एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करा! रवींद्र धंगेकरांची मोठी मागणी, महायुतीत भाजप-शिवसेनेत जुंपली

शिवसेनेने विधानपरिषद निवडणुकीत लपूनछपून नव्हे, उघडपणे पाठिंबा दिला होता, असं म्हणत धंगेकर यांनी मित्रपक्षांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले.

  • Vishal Aarde
  • Written By: Published:
Untitled Design   2026 10 29T145030.864

Make Eknath Shinde the CM again, demands Ravindra Dhangekar : शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतील निकालानंतर महायुतीतील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. भाजपने शिवसेनेवर अपेक्षित सहकार्य न केल्याचा आरोप केला असताना, शिवसेना शिंदे गटाचे नेते रवींद्र धंगेकर यांनी एकनाथ शिंदे यांना पुन्हा नेतृत्वाची संधी देण्याची मागणी केली आहे. त्यामुळे महायुतीतील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.

शिवसेनेने विधानपरिषद निवडणुकीत लपूनछपून नव्हे, तर उघडपणे पाठिंबा दिला होता, असं म्हणत धंगेकर यांनी मित्रपक्षांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले. तुम्ही मैत्रीला आणि समन्वय साधायला कमी पडत आहात का? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला. ही चर्चा केवळ एका व्यक्तीची नसून महायुतीतील समन्वयशी संबंधित असल्याचं त्यांनी म्हटलं. निवडणुकीच्या निकालावर प्रतिक्रिया देताना रवींद्र धंगेकर यांनी हा लोकशाहीचा विजय असल्याचं म्हटलं. लोकशाहीमध्ये जनतेचा कौल स्वीकारावा लागतो आणि सरकारच्या कामावर मतदान होतं असतं, असं त्यांनी सांगितलं.

पदवीधर आणि शिक्षकांचा सरकारशी थेट संबंध येत असतो. त्यामुळे शिक्षकांनी सरकारविरोधी मतदान केलं असेल, तर ते नाराज असल्याचं संकेत मिळतात, अशी भूमिका धंगेकर यांनी मांडली. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना भाजपची सत्ता आली होती, असा संदर्भ देत त्यांनी शिंदे यांना पुन्हा नेतृत्वाची संधी देण्याची मागणी केली. धंगेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी फोन करून आपलं अभिनंदन केल्याचाही उल्लेख केला. सगळे आपले मित्र आहेत, असं म्हणत त्यांनी राजकीय संबंधांबाबत सकारात्मक भूमिका मांडली.

ब्रेकिंग! जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकांना सर्वोच्च न्यायालयाचा हिरवा कंदील…

दुसरीकडे, शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकीत महायुतीला अपेक्षित यश न मिळाल्यानंतर भाजपने शिवसेनेच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. पुण्यात शिवसेनेने सचिन सानप यांना पाठिंबा दिला, तर छत्रपती संभाजीनगरमध्ये अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात प्रचार केल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे.

भाजपच्या मते, मित्रपक्षांनी महायुतीचा धर्म पाळून एकमेकांना सहकार्य केलं असतं, तर निकाल वेगळा लागला असता. एका जागेसाठी मित्रपक्षांचं नुकसान करणं महायुतीच्या हिताचं नसल्याची टीकाही भाजपने केली आहे. भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी सोशल मीडियावरील पोस्टमधून शिवसेनेवर निशाणा साधला. पुणे आणि नागपूरमधील शिक्षक व पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकीत शिवसेनेकडून अपेक्षित सहकार्य मिळालं नसल्याचं त्यांनी म्हटलं.

पुण्यात ऐनवेळी सचिन सानप यांना पाठिंबा दिल्यामुळे महायुतीच्या एकजुटीला धक्का बसल्याचा आरोप बन यांनी केला. तसेच, शिवसेनेला मिळालेली मतं भाजपच्या उमेदवारांना मिळाली नसल्याचंही त्यांनी नमूद केलं. छत्रपती संभाजीनगरमध्ये अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात प्रचार केल्याचा उल्लेख करत त्यांनी याचाही फटका महायुतीला बसल्याचं म्हटलं. शिवसेनेने भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसला सहकार्य केलं असतं, तर पाचही जागांवर महायुतीचा विजय झाला असता, असा दावा बन यांनी केला.

रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी! रात्री 11 ते पहाटे 5 पर्यंत मोबाइल-लॅपटॉप चार्जिंग बंद, रेल्वे बोर्डाचे कडक निर्देश

निवडणुकीच्या निकालानंतर भाजप आणि शिवसेनेतील आरोप-प्रत्यारोपांमुळे महायुतीतील समन्वयाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. एका बाजूला भाजपकडून मित्रपक्षाच्या भूमिकेवर टीका केली जात आहे, तर दुसरीकडे रवींद्र धंगेकर यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाला पुन्हा संधी देण्याची मागणी केली आहे. आता या आरोपांवर शिवसेना आणि भाजपचे वरिष्ठ नेते काय भूमिका घेतात, तसेच महायुतीतील मतभेद दूर करण्यासाठी कोणती पावलं उचलली जातात, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.

follow us