Republic Day : आज देशात 74 व्या प्रजासत्ताक दिनाचा उत्साह, विविध कार्यक्रमांचं आयोजन
नवी दिल्ली : आज संपूर्ण देशभरात 74 वा प्रजासत्ताक दिन (Republic Day)साजरा केला जातोय. त्यानिमित्तानं आज गावखेड्यापासून देशाची राजधानी दिल्लीत (Delhi) विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. दिनानिमित्त देशभर उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतंय.
देशात आजच्याच दिवशी भारतीय राज्यघटना (Constitution of India) करण्यात आली. 15 ऑगस्ट 1947 या दिवशी भारत (India) देशाला ब्रिटिशांच्या पारतंत्र्यापासून स्वातंत्र्य मिळालं. मात्र 26 जानेवारी 1950 या दिवशी भारत देशाला सार्वभौम लोकशाही प्रजासत्ताक देश म्हणून घोषित करण्यात आलं. प्रजासत्ताक दिनानिमित्त आज दिवसभर देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय.
प्रजासत्ताक दिनानिमित्त मुंबईमधील शिवाजी पार्क (Mumbai Shivaji Park) येथे सकाळी 9 वाजता पोलीस परेड होणार आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुंबई पोलिसांचे इतर वरिष्ठ अधिकारी शिवाजी पार्क मैदानात उपस्थित राहणार आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कस्तुरचंद पार्क मैदानावर शासकीय ध्वजारोहण होणार.
जाणून घ्या, दिल्लीतील प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम
– सकाळी 10.22 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी कर्तव्यपथ येथे पोहचणार. सकाळी 10.25 वाजता उपराष्ट्रपती कर्तव्यपथ येथे पोहचणार.
– सकाळी 10.27 वाजता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि यावेळेचे प्रमुख पाहूणे इजिप्तचे राष्ट्रपती अब्देल फतेह अल सीसी कर्तव्यपथ येथे आगमन.
– राष्ट्रपती आणि प्रमुख पाहुण्यांचे पंतप्रधानांकडून स्वागत.
– संरक्षण मंत्री, संरक्षण राज्यमंत्री, चिफ ऑफ डिफेन्स, तिन्ही सैन्य दलाचे प्रमुख आणि संरक्षण सचिव यांचा पंतप्रधानांकडून परिचय.
– राष्ट्रपती, प्रमुख पाहुणे आणि पंतप्रधान व्यासपीठावर विराजमान होतील.
– त्यानंतर ध्वजारोहण होईल. त्यावेळी राष्ट्रपतींचे अंगरक्षक सलामी देतील. यावेळी बॅण्डवर राष्ट्रगीत आणि 21 तोफांची सलामी दिली जाईल.
– सकाळी 10.30 वाजता प्रजासत्ताक दिनाच्या संचलनाला सुरूवात होईल. संचलन साधारण दुपारी 12.05 वाजेपर्यंत चालेलं.
– विविध राज्यांचे सांस्कृतिक रथ, त्यानंतर दुचाकी स्टंट.
– विमानांच्या कवायती आणि सलामी, यानंतर पाहुण्यांना सलामी दिली जाईल.
– राष्ट्रपती आणि प्रमुख पाहुणे मार्गस्थ होणार.