मोठी बातमी! धुळ्याच्या महापौर माया परदेशी यांचा आत्महत्येचा प्रयत्न; रुग्णालयात उपचार सुरू
Dhule Mayor Maya Pardeshi : धुळ्याच्या महापौर माया परदेशी यांनी विष प्राशन केल्याने खळबळ; रुग्णालयात उपचार सुरू असून प्रकृती स्थिर.
धुळे शहराच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवणारी घटना समोर आली आहे. धुळ्याच्या महापौर माया परदेशी यांनी विष प्राशन करून आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केल्याची माहिती आमदार अनुप अग्रवाल यांनी दिली आहे. या घटनेनंतर त्यांना तातडीनं विघ्नहर्ता या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, महापौर माया परदेशी यांच्याबाबत धुळ्यातील संजय शर्मा यांनी सोशल मीडियावर कथित अपमानास्पद पोस्ट केली होती. या पोस्टमधून त्यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करण्यात आल्याचा आरोप आहे. या प्रकारामुळे महापौर परदेशी यांना मानसिक धक्का बसल्याचे सांगितले जात आहे. त्यानंतर त्यांनी विष प्राशन केल्याची माहिती समोर आली आहे.
खाटू श्यामजींच्या भक्तांवर काळाचा घाला; धुळ्यातील 9 भाविकांचा मृत्यू, 8 जण गंभीर जखमी
दरम्यान, संजय शर्मा यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, सोशल मीडियावरील कथित बदनामी आणि अपमानास्पद वक्तव्यामुळे महापौरांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचा दावा केला जात आहे. या घटनेमागील नेमकी कारणे आणि संपूर्ण घटनाक्रम अद्याप स्पष्ट झालेला नाही. त्यामुळे या प्रकरणाकडे राजकीय वर्तुळासह नागरिकांचेही लक्ष लागले आहे.
घटनेची माहिती मिळताच महापौर माया परदेशी यांच्या समर्थकांनी विघ्नहर्ता रुग्णालय परिसरात गर्दी केली. रुग्णालयात त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. आमदार अनुप अग्रवाल यांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर धुळ्यात चर्चेला उधाण आले असून, पोलिसांकडून या संपूर्ण प्रकरणाबाबत पुढील माहिती समोर येण्याची प्रतीक्षा आहे.