ऑस्करमध्ये ‘द काश्मीर फाइल्स’ची एण्ट्री
मुंबई: ‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपटावरून मोठा वाद निर्माण झाला होता. चित्रपट प्रचारकी असल्याची देखील टीका झाली होती. मात्र, ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाला प्रतिष्ठित ऑस्कर पुरस्कारासाठी शॉर्टलिस्ट केलंय.
दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी ‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपटाला प्रतिष्ठित ऑस्कर 2023 पुरस्कारासाठी शॉर्टलिस्ट केलं गेलंय, अशी माहिती ट्विट करत सांगितली आहे.
भारतातून ऑस्करसाठी पाठवलेल्या पाच चित्रपटांपैकी हा एक आहे. या चित्रपटाच्या टीमशी निगडीत प्रत्येक व्यक्तीचं अग्निहोत्रींनी आभार मानलं.
इतकंच नाही तर द काश्मीर फाइल्सचे कलाकार पल्लवी जोशी, मिथुन चक्रवर्ती, दर्शन कुमार आणि अनुपम खेर यांनासुद्धा सर्वोत्कृष्ट कलाकारांच्या यादीत शॉर्टलिस्ट केलंय.
‘ही तर फक्त सुरुवात आहे, अजून खूप पुढे जायचंय’, अशा शब्दांत अग्निहोत्रींनी आनंद व्यक्त केला. द काश्मीर फाइल्स हा चित्रपट 11 मार्च 2022 रोजी प्रदर्शित झाला होता. यामध्ये मिथुन चक्रवर्ती, अनुपम खेर, दर्शन कुमार, पल्लवी जोशी यांच्या भूमिका आहेत.
या चित्रपटात 1990 मध्ये काश्मिरच्या खोऱ्यात काश्मिरी पंडितांवर झालेल्या अत्याचाराची कथा दाखवलण्यात आली आहे.
अत्यंत कमी बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने भारतात 252 कोटी रुपये आणि जगभरात 341 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. द काश्मीर फाइल्स हा 2022 मधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीतील दुसरा चित्रपट आहे.
भारताकडून ऑस्कर एण्ट्रीसाठी पाठवलेल्या चित्रपटांमध्ये गंगुबाई काठियावाडी, रॉकेट्री, कांतारा, RRR यांचाही समावेश आहे. या चित्रपटांवर मतदान झाल्यानंतर येत्या 24 जानेवारी रोजी ऑस्करसाठीची अधिकृत नामांकनं जाहीर होणार आहेत.