Turkey Earthquake: चोवीस तासांत तीन शक्तिशाली भूकंप, २ हजार ३०० जणांचा मृत्यू
अंकारा: तुर्की (Turkey) आणि सीरिया (Siriya) या दोन देशांमध्ये सोमवारी चोवीस तासांत तीन शक्तिशाली भूकंप (Earthquake) झाले आहेत. यात हजारो नागरिकांचे प्राण गेले आहेत. जगभरातील वृत्तसंस्थांनी दिलेल्या माहितीनुसार या दोन देशांमध्ये सर्वाधिक नुकसान झाले आहे. आतापर्यंत या देशांमध्ये २ हजार ३०० लोकांचा मृत्यू झाला आहे. तर हजारो लोक कोसळलेल्या इमारतींमध्ये अडकलेले आहे. या देशांमध्ये बचावकार्य सुरू असून, किती जणांचा मृत्यू झाला आहे. किती जखमी झाले आहेत. किती नुकसान झाले आहे, हा आकडा समोर येण्यासाठी वेळ लागणार आहे.
संकटात असलेल्या या देशांसाठी जगभरातून मदतीचा ओघ सुरू झाला आहे. औषधे, बचावपथके, जीवनाश्यक वस्तूंचा पुरवठा सुरू करण्यात आला आहे. तुर्कीच्या नूर्दगीमधील २३ किलोमीटर पूर्व भागात ७.८ रेश्टरचा भूकंप झाला आहे. या भूकंपाने हजारो इमारती कोसळल्या आहेत. यात अडकून हजारो लोक मृत्यूमुखी पडले आहेत.बचावकार्य सुरू असतानाही दोन भूकंपाचे तीव्र धक्के बसले आहे. हा भूकंप ७.२ रेश्टरचा आहे. चोवीस तासांमध्ये तीन शक्तिशाली भूकंप झाले आहेत.
तुर्कीमध्ये १५०० आणि सीरियामध्ये ८१० लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर हजारो लोक जखमी झाले आहेत. तुर्कीमधील सरकारी वृत्तवाहिनी टीआरटीनुसार तुर्कीमधील हजारो इमारतींचे नुकसान झाले आहे. या भागात सध्या बर्फवृष्टी सुरू आहे. त्यामुळे लोक बचावासाठी रस्त्यावर आलेले आहेत.
जर्मन रिसर्च सेंटर फॉर जियोसायन्सच्या रिपोर्टनुसार मध्य तुर्कीमध्ये जमिनीखाली दहा किलोमीटर अंतरावर भूकंप झाले आहेत. तुर्कीच्या आपत्ती नियंत्रण यंत्रणेच्या माहितीनुसार एक मिनिटाचा भूकंपाचा कालावधी होता. लेबनान आणि सीरियामध्येही मोठे नुकसान झाले आहे. मलत्या, दियारबाकीर आणि मालट्या या प्रदेशामध्ये इमारती कोसळल्या आहेत. या ठिकाणी जीवितहानी झाल्याची माहिती अद्याप मिळालेली नाही. सीरियातील अलेप्पो आणि मध्य शहर हमा येथे काही इमारतींचे नुकसान झाल्याची माहिती येथील सरकारी वृत्तसंस्थांनी दिली आहे.
तुर्कीमध्ये २०२० मध्ये ३३ हजार वेळा भूकंप झाल्याची नोंद आहे.
तुर्कीमध्ये झालेल्या जीवितहानीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. तुर्कीला भारत आवश्यक ती मदत करेल, असेही मोदी यांनी म्हटले आहे.