धक्कादायक! CHATGPT वर संशय घेणाऱ्या इंजिनिअरचा मृत्यू, घरातच आढळला मृतदेह
Suchir Balaji : चॅट जीपीटी डेव्हलप करणाऱ्या आर्टिफिशीयल कंपनी OpenAI चा माजी संशोधक सुचीर बालाजीचा मृतदेह त्याच्या राहत्या घरात आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. सुचीरने कंपनीवर अनेक गंभीर प्रश्च उपस्थित केले होते. त्यानंतर आता सुचीरच्या मृत्यूचीच बातमी येऊन धडकली आहे. सुचीरचा मृत्यू झाल्याची माहिती सॅन फ्रॅन्सिस्को पोलिसांना 26 नोव्हेंबरलाच मिळाली होती. जगभरात या घटनेची माहिती होईपर्यंत 15 डिसेंबर उजाडला.
पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की सुचीर बालाजी सॅन फ्रॅन्सिस्को येथील बुकानन परिसरात त्याच्या राहत्या घरी मृतावस्थेत आढळून आला. स्थानिक प्रसारमाध्यमांनुसार सुचीरने आत्महत्या केली असावी असा पोलिसांना संशय आहे. कोणत्याही प्रकारची गडबड झाल्याचे कोणतेही संकेत मिळाले नसल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.
सुचीर आपल्या मित्रांशीही फारसा बोलत नव्हता. यानंतरच त्याच्या मित्र परिवाराला त्याची काळजी वाटत होती. त्यानंतर त्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली होती. यानंतर पोलीस 26 नोव्हेंबर रोजी दुपारी 1 वाजता सुचीरच्या घरी दाखल झाले. परंतु, येथे पोलिसांना सुचीरचा मृतदेह मिळून आला.
OpenAI वर प्रश्न
सुचीर बालाजीने साधारण तीन महिन्यांपूर्वी दावा केला होता की OpenAI कंपनीने अमेरिकेच्या कॉपीराइट कायद्याचे उल्लंघन केले आहे. ओपन एआयने चॅट जीपीटी तयार केले आहे. आता या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर जगभरात मोठ्या प्रमाणात केला जात आहे. 2022 मध्ये अॅप लाँच झाल्यानंतर अनेक समस्याही निर्माण झाल्या होत्या. त्यावेळी पत्रकार, लेखक आणि प्रोग्रामर लोकांनी कंपनीने अॅप विकसित करण्यासाठी बेकायदेशीर मार्गाने त्यांच्या कॉपीराइट कंटेंटचा वापर केल्याचा आरोप केला होता.
23 ऑक्टोबर रोजी एका विदेशी मीडिया संस्थेला मुलाखत देताना सुचीरने दावा केला होता की चॅट जीपीटीला प्रशिक्षित करण्यासाठी आवश्यक माहिती गोळा करण्याची जबाबदारी असणाऱ्या व्यवसाय आणि उद्योजकांवर नकारात्मक प्रभाव टाकला जात आहे. जर तुम्हाला माझ्या बोलण्यावर विश्वास असेल तर तुम्हाला कंपनी सोडावी लागेल असेही सुचीर या मुलाखतीत म्हणाला होता.
.