कर्जतच्या टोरंट प्रकल्पावरून संघर्ष पेटला; फडणवीसांनी विरोधकांना सुनावलं
Torrent Pumped Project : कर्जतमधील टोरंट पंप स्टोरेज प्रकल्पावरून वृक्षतोडीचा वाद चिघळला, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या भूमिकेमुळे नवा संघर्ष.
Torrent Pumped Storage Project : कर्जतमधील प्रस्तावित टोरंट पंप स्टोरेज प्रकल्पावरून राज्यात राजकीय संघर्ष तीव्र झाला आहे. या प्रकल्पाच्या कामासाठी मोठ्या प्रमाणावर झाडं तोडण्यात आल्याचा आरोप होत असून, त्यामुळे जंगलातील नैसर्गिक अधिवास आणि जैवविविधतेला धोका निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. कर्जत आणि भीमाशंकर अभयारण्य परिसरातील वृक्षतोडीच्या मुद्द्यावर स्थानिक नागरिक, पर्यावरणप्रेमी आणि विरोधी पक्षांनी आक्षेप घेतला आहे. विकासाच्या नावाखाली निसर्गाचं नुकसान केलं जाऊ नये, अशी भूमिका पर्यावरणप्रेमींकडून मांडली जात असून, या प्रकरणामुळे सरकारवरही टीकेची झोड उठली आहे.
या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत आणि सुषमा अंधारे यांनी कर्जत येथे जाऊन प्रकल्प परिसराची पाहणी केली. वृक्षतोडीबाबत त्यांनी चिंता व्यक्त करत या मुद्द्यावर सरकारला जाब विचारला आहे. दुसरीकडे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही प्रकल्पाविरोधात भूमिका घेतली असून, 28 ऑक्टोबर रोजी कर्जत येथे त्यांची जाहीर सभा होणार आहे. त्यामुळे या प्रकल्पावरून राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टोरंट पंप स्टोरेज प्रकल्पाविषयी सरकारची भूमिका पुन्हा स्पष्ट केली आहे. प्रकल्पाची संपूर्ण माहिती न घेता आणि त्याचा सखोल अभ्यास न करता विरोध केला जात असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. भविष्यातील ऊर्जेची वाढती गरज पूर्ण करण्यासाठी पंप स्टोरेज प्रकल्प महत्त्वाचे असल्याचं सांगतानाच, ऊर्जा क्षेत्रातील गरजा आणि पर्यावरणाशी संबंधित बाबी लक्षात घेणं आवश्यक असल्याचंही त्यांनी नमूद केलं. त्यामुळे एका बाजूला वृक्षतोडीवरून विरोधक आक्रमक झाले असताना, दुसरीकडे सरकारने प्रकल्पाच्या महत्त्वावर भर दिला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जतमधील टोरंट पंप स्टोरेज प्रकल्पाचं समर्थन करत हा प्रकल्प पर्यावरणपूरक असल्याचा दावा केला. सौर आणि पवन ऊर्जेची निर्मिती होत असली तरी ती 24 तास उपलब्ध नसते. त्यामुळे ग्रीडवर परिणाम होतो. अशा वेळी 24 तास स्वच्छ ऊर्जा उपलब्ध करून देण्यासाठी पंप स्टोरेज तंत्रज्ञानाचा उपयोग होतो. या प्रकल्पातून 3 हजार मेगावॅट वीज तयार होणार असून, एवढी वीज कोळशापासून निर्माण करायची झाल्यास 28 कोटी झाडांची गरज भासेल, असं फडणवीस यांनी सांगितलं.
या प्रकल्पासाठी 90 हजार झाडं लावण्यात येणार असून, प्रकल्पासाठी दिल्या जाणाऱ्या जागेच्या दुप्पट क्षेत्र वनविभागाला देण्यात येईल, अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली. पंप स्टोरेज प्रकल्पाची कार्यकाळमर्यादा 80 वर्षे असून, यासाठीचं तंत्रज्ञान पूर्णपणे भारतात विकसित होणार असल्याचं त्यांनी नमूद केलं. सध्या काही प्रमाणात पर्यावरणाचं नुकसान होत असलं तरी या प्रकल्पामुळे भविष्यात त्याच्या कितीतरी पटीने मोठं नुकसान टाळता येईल, असा दावा त्यांनी केला.
टोरंट प्रकल्पाला होत असलेल्या विरोधावर बोलताना फडणवीस यांनी विरोधक पुरेसा अभ्यास न करताच आरोप करत असल्याची टीका केली. पर्यावरणपूरक प्रकल्पालाच विरोध करण्याची भूमिका घेतली जात असून, योग्य अभ्यास केल्यास या विरोधामागील राजकीय हेतू स्पष्ट होईल, असं ते म्हणाले. मात्र, काही लोकांच्या आक्षेपांचा सरकार विचार करेल, असं सांगतानाच यापेक्षा चांगलं तंत्रज्ञान उपलब्ध असल्यास विरोधकांनी ते सुचवावं, असं आव्हानही त्यांनी दिलं.
कर्जतमधील प्रकल्प मराठवाडा किंवा विदर्भात हलवण्याच्या मागणीवरही फडणवीस यांनी भूमिका स्पष्ट केली. पंप स्टोरेज प्रकल्प उभारण्यासाठी विशिष्ट भौगोलिक परिस्थिती आवश्यक असल्याने तो कुठेही उभारता येत नाही, असं त्यांनी सांगितलं. कर्जतमधील जागा या प्रकल्पासाठी योग्य असल्याचा दावा करत त्यांनी या प्रकल्पाला ग्रीन प्रकल्प म्हटलं. याआधी आरेमधील वृक्षतोडीलाही असाच विरोध झाला होता; मात्र सर्वोच्च न्यायालयाने त्यावेळी वस्तुस्थिती स्पष्ट करून विरोधकांना सुनावल्याचं फडणवीस म्हणाले.