चर्चा तर होणारचं! ओपन AI चे CEO समलैंगिक विवाह बंधनात; जिवलग मित्रासोबत घेतल्या आणाभाका
Sam Altman : AI रिसर्च लॅब OpenAI चे CEO आणि Y Combinator चे माजी अध्यक्ष सॅम ऑल्टमन (Sam Altman) यांनी त्यांच्या जिवलग मित्र ऑलिव्हर मुल्हेरिन याच्यासोबत समलैंगिक विवाह करत साताजन्माच्या गाठी बांधल्या आहेत. 10 जानेवारी रोजी ऑल्टमन यांनी साध्या पद्धतीने हा विवाह केला. या सोहळ्याला केवळ कुटुंबातील सदस्य आणि काही निवडक मित्रांना आमंत्रित करण्यात आले होते. ऑल्टमन यांच्या निवासस्थानाजवळ हा सोहळा पार पडला. सॅम ऑल्टमनचा जोडीदार ओली या नावाने ओळखला जातो. दोघेही एकमेकांचे चांगले मित्र आहेत. या मैत्रीनंतर दोघांनी विवाह करण्याचा निर्णय घेतला होता. आज त्यांचा हा निर्णय प्रत्यक्षात उतरला. नवविवाहीत जोडप्याने लग्न समारंभाचे काही फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.
ChatGPT चे निर्माते OpenAI कडून कंपनीचे सहसंस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सॅम ऑल्टमन यांना काही दिवसांपूर्वी तडकाफडकी पदावरून हटवण्यात आले होते. कंपनीने जसा हा निर्णय घेतला कदाचित पुढे काय होईल याचा त्यांना अंदाज नसावा. कर्मचाऱ्यांनी धडाधड राजीनामे देण्यास सुरुवात केली. कंपनीवर दबाव वाढत चालला. अखेर कंपनीने माघार घेत सॅम ऑल्टमन यांना पुन्हा रुजू करून घेतले. या घडामोडींनंतर त्यानंतर ते जगभरात चर्चेत आले होते. आता आपल्या पुरुष मित्राबरोबर विवाह करून ऑल्टमन पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.
कोण आहेत ऑलिव्हर मुल्हेरिन?
ऑलिव्हर मुल्हेरिन आणि सॅम ऑल्टमन यांची अनेक वर्षांपासूनची मैत्री आहे. ऑस्ट्रेलियन प्रोग्रामर ऑलिव्हर मुल्हेरिन हे मेलबर्न विद्यापीठातून सॉफ्टवेअर इंजिनिअर पदवीधर आहेत. मुल्हेरिनने त्यांच्या शैक्षणिक काळात विविध एआय प्रकल्पात काम केले. इंटरनेट ऑफ थिंग्ज यात त्याची मास्टरी आहे. सप्टेंबर महिन्यात न्यूयॉर्क साप्ताहिकाला दिलेल्या मुलाखतीत त्याने पहिल्यांदाच खुलासा केला होता की सॅम ऑल्टमन आणि तो सॅन फ्रॅन्सिस्कोत एकत्र राहतात.