पंचरंग प्रतिष्ठानतर्फे राज्यस्तरीय एकांकिका लेखन स्पर्धेचे आयोजन

Panchrang Pratishthan : पंचरंग प्रतिष्ठानतर्फे (Panchrang Pratishthan) यंदा प्रथमच राज्यस्तरीय एकांकिका लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. नाट्य क्षेत्रात नवीन आणि सशक्त संहिता समोर याव्यात, तसेच नवोदित लेखकांना प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने ही स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे. स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या लेखकांनी लवकरात लवकर आपली नोंदणी करावी, असे आवाहन पंचरंग प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.
पंचरंग प्रतिष्ठानची स्थापना 5 नोव्हेंबर 1985 रोजी श्रीकांत अप्पा नाडापुडे, प्रकाश दादा हुंडेकरी, कांता काका शामराज, डी. एस. हंगरगेकर आणि संजय कवठेकर यांच्या पुढाकाराने झाली. मागील 40 वर्षांत भवानी करंडक एकांकिका स्पर्धा, बालनाट्य शिबिरे आणि नाट्य तंत्र व अभिनय कार्यशाळा यांसारखे उपक्रम संस्थेने यशस्वीपणे राबवले आहेत.
या संस्थेच्या माध्यमातून अनेक कलावंतांनी नाट्य आणि चित्रपटसृष्टीत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. श्रीकांत नाडापुडे (दिग्दर्शन), दिलीप भोसले (दिग्दर्शन), के सय्यद(डिझाईन), उमेश जगताप (अभिनय), योगेश राऊत (संकलन, दिग्दर्शन), शंतनू गंगणे (अभिनय, निर्माता) आणि प्रसाद कुलकर्णी (लेखन, अभिनय) यांसारख्या कलाकारांनी आपल्या कलेच्या जोरावर यश संपादन केले आहे.
सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातही पंचरंग प्रतिष्ठानने भरीव कामगिरी केली आहे. प्रा. संभाजी भोसले (मा. विद्यापीठ सिनेट सदस्य), नारायण नन्नवरे (अध्यक्ष, केंद्र सरकार समिती), राजेश शिंदे (मा. नगरसेवक) आणि नरसिंग बोधले (राजकीय) यांनी आपल्या कार्यामुळे पंचरंग प्रतिष्ठानची प्रतिष्ठा वाढवली आहे. पंचरंग प्रतिष्ठानने क्रीडा क्षेत्रातही उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
‘जारण’मध्ये प्रमुख भूमिकेत अमृता सुभाष, ‘या’ तारखेला प्रेक्षकांच्या भेटीला येणार
भवानी करंडक राज्यस्तरीय निमंत्रित संघाच्या कबड्डी आणि व्हॉलीबॉल स्पर्धांचे यशस्वी आयोजन केले आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी इच्छुक लेखकांनी लवकरात लवकर नोंदणी करावी, असे आवाहन पंचरंग प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.