महापुराच्या तडाख्यात गावं वाहून गेली; एक घर मात्र खंबीरपणे कसं उभं राहिलं?, कारण आलं समोर

नेपाळमधील या घटनेने पूरप्रवण भागात बांधकाम करताना सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आणला आहे.

  • ganesh pokale
  • Written By: Published:
News Photo   2026 09 04T145247.135

नेपाळमधील बागमती भागात आलेल्या भीषण महापुराने (Nepal) मोठी हानी केली. लंगटांग लिरूंग हिमनगाचा मोठा तुकडा त्रिशुली नदीच्या पात्रात पडल्याने पाण्याचा प्रवाह, दगड आणि मातीच्या ढिगाऱ्यामुळे परिस्थिती अधिक गंभीर बनली. पाण्याचा दबाव वाढल्यानंतर पुराचे पाणी वेगाने आजूबाजूच्या गावांकडं धावलं. या पुरात अनेक घरं, शाळा आणि हॉटेल वाहून गेले. मात्र, नुवाकोट जिल्ह्यातील देवीघाट परिसरातील एक हिरव्या रंगाची इमारत या महापुरातही भक्कमपणे उभी राहिल्याने तिची जगभर चर्चा होत आहे.

या इमारतीचे मालक प्रकाश पांडे प्याकुरले यांनी घराच्या बांधकामाची माहिती दिली. त्रिशुली नदीच्या परिसरातील भौगोलिक परिस्थिती आणि पुराचा धोका लक्षात घेऊन त्यांच्या पूर्वजांनी घराची रचना केली होती. घराचा पाया तब्बल 2 मजल्यांइतका खोल खोदण्यात आला आणि त्यावर मजबूत पायाभरणी करण्यात आली. उभा भार पेलणारी रचना, थंड हवामान लक्षात घेऊन केलेले बांधकाम आणि मजबूत संरचना यामुळं पुराच्या प्रचंड तडाख्यातही इमारत कोसळली नाही.

नेपाळमध्ये अडकलेले 54 भारतीय मुंबईत सुखरूप परतले; माजी खासदार राहुल शेवाळेंकडून स्वागत

या घराच्या मजबुतीमागं केवळ खोल पाया नव्हे, तर रेनफोर्स्ड काँक्रीट, सिमेंट आणि स्टीलच्या पिलरचाही मोठा वाटा असल्याचं सांगण्यात येत आहे. घराच्या खालच्या 2 मजल्यांमधील विटांचा काही भाग पुराच्या प्रवाहात वाहून गेला. त्यामुळे पाणी, चिखल आणि मोठे दगड इमारतीला अडथळा न होता पुढे सरकले. परिणामी मुख्य खांबांवर येणारा अतिरिक्त ताण कमी झाला. शिवाय इमारत नदीच्या मुख्य प्रवाहापासून काही अंतरावर असल्याने पुराचा थेट आणि पूर्ण वेगाने आघात झाला नाही.

नेपाळमधील या घटनेने पूरप्रवण भागात बांधकाम करताना सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आणला आहे. नदीच्या काठावर किंवा नदीपात्रात अतिक्रमण करून बांधकाम न करता भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास करणं आवश्यक आहे. घराची उंची आणि मजल्यांची संख्या लक्षात घेऊन खोल व मजबूत पाया, दर्जेदार सिमेंट, स्टील आणि योग्य स्ट्रक्चरल डिझाइनचा वापर करणं गरजेचं आहे. भूकंप आणि महापुराचा धोका लक्षात घेऊन बांधकाम करण्यासोबतच वेळोवेळी स्ट्रक्चरल ऑडिट केल्यास नैसर्गिक आपत्तीच्या काळात इमारतीची सुरक्षितता वाढवता येऊ शकते.

follow us