कामाची बातमी! बाथरूमचा दरवाजा सतत बंद ठेवणं धोकादायक; रिसर्चमध्ये मोठा खुलासा
Bathroom Door Tips बाथरूमचा दरवाजा बंद ठेवणे ही आपल्यासाठी नेहमीच सवयीची आणि सोयीची गोष्ट राहिली आहे. मात्र...
Does Closing Bathroom Door Spread Germs? : तुम्ही बाथरूम वापरल्यानंतर बाहेर येताच दरवाजा लगेच बंद करता का? अर्थात, बहुतांश लोकांची हीच सवय असते. पण, सतत बाथरूमचा दरवाजा बंद ठेवणं धोकादायक ठरू शकतं असा मोठा खुलासा 2025–2026 च्या बिल्डिंग अँड एनव्हायरमेंट स्टडीच्या एका रिसर्चमधून करण्यात आला आहे. नेमकं रिसर्चमधून काय समोर आलं? कुणी केलाय हा रिसर्च त्याबद्दल जाणून घेऊया…
बाथरूम वापरल्यानंतर लगेच दरवाजा बंद केल्याने बॅक्टेरिया आणि जंतू घरात पसरणार नाहीत तुम्हाला असं तुम्हाला वाटत असेल तर, तुमची हीच सवय बाथरूममधील दूषित हवा तिथेच अडकवू शकते आणि याचा परिणाम तुमच्या आरोग्यावरही होऊ शकतो. आपण जेव्हा टॉयलेट फ्लश करतो, तेव्हा केवळ पाणीच खाली जात नाही, तर हवेमध्ये अतिशय सूक्ष्म कणही पसरू शकतात. या कणांना ‘एरोसोल्स’ असे म्हणतात. Does Closing Bathroom Door Spread Germs?
फ्लश करताना तयार होणाऱ्या या सूक्ष्म कणांमध्ये बॅक्टेरिया आणि इतर सूक्ष्मजीव असण्याची शक्यता असते. विशेष म्हणजे हे कण लगेच नाहीसे होत नाहीत. काही काळ हवेमध्ये तरंगत राहू शकतात आणि बाथरूममधील वेगवेगळ्या पृष्ठभागांवर जाऊन बसू शकतात. म्हणजेच, आपल्याला बाथरूम स्वच्छ दिसत असलं, तरी तिथल्या हवेत आणि पृष्ठभागांवर सूक्ष्मजीव असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
दरवाजा बंद ठेवल्याने काय होतं?
समजा, तुमच्या बाथरूममध्ये योग्य वेंटिलेशन नाही आणि तुम्ही दरवाजा कायम बंद ठेवता. अशा परिस्थितीत दूषित हवा बाहेर जाण्याचा मार्ग मर्यादित होऊ शकतो. परिणामी, बाथरूममधील हवा आणि त्यातील सूक्ष्म कण तिथेच जास्त काळ राहू शकतात. याशिवाय, हे कण वॉशबेसिन, दरवाजाचे हँडल, नळ आणि इतर पृष्ठभागांवरही जमा होऊ शकतात. म्हणजेच केवळ बाथरूमचा दरवाजा बंद ठेवला, म्हणून बाथरूम स्वच्छ आणि सुरक्षित झालं, असं अजिबात नाही.
2026 मध्ये ‘जर्नल ऑफ हॅझार्डस मटेरियल्स’मध्ये प्रकाशित झालेल्या एका सिम्युलेशन अभ्यासात असे आढळून आले आहे की, कमी वायुप्रवाह असलेल्या बंद जागांमध्ये हे कण जमा होतात आणि त्यांची पातळी वाढते. याशिवाय ‘जर्नल ऑफ अप्लाइड मायक्रोबायोलॉजी’मध्ये प्रकाशित झालेल्या एका महत्त्वाच्या रिव्यूमध्ये जिवाणू आणि विषाणू शौचालय आणि बाथरूमच्या पृष्ठभागांवर सहजपणे पसरू शकतात असे नमुद करण्यात आले आहे.
बाथरूमचा दरवाजा उघडा ठेवायचा की बंद?
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, बाथरूमचा दरवाजा उघडा ठेवणं योग्य की बंद? तर, याचं उत्तर तुमच्या बाथरूममधील वेंटिलेशनवर अवलंबून आहे. कारण दरवाजा उघडा ठेवल्याने बाथरूममधील दूषित कण घरातील इतर भागांतही पसरू शकतात. त्यामुळे केवळ दरवाजा उघडा किंवा बंद ठेवण्यापेक्षा हवा योग्य पद्धतीने बाहेर जाण्याची व्यवस्था करणं अधिक महत्त्वाचं आहे. यासाठी या चार सोप्या गोष्टी नक्की करा.
पहिली गोष्ट फ्लश करण्याआधी टॉयलेटचं झाकण बंद करा. यामुळे फ्लशिंगदरम्यान बाहेर पडणाऱ्या एरोसोल्सचा प्रसार कमी होण्यास मदत होऊ शकते.
दुसरी गोष्ट एक्झॉस्ट फॅनचा वापर करा. बाथरूममधील ओलावा आणि दूषित हवा बाहेर काढण्यासाठी एक्झॉस्ट फॅन महत्त्वाचा आहे.
तिसरी गोष्ट योग्य वेंटिलेशन ठेवा. बाथरूममध्ये हवा येण्यासाठी आणि बाहेर जाण्यासाठी योग्य व्यवस्था असणं आवश्यक आहे.
चौथी गोष्ट नियमित स्वच्छता करा. फ्लश बटण, नळ, वॉशबेसिन आणि दरवाजाचे हँडल यांसारख्या वारंवार स्पर्श होणाऱ्या जागा नियमितपणे स्वच्छ करा.
आपण घर स्वच्छ ठेवण्यासाठी रोज झाडलोट करतो, फरशी पुसतो, प्रत्येक वस्तू स्वच्छ ठेवतो. पण घरातील बाथरूमच्या हवेकडे मात्र अनेकदा दुर्लक्ष करतो. पण, बाथरूम स्वच्छ दिसणं जितकं महत्त्वाचं आहे, तितकंच तिथे योग्य वेंटिलेशन असणंही महत्त्वाचं आहे. त्यामुळे आजपासून फक्त बाथरूमचा दरवाजा बंद ठेवण्यावर भर देऊ नका, तर बाथरूममधील हवा स्वच्छ आणि खेळती राहतेय ना, याकडेही लक्ष द्या…
डिस्क्लेमर : वरील बातमी प्रकाशित वृत्त आणि त्यातील रिसर्च स्टडीजवर आधारावर केलेली आहे. लेट्सअप मराठी याबाबत कोणताही दावा करत नाही.