चीनच्या सापळ्यात अफगाणिस्तान! भारताला धक्का देत खेळली मोठी चाल; बैठकीचा गुप्त अजेंडा समोर

Operation Sindoor : मागील काही वर्षांपासून अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध ताणले गेले आहेत. आता ऑपरेशन सिंदूरनंतर (Operation Sindoor) दोन्ही देशांत आणखी कटुता निर्माण झाली आहे. तर दुसरीकडे अफगाणिस्तानात तालिबान सरकार असतानाही भारत आणि अफगाणिस्तान (India Afghanistan) संबंध नव्याने आकार घेत आहेत. अशातच आता चीन नवीन डाव खेळण्याच्या तयारीत आहे. खरंतर अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यातील बिघडलेले संबंध सुधारण्यासाठी चीनने (China) कवायत सुरू केली आहे. यामागे चीनचा मोठा स्वार्थ दडला आहे.
मोठी आर्थिक मदत आणि कूटनीतीक सहकार्याचे आश्वासन चीनने आधीच तालिबानला दिलं आहे. यानंतर मंगळवारी बीजिंगमध्ये चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी, पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक डार आणि अफगाणिस्तानचे कार्यवाहक परराष्ट्र मंत्री अमीर खान मुत्तकी यांच्यात महत्वाची बैठक होत आहे. पाकिस्तान आणि (Pakistan News) अफगाणिस्तान यांच्यात विश्वास वाढवणे हा या बैठकीचा मुख्य उद्देश आहे.
ऑपरेशन सिंदूरनंतर भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री अमीर खान मुत्तकी यांची भेट झाली होती. या भेटीने दक्षिण आशियाच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. या घडामोडीनंतर बीजिंगमध्ये होणाऱ्या बैठकीवर भारताची बारीक नजर राहणार आहे. कारण अफगाणिस्तानच्या बाबतीत चीनचा दृष्टिकोन काय आहे हे आता कोणापासून लपून राहिलेले नाही.
पाकिस्तान, तुर्कीनंतर आता चीन; भारताने चायनाला दिला मोठा दणका, वाचा, नक्की काय घडलं?
तालिबानला चीनकडून आर्थिक रसद
ऑगस्ट 2021 मध्ये अमेरिकी सैन्य अफगाणिस्तानातून (Afghanistan) कायमचे माघारी गेले. यानंतर सगळा अफगाणिस्तान तालिबानच्या नियंत्रणाखाली आला. तर दुसरीकडे चीनही कमालीचा सक्रिय झाला आहे. ज्यावेळी काबूलमध्ये अस्थिरतेचे वातावरण होते तेव्हाही चीनने आपला दूतावास बंद केला नव्हता.
अफगाणिस्तानात तालिबान सरकार स्थापन झाल्यानंतर चीनने सर्वात आधी या सरकारच्या प्रतिनिधींशी संपर्क साधला. इतकेच नाही तर त्यांना आर्थिक मदतही दिली. भारताने मात्र सहा महिन्यांनंतर तालिबानच्या प्रतिनिधींशी संपर्क केला होता. यात चीनने बाजी मारली होती. तरी देखील भारत सातत्याने अफगाणिस्तानला मदत करत आला आहे.
CPEC अफगाणिस्तानला जोडण्याचा प्रस्ताव
कूटनीतीक सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार बीजिंग मधील बैठकीत चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कोरीडोरला (China Pakistan Economic Corridor) अफगाणिस्तानशी जोडण्याच्या मुद्द्यावर चर्चा होणार आहे. तालिबान सरकारने आधीच यासाठी तयारी दर्शवली होती. चीनने या प्रकल्पात जवळपास 65 अब्ज डॉलर्स गुंतवणूक करण्याची तयारी केली आहे.
या प्रकल्पात पाकव्यात काश्मीर (POK) आणि बलुचिस्तानमध्ये मूलभूत (Baluchistan) सुविधांचा विकास करण्यात येणार आहे. यातील काही प्रोजेक्ट पूर्ण झाले आहेत. ग्वादर पोर्ट देखील या कॉरिडॉरचा एक भाग आहे. जर अफगाणिस्तान या प्रकल्पाशी जोडला गेला तर याचा चीनला मोठा फायदा होणार आहे. चीन आपली विविध उत्पादने सीपीईसीच्या (CPEC) माध्यमातून मध्य आशियाई देश आणि पुढे युरोपातील देशांपर्यंत कमी वेळात पोहोच करू शकतो.
Joe biden Cancer : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना कर्करोगाचे निदान…
अफगाणिस्तानच्या खनिजांवर चीनचा डोळा
अफगाणिस्तानात अनेक मौल्यवान धातूंचे साठे आहेत. यात लिथियम, कॉपर, आयरन यांचे साठे आहेत. या संपत्तीवर चीनचा डोळा आहे. चीनची कंपनी मेटालार्जिकल कॉर्प ऑफ चायना लिमिटेडने अफगाणिस्तानात कामास सुरुवात केली आहे. या कंपनीची नजर येथील तांब्याच्या खाणीवर आहे. ही संपत्ती जितकी मिळवता येईल तितकी चीनला हवीच आहे. त्यामुळे चीन सध्या अफगाणिस्तानला जास्त प्राधान्य देत आहे.