ऑनलाईन गेमचा नाद अन् तीन सख्या बहिणींची आत्महत्या; कारण ठरलेला कोरियन गेम नक्की काय?

एका कुटुंबातील तीन सख्ख्या बहिणींनी एकत्रितपणे 9व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. या तिन्ही बहिणी अल्पवयीन होत्या.

Images (96)

Ghaziabad 3 Sisters Death What Is Korean Online Game : उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये  एकाच कुटुंबातील तीन तरुण बहिणींनी आत्महत्या केल्याची बातमी समोर आल्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. या घटनेचा संबंध एका तथाकथित “कोरियन गेम”शी असल्याचे प्राथमिक तपासात समोर आल्यामुळे पालक, समाज आणि प्रशासन यांच्यात चिंतेचं वातावरण निर्माण झाले आहे. ही घटना केवळ एका कुटुंबापुरती मर्यादित नसून, आजच्या डिजिटल युगात तरुणांचे मानसिक आरोग्य, ऑनलाइन गेमिंगचा प्रभाव आणि पालक- मुलांमधील संवाद या सगळ्या मुद्द्यांवर गंभीर विचार करण्यास भाग पाडणारी आहे.

नेमकं घडलं काय?

उत्तर प्रदेशातील गाजियाबाद जिल्ह्यातील टीला मोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भारत सिटी सोसायटीत मध्यरात्री घडलेल्या धक्कादायक घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. एका कुटुंबातील तीन सख्ख्या बहिणींनी एकत्रितपणे 9व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. या तिन्ही बहिणी अल्पवयीन होत्या. प्राथमिक तपासात कोणतीही झटपट  झाल्याचे चिन्ह नाहीत दिसले. त्यामुळे पोलिसांनी आत्महत्येचा संशय व्यक्त केला. पुढील तपासात बहिणींच्या मोबाईल फोन, डायरी, सोशल मीडिया अ‍ॅक्टिव्हिटी आणि ऑनलाइन सवयींची चौकशी सुरू करण्यात आली.

कोण होत्या त्या तीन बहिणी?

  • निशिका (16 वर्षे)

  • प्राची (14 वर्षे)

  • पाखी (12 वर्षे)

या तिघी आपल्या पालकांसह भारत सिटी सोसायटीतील बी-1 टॉवरमधील फ्लॅट क्रमांक 907 मध्ये राहत होते. ही घटना रात्री सुमारे 2 वाजण्याच्या सुमारास घडली.

पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, तीनही बहिणींनी हातात हात घालून, बाल्कनीत स्टूल लावून, एकत्रितपणे 9व्या मजल्यावरून उडी मारली. खाली पडताच तिघींचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि आपात्कालीन पथक घटनास्थळी पोहोचले. मृतदेह पोस्टमार्टमसाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.

मोबाइल गेमिंगची सवय… आत्महत्येचं कारण?

तीनही बहिणींना ऑनलाइन मोबाइल गेम्सचे प्रचंड व्यसन लागले होते. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, त्या कोरियन टास्क-बेस्ड लव्हर गेम खेळत असत. परिस्थिती इतकी गंभीर झाली होती की, सकाळी उडल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत जेवण असो, शाळेत जाणे असो सगळ्या गोष्टी त्या सोबतच करत. गेमिंगच्या आहारी गेल्यामुळे पालकांकडून त्यांना वारंवार समज दिली जात होती.

सुसाइड नोटमध्ये काय लिहिलं आहे?

पोलिसांना घटनास्थळी सुसाइड नोट मिळाली आहे. त्यात लिहिलं आहे की, “मम्मी-पापा सॉरी… ज्या गेमपासून तुम्ही आम्हाला दूर ठेवत होतात, त्यावर आम्ही किती प्रेम करतो हे आता तुम्हाला कळेल.” या नोटमुळे प्राथमिक तपासात असं दिसून येतंय की, पालकांची गेमिंगबाबतची नाराजी आणि दिलेली समज यामुळे भावनिक ताण वाढून हा टोकाचा निर्णय घेतला गेला असावा. मात्र, यामागे इतर कोणतं कारण आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत.

हा गेम नक्की काय आहे?

गाजियाबादमध्ये तीन सख्या अल्पवयीन बहिणींनी 9व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याच्या घटनेनंतर “हा गेम नक्की काय होता?” हा प्रश्न समोर येतोय. पोलिसांच्या प्राथमिक तपासात आणि कुटुंबीयांच्या जबाबातून समोर आलेल्या माहितीनुसार, तिन्ही बहिणींना एका ऑनलाइन ‘टास्क-बेस्ड कोरियन लव्हर गेम’चे व्यसन लागले होते. हा कोणत्याही अधिकृत गेम कंपनीचा लोकप्रिय टायटल नसून, सोशल मीडिया आणि मेसेजिंग अ‍ॅप्सच्या माध्यमातून तरुण-तरुणींना जोडणाऱ्या, भावनिक गुंतवणूक वाढवणाऱ्या टास्क-आधारित ऑनलाइन प्लॅटफॉर्मचा प्रकार असल्याची माहिती पुढे आली आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, अशा प्रकारच्या गेम्समध्ये सुरुवातीला मैत्री किंवा ‘लव्ह कनेक्शन’च्या नावाखाली संवाद सुरू केला जातो. पुढे रोजचे टास्क दिले जातात, वेळेवर चॅट करणे, विशिष्ट वेळी ऑनलाइन राहणे, फोटो किंवा स्टेटस शेअर करणे, एकमेकांना रिपोर्ट करणे अशा गोष्टींचा यात समावेश असतो. हळूहळू खेळाडू भावनिकदृष्ट्या या व्हर्च्युअल नात्यात गुंतत जातो. काही प्लॅटफॉर्मवर ‘लेव्हल’, ‘स्ट्रीक’, ‘कमिटमेंट स्कोअर’ अशा संकल्पना देऊन सहभाग वाढवला जातो. या प्रक्रियेतून बाहेर पडणे अवघड व्हावे, असा डिझाइन पॅटर्न असल्याचा दावा सायबर तज्ज्ञ करतात.

पोलिसांना मिळालेल्या सुसाइड नोटमध्ये ‘आम्ही या गेमवर किती प्रेम करत होतो’ असा उल्लेख आढळल्याने, तिन्ही बहिणी या ऑनलाइन टास्क-बेस्ड गेममध्ये भावनिकदृष्ट्या गुंतल्या होत्या, हे स्पष्ट होते. सायबर तज्ज्ञांच्या मते, अशा टास्क-बेस्ड ‘लव्हर गेम’ प्रकारात थेट हिंसक चॅलेंज नसले तरी सततच्या टास्कमुळे स्क्रीन-टाईम वाढतो, झोपेच्या वेळा बदलतात आणि वास्तव जीवनापेक्षा व्हर्च्युअल नात्यांना प्राधान्य दिले जाते. अल्पवयीन मुलांमध्ये भावनिक समतोल विकसित होत असताना अशा प्लॅटफॉर्मवर निर्माण होणारी अवलंबित्वाची सवय मानसिक आरोग्यावर परिणाम करू शकते. त्यामुळे ‘गेम’ म्हणून ओळख दिली जात असली तरी हे अनेकदा चॅट-आधारित सोशल प्लॅटफॉर्म किंवा टास्क-चॅलेंज नेटवर्क असते, ज्यावर कोणतीही ठोस वय-तपासणी किंवा कंटेंट मॉडरेशन नसते.

या प्रकरणात नेमका कोणता अ‍ॅप किंवा प्लॅटफॉर्म वापरला जात होता, हे पोलिस तपासानंतरच स्पष्ट होणार आहे. मात्र या घटनेमुळे पालक, शाळा आणि समाजाने मुलांच्या डिजिटल सवयींकडे अधिक संवेदनशीलतेने पाहण्याची गरज अधोरेखित झाली आहे.

follow us