इम्रान खानच्या अटकेनंतर पाकिस्तानात गृहयुद्ध, लष्कराच्या मुख्यालयावर हल्ला
Imran Khan Arrested : माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या अटकेनंतर पाकिस्तानात खळबळ उडाली आहे. राजधानी इस्लामाबादसह (Islamabad) अनेक शहरांमध्ये इम्रान खान यांच्या पीटीआय पार्टीच्या समर्थकांनी गोंधळ आणि तोडफोड केली आहे. क्वेट्टामध्ये आंदोलकांशी झालेल्या संघर्षात एका मुलाचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. रावळपिंडी येथील पाकिस्तानी लष्कराच्या मुख्यालयावरही हल्ला झाला आहे.
याशिवाय लाहोर कॅंटमधील लष्करी कमांडरच्या घरांना आग लावण्यात आली आहे. आंदोलकांनी मियांवली एअरबेसबाहेरील जहाजाची ढाचा जाळला आहे. इम्रान खान यांच्या अटकेनंतर समर्थकांनी पाकिस्तानी लष्करावर थेट निशाणा साधण्याची ही पहिलीच वेळ आहे. रेडिओ पाकिस्तानच्या इमारतीलाही आग लावली आहे.
रावळपिंडी येथील लष्कराच्या मुख्यालयावर झालेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांनी तातडीची बैठक बोलावली आहे. या बैठकीत कॉर्प्स कमांडर्सशिवाय अनेक वरिष्ठ लष्करी अधिकारी सहभागी आहेत.
पाकिस्तानचे पंतप्रधानपद म्हणजे `कत्तल` : विजनवास, अटक, फाशी या पैकी काहीतरी होणारच!
बैठकीत देशातील परिस्थितीवर चर्चा करण्यात आली आणि सरकारकडून सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन देण्यात आले. सूत्रांच्या हवाल्याने असे सांगितले जात आहे की जर परिस्थिती आणखी बिघडली तर लष्कर कायदा लागू शकतो. लष्करी जागेवर हल्ले करणाऱ्यांना दिसताच गोळ्या घालण्याचे आदेश दिले जाण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, पाकिस्तानचे माजी पंतप्रधान तथा पाकिस्तान तेहरीक ए इन्साफ पक्षाचे प्रमुख इम्रान खान (Imran Khan) यांना इस्लामाबाद उच्च न्यायालयाच्या बाहेरून आज अटक करण्यात आली. या घटनेमुळे संपूर्ण पाकिस्तानात खळबळ उडाली आहे. याबाबत पाकिस्तानच्या डॉन न्यूजने वृत्त दिले आहे. इस्लामाबाद न्यायालयाबाहेर ही कारवाई करण्यात आली. इम्रान खान यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत. खान यांना अल कदिर ट्रस्ट प्रकरणी अटक केल्याचे सांगण्यात आले.