दौलत महाराज सातपुते मृत्यू प्रकरणाला नवे वळण; 40 फूट अंतरावरील बारवेत सापडला मोबाईल, पोलिसांकडून तपास सुरू
Daulat Maharaj Satpute Death Case: ह.भ.प. दौलत महाराज सातपुते यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात पोलिसांच्या हाती महत्त्वाचा पुरावा लागला.
Daulat Maharaj Satpute Death Case: जालन्यातील भोकरदन तालुक्यातील सावंगी अवघडराव येथील पाताळेश्वर संस्थानचे मठाधिपती ह.भ.प. बालयोगी देवेंद्र चैतन्य स्वामी उर्फ दौलत महाराज सातपुते यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात पोलिसांच्या हाती महत्त्वाचा पुरावा लागला आहे. घटनेनंतर बेपत्ता झालेला त्यांचा मोबाईल पोलिसांनी मठाजवळील बारवेतून शोधून काढला आहे. घटनास्थळापासून सुमारे 40 फूट अंतरावर असलेल्या या बारवेतील पाणी उपसून मोबाईल बाहेर काढण्यात आला. त्यामुळे आता मोबाईलमधील माहितीच्या आधारे पोलिसांच्या तपासाला दिशा मिळण्याची शक्यता आहे.
मात्र, हा मृत्यू आत्महत्या आहे की घातपात, याबाबत अद्याप स्पष्टता झालेली नाही. पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पारध पोलीस ठाण्याकडून तपास सुरू आहे.
मोबाईलमधील माहिती तपासणार; शेवटचे फोन कुणाचे आले होते?
पोलिसांनी बारवेतून बाहेर काढलेला मोबाईल पाण्यात पडल्यामुळे सध्या बंद आहे. त्यामुळे तो सुरू करून त्यातील माहिती मिळवण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत. तसेच मोबाईलच्या कॉल डिटेल रेकॉर्डची (CDR) तपासणी केली जाणार आहे. स्वामींना शेवटचा फोन कुणाचा आला होता, मृत्यूपूर्वी त्यांचे कोणाशी बोलणे झाले होते, याची माहिती तपासातून मिळवण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे. मोबाईलमधील माहिती आणि संबंधित व्यक्तींच्या चौकशीतून या प्रकरणातील महत्त्वाचे धागेदोरे मिळू शकतात.
14 नोव्हेंबरला कीर्तन, दुसऱ्या दिवशी मृतदेह आढळला
दौलत महाराज सातपुते हे मूळचे नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील मुसळगाव येथील रहिवासी होते. गेल्या 8 ते 10 वर्षांपासून ते जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील सावंगी अवघडराव येथील पाताळेश्वर मंदिर परिसरातील मठात वास्तव्यास होते. कीर्तन आणि प्रवचनाच्या माध्यमातून ते धार्मिक तसेच सामाजिक प्रबोधनाचे काम करत होते.
14 नोव्हेंबरच्या रात्री त्यांनी गावात कीर्तन केले होते. त्यानंतर ते मठातील आपल्या खोलीत परतले. मात्र, 15 नोव्हेंबरच्या सकाळी त्यांचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. या घटनेची माहिती मिळताच पारध पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. फॉरेन्सिक पथकानेही घटनास्थळाची पाहणी करून पुरावे गोळा केले.
कोण होते दौलत महाराज सातपुते?
ह.भ.प. दौलत महाराज सातपुते यांचे वय 41 वर्षे होते. देवेंद्र चैतन्य स्वामी या नावानेही ते परिचित होते. कीर्तन आणि प्रवचनातून ते परिसरात समाजप्रबोधनाचे कार्य करत होते. त्यांच्या निधनानंतर मठ परिसरातच अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पारध पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद असून पोलीस सर्व बाजूंनी तपास करत आहेत.