पाच राज्यांत थंडीचा रेड अलर्ट; महाराष्ट्रात पारा पुन्हा घसरला
नवी दिल्ली : देशातील वातावरण सातत्यानं बदलताना दिसतंय. कुठे थंडी तर ढगाळ वातावरण जाणवतंय. सध्या उत्तर भारत चांगलाच गारठलाय. पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, उत्तर प्रदेश या राज्यांसाठी थंडीचा रेड अलर्ट जारी करण्यात आलाय. महाराष्ट्रातही तापमानाचा पारा चांगलाच घसरलाय. अनेक ठिकाणी तापमानाचा पारा 10 ते 12 अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे. काही ठिकाणी एक अंकी तापमानाची नोंद झाली आहे.
देशातील विविध भागात तापमानाचा पारा चांगलाच घसरलाय. त्यामुळं हुडहुडी वाढलीय. डोंगरापासून मैदानी प्रदेशापर्यंत कडाक्याची थंडी जाणवतेय. उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीचा जोर वाढल्याचं पाहायला मिळतंय. तर उद्या मंगळवारी (दि.10) थंडीचा जोर कमी होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवलीय. हवामान विभागाच्या माहितीनुसार सफदरगंजमध्ये सर्वात कमी तापमानाची नोंद झाली आहे. सफदरगंजमध्ये 1.9 डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असून या मोसमातील सर्वात कमी तापमान आहे. राजस्थान, बिहारमध्ये ऑरेंज अलर्ट जारी केलाय.
महाराष्ट्रातही तापमानाचा पारा चांगलाच घसरलाय. अनेक ठिकाणी तापमानाचा पारा 10 ते 12 अंश सेल्सिअसच्या दरम्यान पाहायला मिळतंय. काही ठिकाणी एक अंकी तापमानाची नोंद झालीय. हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार पुढील दोन दिवसात उत्तर मध्य महाराष्ट्राचा काही भाग, संलग्न मराठवाडा भाग तसेच बहुतांश विदर्भात तापमानात घट होण्याची शक्यता आहे. थंडीचा पारा आणखी वाढण्याची शक्यता आहे. विदर्भात काही ठिकाणी थंडीची लाट येण्याचा अंदाज आहे. पुणे, अहमदनगर, औरंगाबाद, जळगाव काही भागातही थंडी वाढण्याचा अंदाज आहे.
नंदुरबार जिल्ह्याच्या डोंगराळ भागात तापमान 8 अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले असून गारठा वाढलाय. दुपारपर्यंत वातावरणात थंडावा राहात असल्यानं नागरिकांना शकोटयांचा आधार घ्यावा लागतोय. तर सपाट भागात तापमान 11 अंश सेल्सिअसपर्यंत आहे. पारा खाली आल्यानं कडाक्याच्या थंडीनं जिल्हा गारठलाय. सातपुड्याच्या डोंगररांगांमध्ये कडाक्याच्या थंडीसोबतचं दाट धुकं पाहायला मिळत आहे. पर्यटकांनी नेहमी गजबजलेला यशवंत तलाव परिसर थंडीमुळं सकाळी ओस पडल्याचं चित्र आहे.