प्रश्नापलीकडले उत्तर… अन् उत्तरापलीकडले प्रश्न …
आर्टिफिशियलपेक्षा इमोशनल इंटेलिजन्सवर न बोलता सारे काही अधोरेखित होऊन जातं... तिथे सिनेमाने काळजात घर केलेलं असतं.
Uttar Film review : काही प्रश्नांची उत्तरं शोधावी लागतात… काही प्रश्नांची उत्तर सापडतात, काही अनुत्तरीत राहिलेल्या प्रश्नांचं नेमकं करायचं काय… त्या प्रश्नांच्या उंबरठ्यापाशी येऊन थबकल्यानंतर नेमक मनात काय चालतं, हे शब्दात मांडणं अवघड आहे… त्या गोष्टींना कागदावर मांडण्याचं आणि नंतर रुपेरी पडद्यावर तितक्यात सशक्तपणे साकारण्याच आव्हान क्षितिज पटवर्धनने पेललले आहे, त्याचच नाव उत्तर…
न दिसणारी गोष्ट दृश्यकलेत… मूर्त स्वरूपात मांडण्याचं आव्हान, हे खरंतर या सिनेमाचं शक्तिस्थान आहे. मग त्या भावना असो… किंवा मनोव्यापार… हल्ली “टेक्निकली करेक्ट” राहण्यासाठी जगण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करत असतो. जगण्याला दशांगुळे व्यापून राहणारी टेक्नॉलॉजी खरंच भावनिक गुंतवणुकीला आणि त्यामधील गुंतागुंतीला पर्याय ठरू शकते का ? याचं उत्तर शोधताना केवळ आर्टिफिशियल इंटेलिजन्स नाही तर अलवारपणे इमोशनल इंटेलिजन्सपर्यंत पोहोचण्याचा क्षितिज आणि त्याच्या टीमने केलेला प्रयत्न निश्चित आत्ताच्या काळाला सुसंगत ठरतो.
विशेषतः आई आणि मुलाच्या नात्यातील भावनांचे पदर अलगदपणे उलगडून दाखवण्याचा केलेला हा प्रयत्न आहे. जिव्हाळ्याच्या नात्याचा वेध घेताना अव्यक्त भावनांच्या क्षितिजावरले रंग तितक्याच सघनतेने आणि गहिरेपणाने ‘उत्तर’ या चित्रपटातून अत्यंत तरलतेने समोर येतात…
घराघरांत आईला अनेकदा गृहित धरलं जातं. सगळ्यांची उत्तरं तिच्याजवळ असतात; मात्र तिच्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याची वेळ तिलाच येते. आईतील आईपण सांभाळताना आणि बाईपण जपताना तिच्यातील घुसमट आणि मनातील द्वंद्व नेमकेपणाने टिपण्याचा प्रयत्न केला आहे.
मशीन लर्निंग टेक्नॉलॉजीमध्ये आठवणींची ऊब, भावनांची सय साठवता येईल का? या प्रश्नाच्या पार्श्वभूमीवर आई-मुलाच्या नात्याचा धागा पकडत, तंत्रज्ञानावर अति-अवलंबून झालेल्या आपल्याला पुन्हा स्वतःशी संवाद साधायला लावणारी ही गोष्ट आहे.
‘उत्तर’ हा चित्रपट दोन कारणांसाठी विशेष उल्लेखनीय ठरतो. कारण तो relatable आहे आणि relevant ही …
टेक्नॉलॉजीचा उल्लेख हा केवळ पात्रांच्या तोंडी राहत नाही, तर तो त्यांच्या जगण्याचा भाग आहे. एआय शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचं महाविद्यालयीन विश्व, त्यांच्यातील स्पर्धा, पुण्यासारख्या शहरात विविध सामाजिक स्तरांतून आलेले विद्यार्थी, आणि समाजोपयोगी तंत्रनिर्मितीबाबतचे त्यांचे भिन्न दृष्टिकोन – या सगळ्यांची झलक चित्रपटात अत्यंत सूचक पद्धतीने दिसते. या अर्थाने ‘उत्तर’ हा चित्रपट समकालीन वास्तवाशी प्रामाणिक राहतो.
आकाशवाणीवर निवेदिका म्हणून काम करणाऱ्या सिंगल पेरेंट उमा भालेराव… त्यांचं संपूर्ण भावविश्व त्यांचा मुलगा निनाद उर्फ नन्या याच्याभोवती फिरत आहे. एआयचे शिक्षण घेणारा नन्या पूर्णपणे आपल्या विश्वात गुंतलेला आहे. अभ्यास, कॉलेज, स्वतःसाठी हवा असलेला वेळ. या सगळ्यांत तो इतका व्यस्त आहे की, आईशी संवादासाठी वेळच उरत नाही. संवाद पूर्णपणे तुटलेला नसला, तरी रोजच्या वरवरच्या बोलण्यापलीकडे… औपचारिकतेपलीकडे आईचं मन समजून घेण्याइतका अवकाश त्याच्याकडे नाही. अशा ‘सगळं ठीक आहे’ या ट्रॅकवर चाललेल्या आयुष्यात अचानक ठेच लागते आणि नन्याचे आयुष्य एका क्षणार्धात बदलून जातं…
चित्रपटाची एकूण मांडणी आजच्या धावपळीच्या आयुष्यात हरवत चाललेला कौटुंबिक संवाद, पालकांना गृहित धरण्याची वृत्ती, एकट्या स्त्रीकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन आणि स्वतःच्या आयुष्याचे निर्णय घेताना एकट्या स्त्रीला करावा लागणारा भावनिक संघर्ष – अशा अनेक मुद्द्यांना हळुवार स्पर्श करते. नात्यातील एकाकीपणा आणि तो भरून काढण्यासाठी शोधले जाणारे पर्याय यांचं वास्तवदर्शी चित्रण यात आहे. आई आणि मुलामधले संवाद अत्यंत स्वाभाविक वाटतात. प्रत्येक पात्र तितकच जिवाभावाचं खरं खरं अस्सल आणि हाडामासाचा वाटावं असं लिहिलं गेलं आणि ते पडद्यावर उमटलं ही आहे…
नेमके आणि मोजके संवाद… पात्रांचा फाफट पसारा नाही… अन् कृत्रिमतेचा लवलेशही नाही… त्यामुळेच काही ठिकाणी पापण्यांच्या कडा कधी कधी नकळत ओलावतातही….
एआय मशीन लर्निंग आणि टेक्नॉलॉजीचे पदर उलगडत असताना आशयाचे गैरपण आणि अर्थाचा अपहरण होत नाही… ही या सिनेमाची जमेची बाजू आहे आणि लेखक दिग्दर्शक म्हणून इथे आपलं नाणं क्षितिज पटवर्धन खणखणीतपणे वाजवतो. दिग्दर्शनातलं हे त्याचे पदार्पण असलं तरीही त्याने त्यांनी बऱ्याच वापरलेलं रूपक… तारुण्य सुलभ वयातील असणारे नात्यांबाबतचची समज आणि प्रश्न… Inter personal relationships मधील नात्यांचे बदलणारे dynamics ज्या खुबीने हाताळलं आहे… हे सारं कमाल आहे.
उमा सतत उपदेश करणारी नाही; ती आजच्या पिढीशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करते. नन्या हा आजच्या पिढीचं प्रतिनिधित्व करतो. खंबीर, व्यावहारिक आणि स्वावलंबी. बदलत्या काळातील तरुणाईच्या विचारांचं प्रतिबिंब त्याच्या व्यक्तिरेखेत दिसतं. समकालीनता, नात्यातील ओलावा आणि एआयमुळे आलेला नावीन्याचा स्पर्श यामुळे ‘उत्तर’ वेगळा ठरतो.
अभिनयाच्या बाबतीत बोलायचे तर रेणुका शहाणे यांनी साकारलेली उमा भालेरावमध्ये प्रत्येक जण आपली आई शोधतो. हीच त्यांच्या अभिनयाला दिलेली दाद आणि प्रेक्षक पसंतीची पावती… वयात येणाऱ्या मुलाची आई आणि सिंगल मदर ही तारेवरची कसरत करत असताना आईपणातील सोशिकता आणि बाईपणातील संयम दाखवणे कुठेही बेगडी झालेलं नाही
अभिनय बेर्डेने नन्याच्या भूमिकेत हुशारी, आईवरील अव्यक्त प्रेम आणि लिप्त -अलिप्तमधील तळ्यात मळ्यात राहण्यातील बहुतांश छटा सहजतेने साकारल्या आहेत. तारुण्याच्या उंबरठ्यावर असताना मनातील लोलक नेमका कसा हालचाली करेल… हे दाखवून देताना पूर्वार्धातील अभिनय आणि उत्तरार्धातील अभिनय हा अधिक matured वाटतो… भूमिकेतील आव्हान आणि त्याचं वजन विणणे इतपत तो तयार झाला आहे. येत्या काळात त्याच्याकडून निश्चितच ही रेष अधिक मोठी करण्याची अपेक्षा आहे.
ऋता दुर्गुळे ही समंजस आणि विचारी अभिनेत्री आहे, याची चूक आपल्याला या सिनेमात मिळते. तिने साकारलेली क्षिप्रा लक्षात राहते… शेवटच्या सिक्वेन्स मध्ये ऋता तिच्या अभिनयाचा आलेख उंचावते. ऑथर बॅक्ड रोल नसतानाही समज आणि परफॉर्मन्सच्या जोरावर ऋता आपलं अस्तित्व अधोरेखित करते… ही जमेची बाजू… निर्मिती सावंत किती कसलेली अभिनेत्री आहे… अगदीच मोजके सीन्स असले तरी ती आपली छाप पाडते…
अमलेंदू चौधरीची सिनेमॅटोग्राफी सिनेमातील दृश्यात्मकतेतील साधेपणा आणि गहिरेपण अधिक अर्थगर्भ करते तर मयूर हरदासच्या संकलनात कथेतील प्रवाहीपण जपलं गेलं आहे. उमा आणि नन्याचं साधंसं घरही पडद्यावर सुंदर दिसतं. क्षितिज पटवर्धन लिखित आणि रोंकिणी गुप्ता यांच्या आवाजातील ‘असेन मी’ हे गीत मनात रेंगाळत राहतं. तेजस जोशी, असीम कुऱ्हेकर आणि प्रतीक केळकर यांचं संगीतही चित्रपटाची ताकद आहे. अमितराजचे हो आई देखील तितकेच मनाला भिडणारे आहे.
प्रतिभावंत कवी ग्रेस यांच्या शब्दात सांगायचे तर…
दुःख भराला आले
म्हणजे चंद्र नदीवर येतो
पाण्याचेही अस्तर सोलून
बिंब तळाला नेतो…
त्या काठावर स्वप्न उतरते
या काठावर डोळेझाक
शब्द दुभंगून जातील तेव्हा
पैलतीरावरून येईल हाक…
या कवितेचा अर्थ आणि अन्वयार्थ व्यक्तीसापेक्षा असला तरी त्या हाकेला दिलेली साद म्हणजे क्षितिज पटवर्धनचे “उत्तर” आहे… आर्टिफिशियलपेक्षा इमोशनल इंटेलिजन्सवर न बोलता सारे काही अधोरेखित होऊन जातं… तिथे सिनेमाने काळजात घर केलेलं असतं…
या सिनेमाला मी देतोय साडेतीन स्टार्स.
अमित भंडारी, चित्रपट समीक्षक, सोहम ग्रुपचे डिजिटल सीईओ
—————–
उत्तर
निर्माते : उमेश कुमार बंसल, बवेश जानवलेकर, संपदा वाघ, मयूर हरदास
लेखक – दिग्दर्शक – गीतकार : क्षितिज पटवर्धन
कलाकार : रेणुका शहाणे, अभिनय बेर्डे ऋता दुर्गुळे, निर्मिती सावंत
छायांकन : अमलेंदू चौधरी
संकलन : मयूर हरदास
