेदी यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांना भारतीय चित्रपटसृष्टीतील योगदानासाठी ‘पद्मश्री’ने सन्मानित करण्यात आले होते. नरेंद्र बेदी यांनीही ‘बंधन’, ‘जवानी दिवानी’, ‘खोटे सिक्के’, ‘बेनाम’, ‘रफू चक्कर’ आणि ‘सनम तेरी कसम’ यांसारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले.
रजत बेदी यांनी 1994 मध्ये ‘ग्लॅडरॅग्स मॅनहंट स्पर्धा’ जिंकून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. त्यानंतर ‘2001: दो हजार एक’ या चित्रपटातून त्यांनी अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवले. ‘कोई मिल गया’मधील भूमिकेमुळे त्यांना विशेष लोकप्रियता मिळाली. ‘जोडी नंबर 1’, ‘द हिरो: लव्ह स्टोरी ऑफ अ स्पाय’, ‘रक्त’, ‘अक्सर’ आणि ‘पार्टनर’ यांसह अनेक हिंदी चित्रपटांत त्यांनी काम केले आहे. हिंदीसोबतच तमिळ, तेलुगू, कन्नड आणि पंजाबी चित्रपटांतही त्यांनी भूमिका साकारल्या आहेत. अभिनयासोबतच निर्मिती क्षेत्रातही कार्यरत असलेल्या बेदी यांनी ‘Bads of Bollywood’ या सिरीजमधून अभिनयात कमबॅक केले आहे.
मराठी सिनेमातील नव्या इनिंगबद्दल रजत बेदी यांनी हा प्रवास आपल्यासाठी विशेष असल्याचे म्हटले आहे. बेदी कुटुंबाला मिळालेला चित्रपटसृष्टीचा वारसा आणि मराठी सिनेमाच्या आशयपूर्ण कथांचा संगम ‘बंधू’च्या माध्यमातून पाहायला मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. मराठी चित्रपटाचा भाग होणे ही अभिमानाची बाब असून, प्रेक्षक या नव्या प्रयत्नाचे प्रेमाने स्वागत करतील, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे बेदी कुटुंबाच्या चित्रपट परंपरेतील पुढची पिढी आता मराठी सिनेमाशी जोडली गेल्याने ‘बंधू’कडे चित्रपटप्रेमींचे लक्ष लागले आहे.