अमेरिकेच्या माजी परराष्ट्रमंत्री Hillary Clinton संभाजीनगर दौऱ्यावर
संभाजीनगर : अमेरिकेच्या माजी परराष्ट्रमंत्री हिलरी क्लिंटन (Hillary Clinton) या दोन दिवसांच्या संभाजीनगर (Sambhajinagar) दौऱ्यावर आल्या आहेत. अहमदाबादहून विशेष विमानाने चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Chikalthana International Airport) दाखल झाल्या. खुलताबाद येथील ध्यान फार्म येथे त्यांचा मुक्काम असणार आहे.
या दोन दिवसांच्या दौऱ्यात हिलरी क्लिंटन वेरूळ लेणी आणि घृष्णेश्वर मंदिराला भेट देण्याची शक्यता आहे. विमानतळावरून हिलरी क्लिंटन यांचे वाहन रवाना होताना पोलिसांचा मोठा फौजफाटा होता. विमानतळापासून ते शहराच्या हद्दीपर्यंत शहर पोलिसांची सुरक्षा तैनात करण्यात आली.
ग्रामीण-हद्दीत ग्रामीण पोलिसांची सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली. ग्रामीण पोलिस दलातील १०० हून अधिक कर्मचारी व दहा ते पंधरा पोलिस अधिकारी तैनात करण्यात आले आहेत. रस्ता, मुक्कामाचे ठिकाण आणि वेरूळ लेणी व घृष्णेश्वर मंदिर आदी ठिकाणी तगडा बंदोबस्त तैनात आहे.
हिलरी क्लिंटन भारत दौऱ्यावर असून, गेली दोन दिवसा त्या गुजरातेमध्ये होत्या. अहमदाबादहून त्या मंगळवारी औरंगाबादला दाखल झाल्या. चिकलठाणा विमानतळावर दुपारी दीड वाजेच्या सुमारास विशेष विमानाने दाखल झाल्या.
हिलरी क्लिंटन या ९ फेब्रुवारी रोजी औरंगाबादहून रवाना होणार असल्याची माहिती विमानतळाच्या सूत्रांनी दिली. त्यांच्या या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर विमानतळावर आवश्यक ती खबरदारी घेण्यात येत आहे.