भारत-इस्रायल मुक्त व्यापार करार लवकरच; द्विपक्षीय व्यापाराला चालना
या बैठकीत व्यापार, कृषी, ऊर्जा, सायबर स्पेस, डिजिटल पेमेंट आदी क्षेत्रांत अनेक सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.
India-Israel free trade agreement soon : भारत आणि इस्त्रायल यांनी द्विपक्षीय संबंधांना विशेष धोरणात्मक भागीदारीच्या उंचीवर नेण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. गुरुवारी झालेल्या उच्चस्तरीय चर्चेनंतर हा महत्वपूर्ण टप्पा गाठण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्यातील सविस्तर चर्चेनंतर दोन्ही देशांनी लवकरच परस्पर हितसंबंध जपणाऱ्या मुक्त व्यापार करारावर स्वाक्षरी करण्याचे देखील मान्य केले.
या बैठकीत व्यापार, कृषी, ऊर्जा, सायबर स्पेस, डिजिटल पेमेंट आदी क्षेत्रांत अनेक सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. तसेच ‘India-Middle East-Europe Economic Corridor’ आणि ‘I2U2 Group’ या बहुपक्षीय सहकार्य उपक्रमांबाबतीतही सकारात्मक चर्चा झाली. या माध्यमातून प्रादेशिक संपर्क, पायाभूत सुविधा आणि आर्थिक सहकार्याला चालना देण्यावर भर देण्यात आला.
लष्करी सहकार्याला देखील नव्या गतीने पुढे नेण्याचा निर्णय घेण्यात आला असून, अत्याधुनिक संरक्षण उपकरणांचा संयुक्त विकास आणि उत्पादन यासाठी दोन्ही देशांनी सहमती दर्शवली. डिजिटल व्यवहार सुलभ करण्यासाठी इस्त्रायलमध्ये भारताची युपीआय प्रणाली सुरू करण्याबाबत करार झाला. कृत्रिम बुद्धिमत्ता, क्वांटम तंत्रज्ञान आणि महत्वपूर्ण खनिजे या क्षेत्रांतील सहकार्य वाढवण्यासाठी भारत-इस्त्रायल क्रिटिकल अँड इमर्जिंग टेक्नॉलॉजीज भागीदारीची घोषणा देखील करण्यात आली.
काँग्रेस की राष्ट्रवादी शरद पवार गट, राज्यसभेसाठी रस्सीखेच सुरु; बैठकीत काय घडलं?
जेरुसलेममध्ये याद वाशेम या जागतिक होलोकास्ट स्मृती केंद्राला मोदींनी भेट देत नरसंहारात प्राण गमावलेल्या सुमारे 60 लाख ज्यू बांधवांना श्रद्धांजली अर्पण केली. ज्यू परंपरेनुसार त्यांनी स्मृतीप्रित्यर्थ एक दगड ठेवला. तसेच बुक ऑफ नेम्स हॉलला भेट देत पीडितांच्या स्मृतींना अब्भिवादन केले. 1953 मध्ये स्थापन झालेल्या या स्मारकाला पंतप्रधान म्हणून मोदींनी दिलेली ही दुसरी भेट ठरली. या प्रसंगी नेतन्याहू यांनी देखील नरसंहारात बळी पडलेल्या आपल्या पत्नी सारा नेतान्याहू यांच्या नातेवाईकांची नावे दाखवत त्या काळाच्या वेदनादायी आठवणींना उजाळा दिला.
गाझातीळ संघर्षाबाबत बोलताना मोदींनी शांतता प्रक्रियेला भारताचा ठाम पाठिंबा असल्याचे स्पष्ट केले. मानवतेचा बळी कोणत्याही संघर्षात जाऊ नये, हा भारताचा ठाम विश्वास असल्याचे त्यांनी नमूद केले. शांततेचा मार्ग संवादातूनच निर्माण होती, असे देखील ते म्हणाले. दहशतवादाच्या मुद्द्यावर दोन्ही देशांमध्ये पूर्ण एकमत असल्याचे स्पष्ट करत, दहशतवाद आणि त्याला पाठिंबा देणाऱ्या शक्तींविरोधात खांद्याला खांदा लावून लढण्याची भूमिका दोन्ही नेत्यांनी पुन्हा अधोरेखित केली.
याशिवाय मोदींनी इस्त्रायलचे राष्ट्राध्यक्ष आयझॅक हर्जॉग यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. शिक्षण, स्टार्टअप, नवोन्मेष आणि कनेक्टिव्हिटी यांसारख्या क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्याबाबत चर्चा झाली. या भेटीत मोदींनी राष्ट्राध्यक्षांना भारतभेटीचे आग्रही निमंत्रण दिले. एकूणच, या भेटीमुळे भारत-इस्त्रायल संबंधांना नवे बळ मिळाले असून, संरक्षण, तंत्रज्ञान, व्यापार आणि जागतिक शांततेच्या मुद्द्यावर दोन्ही देश अधिक दृढपणे एकत्र उभे राहण्याचे संकेत मिळाले आहेत.
