Mecca Drone Alert : पवित्र मक्कावर हल्ला? सौदी अन् हुथी बंडखोरमध्ये संघर्ष पेटला; अलर्ट जारी
Mecca Drone Alert : सौदी अरेबियामधील मुस्लिमांचे पवित्र शहर असणाऱ्या मक्केमध्ये हवाई हल्ल्याचा इशारा देण्यात आल्याने संपूर्ण जगात एकच
Mecca Drone Alert : सौदी अरेबियामधील मुस्लिमांचे पवित्र शहर असणाऱ्या मक्केमध्ये हवाई हल्ल्याचा इशारा देण्यात आल्याने संपूर्ण जगात एकच खळबळ उडाली आहे. हुथी बंडखोरांनी मक्केच्या दिशेने सोडलेला एक ड्रोन नष्ट करण्यात आल्याचा दावा सौदी अरेबियाकडून करण्यात आला आहे. तर दुसरीकडे अशा कोणताही हल्ला करण्यात आलेला नाही असा दावा हुथी संघटनेकडून करण्यात आला आहे.
सौदी नागरी संरक्षण विभागाने मक्का (Mecca), जेद्दाह आणि ताइफसह देशाती आणखी काही शहरांसाठी हवाई हल्ल्याचे इशारे जारी करण्यात आले आहे. तर मक्केसाठी जारी केलेला इशारा काही मिनिटांतच मागे घेण्यात आला असल्याची देखील माहिती समोर येत आहे. सौदीच्या नेतृत्वाखालील आघाडीचे प्रवक्ते तुर्की अल-मलिकी यांनी सांगितले की, ‘रॉयल सौदी एअर डिफेन्स फोर्सेस’ (Royal Saudi Air Defense Forces) ने मंगळवारी संध्याकाळी एका “शत्रूच्या ड्रोन”ला मक्केच्या प्रतिबंधित हवाई क्षेत्रात प्रवेश करण्यापूर्वीच रोखले.दहशत पसरवण्याचा आणि नागरिकांना हानी पोहोचवण्याचा प्रयत्न असा उल्लेख सौदी अधिकाऱ्यांकडून या घटनेचा करण्यात आला आहे.
हुथीने (Houthi) सौदीचा (Saudi Arabia) दावा फेटाळला तर हुथी संघटनेने मक्केवरील हल्ल्याबाबतचा सौदीचा दावा फेटाळून लावला आहे. हुथी राजकीय ब्युरोचे सदस्य हाझेम अल-असद यांनी सांगितले की, मक्केला टार्गेट केल्याचे दावे यापूर्वीही केले गेले आहेत आणि ते केवळ “जुने खोटे दावे” आहेत. ‘अल जझीरा’च्या वृत्तानुसार, हुथींनी यापूर्वीही असे म्हटले आहे की ते पवित्र स्थळांना टार्गेट करत नाहीत.
मक्केतील हा इशारा महत्त्वपूर्ण का ?
मक्केमध्ये अशा प्रकारचा हवाई हल्ल्याचा इशारा जारी होण्याची ही पहिलीच वेळ होती. ‘अल जझीरा’नुसार, या पवित्र क्षेत्राला टार्गेट करण्याच्या प्रयत्नादरम्यान 2017 मध्येही सुरक्षेबाबत चिंता निर्माण झाली होती. मक्केमध्ये इस्लामचे सर्वात पवित्र स्थळ ‘काबा’ स्थित आहे. जगभरातील सुमारे 200 कोटी मुस्लिम आपल्या दैनंदिन नमाजच्या वेळी काबाच्या दिशेने तोंड करतात. दरवर्षी लाखो भाविक हज आणि उमराहसाठी मक्केला भेट देतात.
सौदी अरेबियावरील हुथींच्या हल्ल्यांमध्ये वाढ
गेल्या काही दिवसांपासून सौदी अरेबियावरील हुथींचे क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले तीव्र झाले आहेत. एका वृत्तानुसार, हुथी बंडखोरांनी या आठवड्यात सौदी अरेबियावर गेल्या काही वर्षांतील सर्वात मोठ्या क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यांपैकी एक हल्ला केला. या हल्ल्यांमध्ये तेल सुविधांचे नुकसान झाले असून 73 लोक जखमी झाल्याचे वृत्त आहे. त्याच्या आदल्या दिवशी, येमेनमधून डागण्यात आलेल्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे आणि ड्रोनच्या हल्ल्यात सौदी अरेबियामध्ये 13 लोक जखमी झाले होते.
शहरी भागांवर होणाऱ्या हुथी हल्ल्यांना “ठामपणे” प्रत्युत्तर दिले जाईल, असे सौदी-नेतृत्वाखालील आघाडीने स्पष्ट केले आहे. दक्षिण सौदी अरेबियातील खामिस मुशैत येथील ‘किंग खालिद एअरबेस’ला टार्गेट करून डझनभर बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे आणि ड्रोनद्वारे करण्यात आलेल्या मोठ्या हल्ल्याची जबाबदारीही हुथींनी स्वीकारली आहे. दरम्यान, पश्चिम येमेनमध्ये हुथींच्या हल्ल्यात सरकारी सैन्याचे आठ जवान मारले गेल्याची माहिती दोन लष्करी सूत्रांनी दिली आहे.
संघर्ष पुन्हा का पेटला?
सौदी अरेबिया आणि हुथी बंडखोर यांच्यातील संघर्ष 2015 पासून सुरू आहे. एप्रिल 2022 मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या मध्यस्थीने झालेल्या युद्धविरामानंतर, सौदीच्या भूभागावरील हुथींचे हल्ले बऱ्याच अंशी थांबले होते. अलीकडच्या काळात तणाव पुन्हा वाढला आहे. जुलैमध्ये, हुथींनी सौदीच्या जहाजवाहतुकीवर नाकेबंदी (ब्लॉकडे) जाहीर केली आणि लाल समुद्रातील जहाजांना टार्गेट करण्यास सुरुवात केली होती आणि त्यानंतर, सौदी अरेबियावरील क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यांची तीव्रता वाढली.