रशिया-युक्रेन युध्दाला पूर्णविराम? रशियाचे अध्यक्ष पुतीन यांनी दिले आदेश
जवळपास एक वर्षांपासून सुरु असलेल्या रशिया-युक्रेनमधील युध्द अखेर थांबण्याची चिन्हे दिसून येत आहेत. कारण रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांनी युद्ध थांबवण्यासाठी चर्चेची तयारी दर्शवली आहे.
दरम्यान, पुतीन यांनी युध्द थांबविण्याची तयारी दाखवली असून काही अटीही घातल्या आहेत. यासंदर्भात रशियाच्या सरकारकडून माहिती देण्यात आलीय.
विविध कारणांमुळे रशियाने युक्रेनवर लष्करी हल्ला चढविला. त्यांनंतर युक्रेन गुडघे टेकणार अशी जगभरात शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र, युक्रेनचे झेलेन्स्कीनी नेतृत्वाखाली युक्रेनने लढा देत रशियाला धुडकावलंय. सध्या युक्रेनच्या सैन्यासह नागरिकांनी गनिमी काव्याने रशियांच्या हल्ल्यांला चोख उत्तर देत आहे.
युक्रेनने प्रत्युत्तर दिल्याने दोन्ही देशांमधील युध्द अधिक काळासाठी लांबलं होतं. दोन्ही देशांमधील युध्द लांबल्याने या युध्दामुळे जगभराच्या अर्थकारणावर परिणाम झाल्याचं दिसून आलं. अखेर स्वत:च्या देशातील जनतेसह जगभरातून येणारा दबावामुळे पुतीन यांनी आता चर्चेची तयारी दाखवली आहे.
रशियन सरकारनं तुर्कीचे अध्यक्ष रेसेप तय्यप एर्दोगन यांच्या माध्यमातून पुतीन यांनी चर्चेसाठी काही अटी घातल्या आहेत. रशियन सैन्यानं सध्या ताब्यात घेतलेला प्रदेश युक्रेननं सोडावा, अशी प्रमुख अट पुतीन यांनी घातली आहे. रशियन सैन्यानं पूर्व आणि दक्षिण युक्रेनचा मोठा भूभाग व्यापला आहे.
यामध्ये डोनेस्तक, लुगान्स्क, झापोरिझिया आणि खेरसन या प्रदेशांचा समावेश आहे. अर्थात, यावर रशियाला अद्याप पूर्ण नियंत्रण मिळवता आलेलं नाही. तरीही हा प्रदेश रशियाला द्यावा, असं पुतीन यांनी स्पष्ट केलंय.
दरम्यान, युक्रेननं रशियाच्या विरोधात पाश्चिमात्त्य देशांची मदत घेणं थांबवावं, पाश्चिमात्त्य देशांकडून मिळालेल्या लष्करी मदतीची संपूर्ण माहिती युक्रेननं खुली करावी, असंही रशियानं म्हटलं आहे.
ख्रिसमसच्या सुट्टीच्या पार्श्वभूमीवर पुतीन यांनी रशियन सैन्याला ३६ तासांसाठी युद्ध थांबवण्याचे आदेश दिले आहेत. रशियन ऑर्थोडॉक्स चर्चचे प्रमुख पॅट्रिआर्क किरिल यांच्या प्रस्तावानंतर हा आदेश देण्यात आला आहे.