अक्कलदाढ म्हातारपणात पडली! जरांगेंची भुजबळांवर बोचरी टीका, राजकीय भूमिकेवरूनही घेरलं

छगन भुजबळ यांच्यावर टीका करताना जरांगे पाटील यांनी त्यांच्या राजकीय भूमिकांवरही भाष्य केलं.

  • ganesh pokale
  • Written By: Published:
News Photo   2026 09 04T160520.631

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील (Jarange) यांचं उपोषण सातव्या दिवशीही सुरू आहे. उपोषणाच्या सुरुवातीचे 5 दिवस त्यांनी पाणी न पिता आंदोलन केलं. त्यानंतर भाजप नेते प्रसाद लाड यांनी आंतरवाली सराटी येथे जाऊन जरांगे पाटील यांची भेट घेतली. सरकार त्यांच्या सर्व अटी मान्य करण्यास तयार असल्याचं आश्वासन लाड यांनी दिल्यानंतर जरांगे यांनी पाणी घेतलं, मात्र आंदोलन मागं घेण्यास नकार दिला आहे. हैदराबाद गॅझेटनुसार कुणबी प्रमाणपत्र वाटप सुरू झाल्यानंतरच पुढील निर्णय घेऊ, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.

दरम्यान, प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना जरांगे पाटील यांनी ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्यावर जोरदार निशाणा साधला. भुजबळ हे सत्तेच्या बाजूने जात असल्याचा आरोप करत आता त्यांच्या वक्तव्याला फारसं महत्त्व देण्याची गरज नसल्याचं जरांगे म्हणाले. ओबीसी समाज आता जागरूक झाला असून कोण कोणाचा राजकीय वापर करतं, हे त्यांना समजतं, असा दावाही त्यांनी केला.

ओबीसींच्या पाठिंब्याची जाणीव ठेवा! छगन भुजबळ मैदानात, आरक्षणाच्या मुद्द्यावरून सरकारला थेट सुनावलं

छगन भुजबळ यांच्यावर टीका करताना जरांगे पाटील यांनी त्यांच्या राजकीय भूमिकांवरही भाष्य केलं. कधी महाविकास आघाडी तर कधी महायुती, अशा वेगवेगळ्या राजकीय आघाड्यांसोबत भुजबळ राहिल्याचा उल्लेख करत त्यांनी भुजबळांवर उपरोधिक टीका केली. ‘उतरती कळा लागली की असंच होतं’, अशा शब्दांत जरांगे यांनी भुजबळांना लक्ष्य केलं. ओबीसींच्या नावावर राजकारण करून समाजाची दिशाभूल करू नये, असा इशाराही त्यांनी दिला.

दरम्यान, जरांगे पाटील यांच्या उपोषणामुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा केंद्रस्थानी आला आहे. सरकारकडून आश्वासन मिळाल्यानंतर त्यांनी पाणी घेण्यास सुरुवात केली असली तरी उपोषण मागे घेतलेलं नाही. हैदराबाद गॅझेटच्या आधारे कुणबी प्रमाणपत्र वाटपाची प्रत्यक्ष सुरुवात झाल्यानंतरच आंदोलनाबाबत निर्णय घेण्याची भूमिका जरांगे यांनी कायम ठेवली आहे. त्यामुळे सरकारच्या पुढील भूमिकेकडे आता मराठा समाजासह राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.

follow us