केंद्र सरकारचा महत्वपूर्ण निर्णय, नाकावाटे देण्यात येणाऱ्या कोरोना लसीला मंजुरी

नवी दिल्ली : चीनमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारकडून खबरदारी घेतली जात आहे. पंतप्रधान मोदींच्या कोरोना आढावा बैठकीच्या एका दिवसानंतर एक महत्त्वाचा निर्णय घेत सरकारने इंट्रानोजल कोरोना लसीला मंजुरी दिली.
भारत बायोटेकची ही नाकातील लस आजपासून बूस्टर डोस म्हणून वापरण्यास परवानगी देण्यात आली आहे. ही लस केवळ खासगी रुग्णालयांमध्येच उपलब्ध असणार आहे.
यापूर्वीही नाकातील लस केंद्र सरकारने मंजूर केली होती. त्यावेळी डीजीसीआयला फक्त आपत्कालीन वापरासाठी लसीला मंजुरी देण्यात आली होती. डीजीसीआयकडून 18 वर्षांपेक्षा अधिक मुलांसाठी मंजुरी देण्याची परवानगी देण्यात आली होती.
ही लस नाकावाटे देण्यात येणार असून लस मोफत नसणार आहे. सध्या केंद्र सरकारकडून फक्त 18 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या नागरिकांना लसीची परवानगी देण्यात आली आहे. ही लस फक्त खाजगी रुग्णालयात उपलब्ध असणार आहे.
भारतात कोरोना लसीकरणासाठी कोविन अॅपची मोठ्या प्रमाणात मदत होत असल्याचं सांगण्यात येतंय. नागरिकांना या अॅपद्वारे त्यांचे स्लॉट बुक करण्यात मदत मिळत होती. दरम्यान, कोविन अॅपवर आज रात्रीपासून नाकावाटे देण्यात येणाऱ्या लसीची माहिती उपलब्ध असणार आहे.
दरम्यान, कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची एकूण संख्या २२० कोटी १ लाखांच्या वर गेली आहे. त्यात २२ कोटी १९ लाखांपेक्षा जास्त लाभार्थ्यांनी खबरदारीची लसमात्रा घेतली आहे.
काही दिवसांपासून कोरोना नवा व्हेरियंटचा उद्रेक झाल्याचं चित्र चीनमध्ये दिसून येत आहे. मात्र, भारतात अद्याप या नव्या व्हेरियंटचा अधिक प्रादुर्भाव दिसून येत नसून आत्तापर्यंत चार जणांना या नव्या व्होरियंटची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोरोना नियमांच पालन करण्याबाबत सूचना दिल्या असून आंतरराष्ट्रीय प्रवासासंदर्भात मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्याची माहिती दिलीय. तसेच आत्तापर्यंत आपल्या देशात चार जणांना नव्या व्हेरियंटची लागण झाल्याची माहितीही देण्यात आलीय.