फडणवीस-शिंदेंच्या श्रेयवादात मराठा आरक्षण रखडलं; जरांगे पाटलांनी मोठा इशारा देत उपचार केले बंद

दोन दिवसांपूर्वी अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणाच्या अभ्यासकांसोबत सरकारच्या शिष्टमंडळाची तब्बल 3 तास चर्चा झाली होती.

  • ganesh pokale
  • Written By: Published:
News Photo   2026 09 05T155707.844

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी (Reservation) अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आमरण उपोषणाचा आज 8वा दिवस आहे. सरकारकडून अद्याप ठोस निर्णय न झाल्याने जरांगे पाटील यांनी पुन्हा आक्रमक भूमिका घेतली असून पाणी आणि औषधोपचार घेणं बंद केलं आहे. दोन दिवसांपूर्वी सरकारच्या शिष्टमंडळाने दिलेल्या आश्वासनानंतर त्यांनी पाणी, औषधं आणि सलाईन घेण्यास सुरुवात केली होती. मात्र, दिलेला शब्द सरकारने पाळला नसल्याचा आरोप करत त्यांनी पुन्हा उपचार नाकारले आहेत.

दोन दिवसांपूर्वी अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणाच्या अभ्यासकांसोबत सरकारच्या शिष्टमंडळाची तब्बल 3 तास चर्चा झाली होती. त्यानंतर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, उदय सामंत आणि आमदार प्रसाद लाड यांनी जरांगे पाटील यांची भेट घेतली. या भेटीपूर्वीही सरपंचांच्या मळ्यात अभ्यासकांसोबत 5 ते 6 तास चर्चा झाली होती. सरकार मराठा समाजाच्या मागण्यांवर सकारात्मक प्रयत्न करत असल्याचं आश्वासन मिळाल्यानंतर जरांगे यांनी पाणी आणि औषधोपचार स्वीकारले होते. मात्र, आश्वासनानंतरही निर्णय न झाल्याने त्यांनी पुन्हा सरकारविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे.

विखेंच्या सवालावर जरांगेंचं प्रत्युत्तर

दरम्यान, मंत्री विखे पाटील यांनी शरद पवार आणि महाविकास आघाडीने मराठा आरक्षणासाठी काय केलं, असा सवाल केल्याचा उल्लेख करत जरांगे पाटील यांनी सरकारवरच निशाणा साधला. फडणवीस आणि भाजप सरकारने तरी काय केलं, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. मराठा समाजाने भाजपला भरघोस मतदान करून सत्तेत पाठवलं असून मराठ्यांचं भलं व्हावं, यासाठीच सत्ता दिली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीने काय केलं आणि शरद पवारांनी काय केलं, असा सवाल आम्हालाच विचारण्याची वेळ सरकारवर का आली, असा पलटवार जरांगे यांनी केला.

मराठ्यांना आरक्षणाचं प्रमाणपत्र देऊन तेच प्रमाणपत्र रद्द करण्याचं काम सरकारने केल्याचा आरोपही जरांगे यांनी केला. सरकारने मराठ्यांना आरक्षण दिलं आणि नंतर त्याच निर्णयावरून माघार घेतली, हे आता समाजाच्या लक्षात येत असल्याचं त्यांनी म्हटलं. सातारा आणि कोल्हापूर गॅझेटच्या आधारे मराठा समाजाला प्रमाणपत्र देण्याच्या मागणीवर अद्याप शासन निर्णय झालेला नाही, असा दावाही त्यांनी केला. सरकारने दिलेल्या आश्वासनांची अंमलबजावणी करण्याची मागणी करत त्यांनी तातडीने निर्णय घेण्याचा आग्रह धरला आहे.

…तर परिणाम भोगावे लागतील

आपलं आंदोलन लोकशाही आणि शांततेच्या मार्गाने सुरू असल्याचं सांगत जरांगे पाटील यांनी सरकारला गंभीर इशारा दिला आहे. आंदोलन दडपण्याचा किंवा आंदोलकांवर कारवाई करण्याचा प्रयत्न केल्यास मराठा समाजाची ताकद दाखवू, असा आक्रमक पवित्रा त्यांनी घेतला. मागील आंदोलनाप्रमाणे यावेळी मराठा तरुणांवर काठी चालवण्याचा प्रयत्न करू नका, असा इशाराही त्यांनी दिला. दरम्यान, सरकारच्या शब्दावर विश्वास ठेवून आपण पाणी, औषधं आणि सलाईन घेतलं होतं, मात्र विखे पाटील यांनी दिलेला शब्द पाळला नाही, असा आरोप करत रात्री 11 वाजल्यापासून पुन्हा पाणी आणि औषधोपचार बंद केल्याचं जरांगे यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे आंदोलनाच्या 8व्या दिवशी सरकारवरील दबाव वाढला असून पुढील निर्णयाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

follow us