मुंबईत जाऊन मरेन, पण फुटणार नाही; मनोज जरांगेंचा संताप, सरकारवर आरोपांची सरबत्ती

काहीही करा, आंदोलन थांबणार नाही. मुंबईत जाऊन मरेन, पण फुटणार नाही, अशा शब्दांत जरांगे यांनी सरकारला इशारा दिला.

  • Vishal Aarde
  • Written By: Published:
Untitled Design   2026 09 13T124713.870

Manoj Jarange’s direct warning to the government : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेत मुंबईतील आंदोलनावर ठाम असल्याचे स्पष्ट केले आहे. काहीही करा, आंदोलन थांबणार नाही. मुंबईत जाऊन मरेन, पण फुटणार नाही, अशा शब्दांत जरांगे यांनी सरकारला इशारा दिला. लोकशाही मार्गाने मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण करणार असल्याचे सांगत, नोटिसा काढल्या किंवा अन्य कोणताही दबाव आणला तरी आंदोलनातून माघार घेणार नसल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

यावेळी जरांगे यांनी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावरही जोरदार टीका केली. कितीही वळवळ केली तरी काही परिणाम होणार नाही. आमचे फासेही तुटणारे नाहीत. बावनकुळे तुम्ही सावध राहा. तुमच्या पदाला, पैशाला आणि मैत्रीला लाथ मारतो, अशा शब्दांत त्यांनी संताप व्यक्त केला. चार प्रमाणपत्रे रद्द करण्यात आल्याचा आरोप करत यामागे शिरसाठ आणि बावनकुळे असल्याचा दावाही जरांगे यांनी केला. यासंदर्भात आपण अर्ज केला असून मुंबईत उपोषणाला बसणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मराठा समाजाच्या प्रश्नांवर सरकार गंभीर नसल्याचा आरोपही जरांगे यांनी केला. मराठा समाजाची मुलं देशोधडीला लागली आहेत. गोरगरीब मराठ्यांची सरकारला कदर नाही. सरकारला मराठ्यांचे प्रश्न सोडवायचेच नाहीत, असा आरोप त्यांनी केला. सरकारसोबत चांगले संबंध ठेवून काय होणार, असा सवाल करत यापुढे मराठा समाजाशी चांगले संबंध ठेवण्याला आपले प्राधान्य असल्याचेही त्यांनी नमूद केले.

यंदा वाद नाही, थेट परवानगी! 20 ऑक्टोबरला शिवाजी पार्कवरच होणार ठाकरेंचा दसरा मेळावा

शिवसेनेच्या नेतृत्वावरही जरांगे यांनी निशाणा साधला. शिंदे यांच्या नेत्यांनी मराठा समाजावर अन्याय केल्याचा आरोप त्यांनी केला. तीन वर्षे शिंदेंविषयी चांगलेच बोलत होतो. मात्र आता जो काही त्रास व्हायचा आहे तो होऊ द्या, असे म्हणत त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली.

मुंबईतील आंदोलनाला परवानगी मिळण्याच्या मुद्द्यावरही जरांगे यांनी भूमिका मांडली. गणेशोत्सवाचे कारण पुढे केले जात असल्याच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव गेल्या वर्षीही होता, असे सांगत त्यांनी आंदोलनाच्या निर्णयाचे समर्थन केले. आम्ही लोकशाही मार्गाने आझाद मैदानावर उपोषण करणार आहोत. सरकार संविधान मानत असेल तर आंदोलनाला परवानगी देईल, असेही जरांगे म्हणाले.

सरकारकडून नोटिसा बजावण्यात आल्या तरी आंदोलन थांबणार नसल्याचे जरांगे यांनी ठामपणे सांगितले. मुंबईत जाण्याचा निर्णय कायम असून कोणत्याही परिस्थितीत माघार घेणार नसल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. त्यामुळे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा मुंबईत आंदोलन करण्याच्या जरांगे यांच्या भूमिकेमुळे आगामी काळात राज्यातील राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे आहेत.

follow us