मोठी बातमी! खलिस्तान्यांकडून परराष्ट्रमंत्री जयशंकर यांच्या वाहनावर हल्ल्याचा प्रयत्न; कुठे घडली घटना?

मोठी बातमी! खलिस्तान्यांकडून परराष्ट्रमंत्री जयशंकर यांच्या वाहनावर हल्ल्याचा प्रयत्न; कुठे घडली घटना?

Jaishankar in London : भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर (Jaishankar in London) सध्या लंडनमध्ये आहेत. येथे त्यांनी चॅथम हाऊस थिंक टँकमध्ये एका कार्यक्रमात भाग घेतला. या कार्यक्रमानंतर जयशंकर आपल्या कारकडे निघाले असता येथे आधीच उपस्थित असणाऱ्या खलिस्तानी आंदोलकांनी त्यांना पाहून जोरदार घोषणाबाजी सुरू केली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

परराष्ट्रमंत्री जयशंकर ब्रिटन आणि आयर्लंडच्या सहा दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. या दरम्यान लंडन येथील एका कार्यक्रमात जयशंकर सहभागी झाले होते. भारताचा उदय आणि जगातील भूमिका या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. या दरम्यान त्यांनी काश्मीर, रेसिप्रोकल टॅरिफ आणि अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणावर थेट भूमिका मांडली.

या कार्यक्रमानंतर जयशंकर इमारतीतन बाहेर पडले. त्यावेळी बाहेर खलिस्तानी समर्थक आधीचेच उपस्थित होते. त्यांच्याकडून जोरदार घोषणाबाजी सुरू होती. जयशंकर आपल्या कारच्या दिशेने निघताच एका आंदोलकाने पळत जाऊन त्यांच्या कारचा रस्ता अडवला. यानंतर येथे उपस्थित असणाऱ्या सुरक्षारक्षकांनी या व्यक्तीला तिथून बाजूला केले. या घटनेनंतर मोठी खळबळ उडाली आहे. इतकी सुरक्षाव्यवस्था असताना आंदोलकाने जयशंकर याची कार अडवण्याचा प्रयत्न केला तरी कसा असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर द्विपक्षीय सहकार्य वाढविण्याच्या उद्देशाने ब्रिटन आणि आयर्लंडच्या सहा दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांनी सर्वात आधी लंडन गाठले. येथे ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर आणि विदेश मंत्री डेव्हिड लॅमी यांची भेट घेतली.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube