नवीन नोट अन् नवा नकाशा, ‘नेपाळ’च्या निर्णयाचा भारताला धक्का, नेमकं काय घडलं?
Nepal Controversial Note : चीनच्या हातचं खेळणं होत चाललेल्या नेपाळचा आणखी (Nepal) एक कारनामा उघड झाला आहे. नेपाळ सरकारच्या कॅबिनेटने शंभर रुपयांच्या नवीन नोटा छापण्यास मंजुरी दिली आहे. या निर्णयातही नेपाळने भारताला (Nepal India Relation) डिवचण्याची संधी सोडलेली नाही. या नोटांवर नेपाळचा नवीन नकाशा छापला जाणार आहे. यामध्ये लिपूलेख, लिंपियाधुरा आण कालापानी या ठिकाणांचाही समावेश राहिल. हे तिन्ही प्रदेश भारताचे अविभाज्य भाग आहेत. मात्र नेपाळ या प्रदेशांवर दावा करू लागला आहे. त्यामुळे दोन्ही देशांतील संबंध पुन्हा बिघडण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
नेपाळ सरकारच्या प्रवक्त्या रेखा शर्मा यांनी या निर्णयाची माहिती माध्यमांना दिली. पंतप्रधान पुष्पकमल दहल यांच्या अध्यक्षतेत झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यामध्ये शंभर रुपयांच्या नोटांवर नवीन नकाशा छापला जाणार आहे. या नोटांवर लिपुलेख, लिंपियाधुरा आणि कालापानी या ठिकाणांना दाखवण्यात येईल. रेखा शर्मा या नेपाळ सरकारमध्ये सूचना आणि दळणवळण मंत्री आहेत.
Nepal : नेपाळमध्ये ‘चीन’ची एन्ट्री! जुनी युती तुटली; सरकारमध्ये PM प्रचंड अन् चीन समर्थकांची आघाडी?
शर्मा म्हणाल्या, मंत्रिमंडळाच्या बैठकीत शंभर रुपयांच्या नोटा नव्या पद्धतीने डिझाईन करणे आणि आधीच्या नकाशाऐवजी नवीन नकाशा या नोटांवर छापण्यास मंजुरी देण्यात आली. 18 जून 2020 रोजी नेपाळने त्यांच्या संविधानात बदल केला होता. यामध्ये लिपुलेख, लिंपियाधुरा आणि कालापानी या तीन ठिकाणांचा समावेश करून देशाचा अपडेट करण्याची प्रक्रिया पूर्ण केली होती. या निर्णयावर भारताने तीव्र नाराजी व्यक्त केली होती.
नेपाळ सरकारचा हा एकतरफी अधिनियम आहे. हा कृत्रिम विस्तार आहे अशी प्रतिक्रिया भारताने दिली होती. या तीन प्रदेशांवर भारत अधिकार ठेवतो. हे तिन्ही प्रदेश ऐतिहासिक दृष्ट्या भारताच्या जवळच राहिले आहेत. असे असतानाही नेपाळ चीनच्या इशाऱ्यावर भारताला डिवचण्याचे उद्योग करू लागला आहे. याआधीचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांच्या कार्यकाळातही हा वाद उभा राहिला होता. आता पुन्हा हा वाद समोर आला आहे.
खबरदार..! सरकारविरुद्ध बोललात तर मुक्काम थेट तुरुंगात; ‘हाँगकाँग’चा नवा कायदा काय?
नेपाळमध्ये चीनचा हस्तक्षेप वाढू लागल्यापासूनच असे वाद वारंवार उभे राहू लागले आहेत. भारत आणि नेपाळचे संबंध खूप जुने आहेत. भौगोलिकदृष्ट्याही नेपाळ भारतासाठी अतिशय महत्वाचा भाग आहे. नेपाळ अनेक गोष्टींसाठी आजही भारतावरच अवलंबून आहे. भारतानेही नेपाळला मदत करण्यात कधीच हात आखडता घेतला नाही. या सगळ्या गोष्टी चिनी नेत्यांनाही माहिती आहेत. त्यामुळेच दोन्ही देशांत वाद निर्माण करण्याचा प्रयत्न चीनकडून सातत्याने होत आहे.