शाहरुख खानची उडाली घाबरगुंडी, ‘मन्नत’ बंगल्यात दोन साप, वन विभागाची धावपळ

वन विभागाच्या मार्गदर्शनानुसार परिसराची पाहणी केली असता एका शिडीखाली सुमारे आठ फूट लांबीचा धामण साप आढळून आला.

Shah Rukh

मुंबईतील वांद्रे पश्चिम येथील (Actor) अभिनेता शाहरुख खानच्या ‘मन्नत’ बंगल्याच्या आवारात दोन साप आढळल्याने सोमवारी रात्री काही काळ खळबळ उडाली. बंगल्याच्या परिसरात दोन साप एकमेकांमध्ये गुंडाळलेल्या अवस्थेत असल्याची माहिती सर्पमित्र विक्की दुबे यांना मिळाली. त्यांनी तातडीने वन विभागाच्या अधिकाऱ्यांना याबाबत कळवून घटनास्थळी धाव घेतली.

वन विभागाच्या मार्गदर्शनानुसार परिसराची पाहणी केली असता एका शिडीखाली सुमारे आठ फूट लांबीचा धामण साप आढळून आला. हा साप बिनविषारी असल्याचं स्पष्ट झाल्यानंतर सर्पमित्र विक्की दुबे यांनी कोणतीही इजा न करता त्याला सुरक्षितपणे पकडलं. दरम्यान, परिसरात नागरिकांची वर्दळ वाढल्याने दुसरा साप तेथून निसटला.

सैफ अली खानच्या वाढदिवशी करीनाची खास पोस्ट; तुझ्याशिवाय आयुष्य किती कंटाळवाणं असतं

दुसऱ्या सापाचा रात्री उशिरापर्यंत शोध घेण्यात आला. मात्र तो आढळून आला नाही. धामण साप बिनविषारी असल्याचे समजल्यानंतर ‘मन्नत’मधील सुरक्षा कर्मचारी आणि घरातील व्यक्तींनी सुटकेचा नि:श्वास सोडला. पकडण्यात आलेल्या सापाला वन विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार त्याच्या नैसर्गिक अधिवासात सुरक्षितपणे सोडण्यात आलं.

वांद्रे येथील समुद्रकिनाऱ्यालगत असलेला शाहरुख खानचा ‘मन्नत’ बंगला नेहमीच चाहत्यांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू राहिला आहे. विशेष प्रसंगी शाहरुखची एक झलक पाहण्यासाठी तसंच त्याच्या घराची छायाचित्रे काढण्यासाठी चाहत्यांची मोठी गर्दी येथे होत असते. त्यामुळं या परिसरात साप आढळल्याची घटना समोर आल्यानंतर ती चर्चेचा विषय ठरली.

follow us