Gurupatwant Singh Threat : ‘माझ्या हत्येचा कट फसला पण आता’.. पन्नूची संसदेवर हल्ल्याची धमकी

Gurupatwant Singh Threat : ‘माझ्या हत्येचा कट फसला पण आता’.. पन्नूची संसदेवर हल्ल्याची धमकी

Gurupatwant Singh Threat : खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंतसिंह पन्नू याने चिथावणीखोर वक्तव्य करत (Gurpatwant Singh Threat) पुन्हा एकदा भारताला धमकावले आहे. पन्नू याने एक व्हिडिओ जारी करत भारताला धमकी दिल्याने खळबळ उडाली आहे. मला मारण्याचा कट फसला आता 13 डिसेंबर किंवा त्याआधी भारताची संसद हादरून जाईल, अशी धमकी पन्नू या व्हिडिओत देताना दिसत आहे. पन्नूने 13 डिसेंबर हाच दिवस सांगण्यामागं एक कारण आहे ते म्हणजे याच दिवशी सन 2001 मध्ये आतंकवाद्यांनी संसदेवर हल्ला केला होता.

या व्हिडिओत एका बाजूला खलिस्तानचा झेंडा आणि दुसऱ्या बाजूला गुरपतवंतसिंह पन्नूचे पोस्टर लावल्याचे दिसत आहे. या पोस्टरवर दिल्ली बनेगा पाकिस्तान असे लिहिले गेले आहे. व्हिडिओत पन्नू म्हणतो, की भारतीय यंत्रणांनी मला मारण्याचा कट रचला पण त्यात ते यशस्वी झाले नाहीत. आता 13 डिसेंबर किंवा त्याआधी संसदेवर हल्ला करून याचे उत्तर दिले जाईल. त्याच्या या धमकीनंतर सुरक्षा यंत्रणा हाय अलर्टवर आल्या आहेत. सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे.

याआधी अमेरिकी गुप्तचर यंत्रणांनी निखील गुप्ता नामक एका व्यक्तीला अटक केली होती. भारतीय सुरक्षा एजन्सींच्या इशाऱ्यावर पन्नी याची हत्या करण्याचा कट रचण्यात आला आणि निखील गुप्ता हा या एजन्सींच्या इशाऱ्यावर काम करत होता, असा ठपका त्याच्यावर ठेवण्यात आला. मात्र, भारताने हे आरोप फेटाळून लावले होते. या प्रकरणाची तपासणी करण्यासाठी उच्चस्तरीय समिती नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला. भारताच्या सुरक्षा धोरणांच्या दृष्टीने ही बाब अत्यंत चिंताजनक असल्याचे भारताने त्यावेळेसच स्पष्ट केले होते. तसेच या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत चौकशी करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले होते. गुरपतवंतसिंह पन्नूकडे कॅनडा आणि अमेरिका या दोन देशांची नागरिकता आहे. येथूनच पन्नू व्हिडिओ तयार करून भारताला धमकावण्याचे काम करत आहे.

पन्नूने याआधीही भारताला धमकी दिली होती. 19 नोव्हेंबरला एअर इंडियाचे विमानातून प्रवास करू नका नाहीतर तुमच्या जीवाला धोका निर्माण होईल. 19 नोव्हेंबर रोजी इंदिरा गांधी विमानतळ बंद राहिल आणि या विमानतळाचे नावही बदलून टाकू असे पन्नू याआधी म्हणाला होता. त्याच्या या धमकीनंतर सुरक्षा यंत्रणांना हाय अलर्ट देण्यात आला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा पन्नूने भारताला धमकावले आहे. त्याच्या धमकीची दखल घेण्यात येऊन सुरक्षा यंत्रणा अलर्ट झाल्या आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube