पान मसाला जाहिरातींवर FDA चा बडगा; अजय देवगण, शाहरुख खान आणि टायगर श्रॉफ यांना नोटीस
संबंधित जाहिरातींमध्ये प्रचार करण्यात आलेले उत्पादन प्रत्यक्षात पान मसाला ब्रँडशी जोडले गेले असल्याचा FDA चा दावा आहे.
FDA cracks down on pan masala advertisements : अन्न व औषध प्रशासनाने पान मसाल्याच्या कथित सरोगेट जाहिरातीप्रकरणी अभिनेता अजय देवगण, शाहरुख खान आणि टायगर श्रॉफ यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. संबंधित जाहिरातीत दाखवण्यात आलेल्या उत्पादनाचा ब्रँड पान मसाल्याशी जोडला जात असल्याने ही जाहिरात अप्रत्यक्ष स्वरूपातील सरोगेट जाहिरात असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत असल्याचे FDA ने स्पष्ट केले आहे. या नोटीसमुळे मनोरंजन क्षेत्रासह जाहिरात क्षेत्रातही मोठी चर्चा सुरू झाली आहे.
राज्याचे अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर भेसळयुक्त अन्नपदार्थ, आरोग्यासाठी घातक उत्पादने आणि अस्वच्छ आस्थापनांविरोधात व्यापक मोहीम सुरू केली आहे. राज्यभरातील हॉटेल्स, डेअरी, बेकरी, दुकाने आणि खाद्यपदार्थ उत्पादकांवर सातत्याने धाडसत्र राबवले जात असून अनेक ठिकाणी नियमभंग आढळल्याने परवाने निलंबित करण्यात आले आहेत. FDA च्या या आक्रमक कारवाईमुळे अनेक मोठ्या ब्रँड्स आणि नामांकित आस्थापनांनाही कारवाईचा सामना करावा लागला आहे.
तुकाराम मुंढे यांचा सेलिब्रिटी जाहिरातींकडे मोर्चा
याच मोहिमेचा पुढचा टप्पा म्हणून आता FDA ने बॉलीवूड सेलिब्रिटींकडे मोर्चा वळवला आहे. अजय देवगण यांच्या जुहू येथील निवासस्थानी, शाहरुख खान यांच्या वांद्रे येथील ‘मन्नत’ निवासस्थानी तर टायगर श्रॉफ यांना त्यांच्या प्रॉडक्शन हाऊसमार्फत नोटीस पाठवण्यात आली आहे. संबंधित जाहिरातींमध्ये प्रचार करण्यात आलेले उत्पादन प्रत्यक्षात पान मसाला ब्रँडशी जोडले गेले असल्याचा FDA चा दावा आहे.
मनोज जरांगेंनी रुग्णालयातूनच घेतला मोठा निर्णय; उद्या अंतरवाली सराटीत मराठा अभ्यासकांची बैठक
FDA च्या प्राथमिक तपासात संबंधित उत्पादनाचे नाव, ब्रँड ओळख, लोगो, रंगसंगती आणि प्रचाराची पद्धत यांचा संबंध पान मसाल्याच्या उत्पादनांशी असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे ग्राहकांची दिशाभूल होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे अधिकाऱ्यांचे मत आहे. विशेषतः युवक आणि अल्पवयीनांवर अशा जाहिरातींचा प्रभाव पडू शकतो, अशीही चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
महाराष्ट्रात पान मसाल्यावर बंदी
13 जुलै 2026 रोजी राज्य सरकारने महाराष्ट्रात पान मसाल्याचे उत्पादन, साठवणूक, वाहतूक, वितरण आणि विक्रीवर एका वर्षासाठी बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता. राज्यातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आल्याचे सरकारने स्पष्ट केले होते. पान मसाला आणि तंबाखूजन्य पदार्थांमुळे कर्करोगासह अनेक गंभीर आजारांचा धोका वाढत असल्याचे आरोग्य तज्ज्ञ सातत्याने सांगत आले आहेत. या बंदीनंतरही विविध माध्यमांतून संबंधित ब्रँड्सची अप्रत्यक्ष जाहिरात सुरू असल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे प्राप्त झाल्या होत्या. त्यानंतर FDA ने या जाहिरातींची तपासणी सुरू केली आणि त्यातूनच संबंधित अभिनेत्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
FDA ने नोटीसमध्ये अजय देवगण, शाहरुख खान आणि टायगर श्रॉफ यांना विमल पान मसाला/इलायचीच्या जाहिरातीतील सहभाग तात्काळ थांबवण्याचे, तसेच संबंधित जाहिरातीचे सर्व साहित्य सोशल मीडिया व डिजिटल प्लॅटफॉर्मवरून हटवण्याचे निर्देश दिले आहेत. याशिवाय जाहिरातीसंदर्भातील करार, आर्थिक व्यवहार, उत्पादनाची कायदेशीर पडताळणी आणि विमल इलायची हे स्वतंत्र उत्पादन असल्याचे पुरावे सादर करण्यास सांगितले आहे. नोटीस मिळाल्यापासून 15 दिवसांच्या आत लेखी उत्तर देणे बंधनकारक असून, समाधानकारक स्पष्टीकरण न दिल्यास अन्न सुरक्षा कायद्यानुसार पुढील कारवाईचा इशाराही FDA ने दिला आहे.
ODI World Cup 2027 ‘या’ दिवसापासून सुरु होणार, 50 दिवस चालणार स्पर्धा; जाणून घ्या सर्वकाही
FDA ची कारवाई आणखी तीव्र होणार
दरम्यान, FDA कडून तंबाखू आणि निकोटीनयुक्त गुटखा-पान मसाल्याविरोधातील कारवाई आणखी तीव्र करण्यात आली आहे. प्रतिबंधित उत्पादनांच्या पुरवठा साखळीवर आळा घालण्यासाठी पोलिसांच्या मदतीने संघटित गुन्हेगारीविरोधी कायद्यांतर्गत कारवाई करण्याची तयारी सुरू आहे. राज्यभरात उत्पादन, साठवणूक आणि वितरण करणाऱ्या मोठ्या नेटवर्कचा शोध घेण्यासाठी विशेष पथके कार्यरत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. याशिवाय राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये अचानक छापेमारी, गोदामांची तपासणी आणि संशयित पुरवठादारांवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. तंबाखूजन्य पदार्थांच्या अवैध व्यापाराविरोधात शून्य सहनशीलतेचे धोरण राबवले जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.