कलाकारांचे रंगभूमीवर शिक्कामोर्तब; १२ जून रोजी दुपारी ४ वाजता प्रेक्षकांच्या भेटीला
महेंद्र खराडे हे या नाटकाचे निर्मिती प्रमुख आहेत. 'शिक्कामोर्तब' नाटकाच्या तालमी सध्या जोरात रंगल्या असून, या नाटकाचा आस्वाद घेण्यासाठी येत्या १२ जूनपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.
नाटकात कलाकार ज्या भूमिका करतात, त्यातून ते त्यांच्या नाटकातील पात्रांवर एकप्रकारचे ‘शिक्कामोर्तब’ करत असतात. (Film) अशीच भूमिका घेत आजच्या आघाडीच्या कलाकारांचे एक नवेकोरे नाटक आता मराठी रंगभूमीवर येण्यास सज्ज झाले आहे. सागर कारंडे, कांचन पगारे, भक्ती रत्नपारखी व अनिशा सबनीस या चार कलाकारांचे हे नाटक म्हणजे ‘शिक्कामोर्तब’.
एका अनोख्या विषयावर भाष्य करणाऱ्या या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग शुक्रवार, १२ जून रोजी दुपारी ४ वाजता विलेपार्ले येथील मास्टर दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात होणार आहे. या नाटकाच्या निमित्ताने एक वेगळा विषय रंगभूमीवर येत आहे. हसतखेळत बरेचकाही सांगून जाणारे हे नाटक आहे. दोन दांपत्यांच्या जीवनात घडणाऱ्या घटनांतून या नाटकाची कहाणी उलगडत जाणार आहे. ‘तरंगिणी एंटरटेनमेंट’ आणि ‘नवनीत’ निर्मित या नाटकाचे लेखन व दिग्दर्शन प्रमोद शेलार यांनी केले आहे. नाटकाचे नेपथ्य संदेश बेंद्रे यांनी केले असून, प्रकाशयोजना शीतल तळपदे यांची आहे. वलय मुळगुंद यांची गीते आणि अभिजीत पेंढारकर यांचे संगीत या नाटकाला लाभले आहे.
चंदर यांनी रंगभूषा व दर्शना चौधरी यांनी या नाटकासाठी वेशभूषेची जबाबदारी सांभाळली आहे. महेंद्र खराडे हे या नाटकाचे निर्मिती प्रमुख आहेत. ‘शिक्कामोर्तब’ नाटकाच्या तालमी सध्या जोरात रंगल्या असून, या नाटकाचा आस्वाद घेण्यासाठी येत्या १२ जूनपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. या नाटकाबद्दल बोलताना लेखक व दिग्दर्शक प्रमोद शेलार सांगतात, विनोदी अंगाने जाणाऱ्या नाटकाच्या या कथेत शेवटी एक वेगळाच ट्विस्ट येतो. यातून ही कथा नक्की काय आहे, याचा उलगडा रसिकांना होईल.
सागर कारंडे, भक्ती रत्नपारखी, कांचन पगारे, अनिशा सबनीस असे कलाकार यात काम करत आहेत आणि विनोदाचे उत्कृष्ट टायमिंग असणारे हे कलाकार आहेत. त्यामुळे हे नाटक रसिकांना नक्कीच आवडेल, असा मला विश्वास आहे. ही एक खरी कहाणी आहे आणि तिला थोडेसे ट्विस्ट करून आम्ही रंगमंचावर आणत आहोत. हे नाटक ‘हिट’ असण्यावर लोक नक्कीच शिक्कामोर्तब करतील याची मला खात्री आहे.