Hijack SOS : कॉकपिटमध्ये वैमानिक भिडले अन्… Flydubai विमानातील थराराची स्टोरी

flydubai hijack SOS : 7500 कोड मिळताच सुरक्षेसाठी इस्रायली हवाई दलाने विमानाच्या दिशेने फायटर जेट्स रवाना केले

  • Ninad K
  • Written By: Published:
Letsupp Image   2026 09 30T132456.436

Pilot brawl on Tel Aviv-bound flydubai jet sets off hijack SOS : विमान हवेत, जवळपास 180 प्रवासी आत आणि अचानक विमानातून ‘हायजॅक’चा इशारा, काही क्षणांतच संपूर्ण सुरक्षा यंत्रणा अलर्ट झाली. इस्रायलने लढाऊ विमानं हवेत रवाना केली, विमानाचा मार्ग बदलला आणि अखेर त्याचं सौदी अरेबियात इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं. मात्र, काही वेळाने या थरारक घटनेमागचं कारण समोर आलं आणि सुरुवातीच्या हायजॅकच्या संशयाला वेगळंच वळण मिळालं.

त्याचं झालं असं की, दुबईहून तेल अवीवला जाणाऱ्या Flydubai FZ1073 या विमानाने उड्डाण केल्यानंतर सौदी अरेबियाच्या हवाई क्षेत्राजवळ असताना आधी 7700 हा सामान्य आपत्कालीन सिग्नल दिला. त्यानंतर काही मिनिटांतच 7500 हा कोड सेट करण्यात आला. आंतरराष्ट्रीय विमान वाहतुकीत 7500 हा कोड विमानात अनधिकृत हस्तक्षेप किंवा संभाव्य हायजॅकिंग दर्शवतो. त्यामुळे इस्रायली सुरक्षा यंत्रणेत मोठी खळबळ उडाली.

फायटर जेट्स हवेत, विमानाचा मार्ग बदलला

7500 कोड मिळताच परिस्थितीला संभाव्य सुरक्षा धोका म्हणून पाहण्यात आलं. इस्रायली हवाई दलाने विमानाच्या दिशेने फायटर जेट्स रवाना केल्याची माहिती समोर आली. त्याचवेळी विमानाने तेल अवीवकडे जाण्याऐवजी मार्ग बदलला आणि सौदी अरेबियाच्या तबुककडे वळलं. विमानाने अखेर तबुक विमानतळावर सुरक्षित लँडिंग केलं. विमानातील सर्व प्रवासी सुरक्षित असल्याची माहिती Flydubaiकडून देण्यात आली आहे.

हायजॅकचा सिग्नल गेला तरी कसा?

विमान सुरक्षित उतरल्यावर या संपूर्ण घटनेमागचं कारण शोधण्यास सुरुवात झाली. त्यानंतर इस्रायली माध्यमांमध्ये समोर आलेल्या प्राथमिक माहितीनुसार, विमानाच्या कॉकपिटमध्ये दोन्ही वैमानिकांमध्ये जोरदार वाद झाला होता. या वादादरम्यान परिस्थिती इतकी बिघडली की विमानातून आपत्कालीन सिग्नल प्रसारित झाला आणि त्यानंतर 7500 कोडही सक्रिय झाला, अशी माहिती सुरक्षा सूत्रांच्या हवाल्याने देण्यात आली आहे. म्हणजेच, सुरुवातीला ज्यामुळे हायजॅकिंगची भीती निर्माण झाली, त्यामागे प्रत्यक्षात कॉकपिटमधील वैमानिकांचा वाद असण्याची शक्यता समोर आली आहे.

‘7700’ नंतर थेट ‘7500’ने वाढवली धडकी

या घटनेत वापरलेले दोन कोड विशेष महत्त्वाचे ठरले. एक म्हणजे 7700 हा विमानातील सामान्य आपत्कालीन परिस्थितीसाठी वापरला जाणारा आंतरराष्ट्रीय ट्रान्सपॉन्डर कोड आहे. त्यानंतर 7500 कोड सक्रिय झाल्याने परिस्थिती गंभीर असल्याचा संदेश गेला. कारण 7500 हा संभाव्य हायजॅक किंवा विमानावरील बेकायदेशीर हस्तक्षेपाचा संकेत मानला जातो. यामुळे विमानाच्या सुरक्षेबाबत तातडीने उपाययोजना करण्यात आल्या.

विमानात सुमारे 180 प्रवासी

या Flydubai विमानात सुमारे 180 प्रवासी असल्याची माहिती विविध रिपोर्ट्समध्ये देण्यात आली आहे. विमान तेल अवीवकडे जात असल्याने आणि हायजॅकचा सिग्नल मिळाल्याने इस्रायली यंत्रणांनी परिस्थितीकडे अत्यंत गांभीर्याने पाहिलं. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनीही संरक्षण अधिकाऱ्यांसोबत सुरक्षा चर्चेसाठी बैठक घेतल्याचे वृत्त आहे. मात्र, नंतर इस्रायली अधिकाऱ्यांनी हायजॅकचा धोका नसल्याचे स्पष्ट केले.

नेमकं कॉकपिटमध्ये काय घडलं?

सध्या सर्वात मोठा प्रश्न हाच आहे की, दोन्ही वैमानिकांमध्ये नेमका कोणत्या कारणावरून वाद झाला आणि त्यातून विमानाची सुरक्षा व्यवस्था एवढी गंभीर पातळीवर कशी पोहोचली? काही रिपोर्ट्समध्ये वैमानिकांमधील हाणामारीपर्यंत परिस्थिती गेल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, या वादाचं नेमकं कारण आणि कॉकपिटमध्ये नेमकं काय घडलं, याबाबत अधिकृत तपासातूनच स्पष्टता येणे अपेक्षित आहे.

हायजॅकचा सिग्नल, फायटर जेट्सचा अलर्ट आणि सौदीत इमर्जन्सी लँडिंग… काही काळासाठी या विमानाने संपूर्ण सुरक्षा यंत्रणेला धडकी भरवली. मात्र, सध्याच्या प्राथमिक माहितीनुसार हा दहशतवादी हल्ला नसून कॉकपिटमधील वैमानिकांच्या वादातून निर्माण झालेला गंभीर विमान सुरक्षा प्रकार असल्याचे समोर येत आहे.

follow us