बीडमध्ये प्राध्यापकाचा संतापजनक प्रकार! विद्यार्थिनीचा विनयभंग, नापास करण्याची धमकी दिल्याचा आरोप

Beed Professor Harassment Case : वैद्यकीय तपासणीच्या नावाखाली गैरवर्तन केल्याचा आरोप; 22 वर्षीय विद्यार्थिनीची शिवाजीनगर पोलिसांत फिर्याद.

  • ganesh pokale
  • Written By: Published:
News Photo   2026 11 28T171134.027

Beed Professor Harassment Case : बीडमध्ये एका होमिओपॅथिक वैद्यकीय (Beed) महाविद्यालयातील प्राध्यापकाविरोधात गंभीर आरोप करण्यात आले आहेत. महाविद्यालयात तृतीय वर्षात शिकणाऱ्या 22 वर्षीय विद्यार्थिनीने संबंधित प्राध्यापकाकडून विनयभंग, मानसिक त्रास आणि धमकावल्याचा आरोप करत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या तक्रारीनंतर पोलिसांनी संबंधित प्राध्यापकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, त्याला ताब्यात घेऊन नोटीस बजावल्यानंतर सोडून देण्यात आले आहे.

फिर्यादी विद्यार्थिनी गेल्या तीन वर्षांपासून शिक्षणासाठी बीडमध्ये वास्तव्यास आहे. तिला पीसीओडीचा त्रास असल्याने जानेवारी 2025 ते फेब्रुवारी 2026 या कालावधीत ती महाविद्यालयातील सर्जरी विषयाचे प्राध्यापक आणि जनरल सर्जन डॉ. अनिस अहमद यांच्याकडे नियमित तपासणीसाठी जात होती. याच वैद्यकीय तपासणीदरम्यान प्राध्यापकाने गैरवर्तन केल्याचा आरोप विद्यार्थिनीने केला आहे. 10 जानेवारी 2026 रोजी तपासणीच्या निमित्ताने तिला महाविद्यालयासमोरील केबिनमध्ये नेऊन स्टाफला बाहेर पाठवले आणि दरवाजा बंद करून चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

त्यानंतरही तपासणीसाठी गेल्यानंतर दोन ते तीन वेळा अशाच प्रकारचे गैरवर्तन झाल्याचा दावा विद्यार्थिनीने केला आहे. या प्रकाराबाबत कोणाला सांगितल्यास परीक्षेत गुण मिळू देणार नाही, नापास करेल आणि एकाच वर्गात पाच वर्षे ठेवेल, अशा धमक्या दिल्याचा आरोपही करण्यात आला आहे. शैक्षणिक नुकसान होण्याच्या भीतीने आपण सुरुवातीला कोणालाही काही सांगितले नाही, असे विद्यार्थिनीने फिर्यादीत नमूद केले आहे.

हे पवारांचं जंतरमंतर, फार थोड्यांना कळतं, राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचा खेळ राज ठाकरेंनी आधीच ओळखला होता?

दरम्यान, संबंधित प्राध्यापकाकडून फोन आणि व्हॉट्सॲप संदेशांद्वारे संपर्क साधला जात असल्याचाही आरोप आहे. 29 जून 2026 रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास कॉल आणि मेसेज करून व्हॉट्सॲपवर पीडीएफ पाठवण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे. शॉपिंगसाठी आपल्या खात्यात 5 हजार रुपये जमा केल्याचे सांगून वाद घातला आणि या प्रकरणाची माहिती कोणाला दिल्यास नापास करण्याची धमकी दिली, असा आरोप विद्यार्थिनीने केला आहे.

या त्रासाला कंटाळून विद्यार्थिनीने अखेर आपल्या मामांना संपूर्ण प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर 22 नोव्हेंबर 2026 रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास संबंधित प्राध्यापकाने फोन करून बाहेर जेवायला येण्यास सांगितले आणि न आल्यास बघून घेण्याची धमकी दिल्याचेही फिर्यादीत नमूद आहे. या घटनांनंतर विद्यार्थिनीने 25 नोव्हेंबर रोजी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात धाव घेत डॉ. अनिस अहमद यांच्याविरोधात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.

या प्रकरणी आरोपी प्राध्यापकाला ताब्यात घेण्यात आले असून, भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम 35(3) नुसार नोटीस देऊन सोडण्यात आल्याची माहिती पोलिस उपनिरीक्षक सागर सोन्ने यांनी दिली. विद्यार्थिनीच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, प्रकरणाचा पुढील तपास सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, या प्रकरणातील आरोपांची सत्यता तपासानंतर स्पष्ट होणार आहे.

follow us

संबंधित बातम्या