चीनची अर्थव्यवस्था डबघाईला! परदेशी गुंतवणूकदारांनी 188 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक काढली

  • Written By: Published:
चीनची अर्थव्यवस्था डबघाईला! परदेशी गुंतवणूकदारांनी 188 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक काढली

नवी दिल्ली : दिवसेंदिवस चीनची आर्थिक स्थिती बिकट होत चालली आहे. एकीकडे चीन (china) सरकारवर अधिकृत चलन युआनचे अवमूल्यन करण्याची वेळ आली आहे. तर आता परदेशी गुंतवणूकदारही (foreign investment) चीनमधून पैसे काढून घेत आहे. परकीय गंगाजळीत $ 188 अब्ज डॉलरची घट झाली. 2012 नंतर एवढ्या मोठ्या प्रमाणावर परकीय गंगाजळी संपण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे चीनची अर्थव्यवस्था संकटात सापडली आहे.

श्रीलंका आणि पाकिस्ताननंतर गरीब होणारा चीन हा तिसरा देश ठरण्याची दाट शक्यता आहे. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, डिसेंबर 2021 च्या तुलनेत चीनच्या शेअर्स आणि कर्जामध्ये विदेशी होल्डिंग $ 188 अब्ज किंवा 17 टक्क्यांनी घटली आहे. ही आकडेवारी यंदाच्या जूनपर्यंत आहे. त्यानंतर परकीय गुंतवणूकदारांनी चिनी बाजारातून बराच पैसा काढून घेतला आहे.

ऑगस्टबद्दल बोलायचं झालं तर गेल्या महिन्यात चीनी बाजारातून $ 12 अब्ज काढून घेण्यात आले. चीनला गेल्या काही महिन्यांत आर्थिक आघाडीवर अनेक मोठे धक्के बसले आहेत. देशाची निर्यात सातत्याने घसरत आहे, बेरोजगारी शिगेला पोहोचली आहे, लोक पैसे खर्च करण्याऐवजी बचत करण्यावर भर देत आहेत. रिअल इस्टेट देखील गंभीर संकटात आहे आणि पाश्चात्य देशांसोबत चीनचा तणाव सतत वाढतोय. अशा परिस्थितीत विदेशी गुंतवणूकदारांचा चीनच्या अर्थव्यवस्थेवरील विश्वास सतत कमी होत आहे.

Rohit Pawar : मला जिथे पाहिजे तिथे सगळीकडे… राणेंच्या दाढीबद्दलच्या टीकेला रोहित पवारांचे उत्तर 

चीनमधून काढलेला पैसा भारत आणि लॅटिन अमेरिकन देशांत
2020 च्या तुलनेत हाँगकाँग शेअर बाजारातील विदेशी निधीचा सहभाग एक तृतीयांश पेक्षा कमी झाला आहे. चीनच्या अर्थव्यवस्थेत रिअल इस्टेटची महत्त्वपूर्ण भूमिका आहे, परंतु अलीकडच्या काळात या क्षेत्रातील संकट अधिक गडद होत आहे. याशिवाय चीनमध्ये ग्राहकांच्या खर्चात मोठी घट झाली आहे. या कारणांमुळे विदेशी गुंतवणूकदार चीनला टाळत आहेत. यंदा एमएससीआय चायना इंडेक्स सात टक्क्यांनी घसरला आहे. त्यामुळेच गुंतवणूकदार चीनमधून आपला पैसा काढून भारत आणि लॅटिन अमेरिकन देशांमध्ये गुंतवत आहेत.

युआन नीचांकी पातळीवर
चीनसमोर अनेक समस्या असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. जागतिक गुंतवणूकदारांनी यावर्षी चीनच्या डेट मार्केटमधून $26 अब्ज काढून घेतले आहेत. चीनचे चलन डॉलरच्या तुलनेत 16 वर्षांतील नीचांकी पातळीवर पोहोचले आहे. जगभरात व्याजदर वाढवले ​​जात असताना चीनच्या सेंट्रल बँकेने त्यात कपात केली आहे. यामुळे युआन आणखी कमकुवत झाले आणि परदेशी गुंतवणूकदारांना चीन सोडण्याचे आणखी एक कारण मिळाले. चीनच्या अर्थव्यवस्थेला यंदा पाच टक्के विकास साधता येणार नाही, अशी भीती जागतिक बँकांना आहे.

गेल्या वर्षीच्या तुलनेत ऑगस्टमध्ये चीनमधील मालमत्ता गुंतवणुकीत सुमारे 20 टक्क्यांनी घट झाली आहे. देशातील बांधकाम कामांमध्ये झालेली घसरण स्पष्टपणे दिसून येते. फ्लॅटच्या किमती घसरल्याने नवीन सदनिका बांधण्याची प्रक्रिया थांबली आहे. दोन वर्षांपूर्वीच्या तुलनेत घरांच्या किमती 14 टक्क्यांनी कमी झाल्या आहेत. रिअल इस्टेट कंपन्या कर्ज फेडण्यात कसूर करत असल्याने बँकांची अवस्थाही बिकट आहे. आता हे क्षेत्र संपूर्ण अर्थव्यवस्था उद्ध्वस्त करू शकते, अशी भीती निर्माण झाली आहे. याचे कारण म्हणजे चीनच्या जीडीपीमध्ये बांधकाम आणि संबंधित क्रियाकलापांचा वाटा सुमारे 25 टक्के आहे.

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube