मराठवाडा पदवीधर निवडणुकीत चुरस वाढली, चव्हाण-पाटील यांच्यात अटीतटीची लढत
मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणीत सुरुवातीला आघाडी घेतलेल्या सतीश चव्हाण यांच्यासमोर प्रतापसिंह पाटील यांनी कडवं आव्हान उभं केलंय.
Marathwada Graduate Constituency Election : मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी सुरू असून, निकालाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. ही जागा जिंकण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीकडून जोरदार प्रयत्न करण्यात आले होते. विद्यमान आमदार सतीश चव्हाण पुन्हा निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत, तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार प्रतापसिंह पाटील यांनी त्यांच्यासमोर कडवं आव्हान उभं केलं आहे. सुरुवातीच्या टपाली मतांच्या आकडेवारीवरून दोन्ही उमेदवारांमध्ये चुरशीची लढत होत असल्याचं चित्र दिसत आहे.
सध्या टपाली मतपत्रिकांची मोजणी सुरू असून, एकूण 494 मतपत्रिका वैध ठरल्या आहेत. त्यापैकी 300 मतांची मोजणी पूर्ण झाली आहे. या मतांमध्ये महायुतीचे सतीश चव्हाण यांना 137 मतं मिळाली आहेत, तर महाविकास आघाडीचे प्रतापसिंह पाटील यांच्या पारड्यात 100 मतं पडली आहेत. त्यामुळे सुरुवातीच्या आकडेवारीत चव्हाण यांनी आघाडी घेतली असली, तरी अद्याप संपूर्ण मतमोजणी बाकी असल्याने अंतिम निकालाचं चित्र स्पष्ट झालेलं नाही.
कर्जतच्या टोरंट प्रकल्पावरून संघर्ष पेटला; फडणवीसांनी विरोधकांना सुनावलं
या निवडणुकीत ठाकरे गटाचे उमेदवार दिलीप घुगे आणि अपक्ष उमेदवार तथा सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर रविराज साबळे यांनीही नशीब आजमावलं आहे. आतापर्यंत मोजण्यात आलेल्या टपाली मतांमध्ये दिलीप घुगे यांना 31, तर रविराज साबळे यांना 19 मतं मिळाली आहेत. सध्याच्या आकडेवारीनुसार सतीश चव्हाण हे प्रतापसिंह पाटील यांच्यापेक्षा 37 मतांनी पुढे आहेत. मात्र, हे आकडे केवळ मोजणी झालेल्या टपाली मतांचे असल्याने पुढील फेऱ्यांमध्ये मतांचं गणित बदलण्याची शक्यता कायम आहे.
छत्रपती संभाजीनगरसह संपूर्ण मराठवाड्याच्या राजकारणाच्या दृष्टीने ही निवडणूक महत्त्वाची मानली जात आहे. या मतदारसंघात सतीश चव्हाण यांचा प्रभाव राहिला असला, तरी यंदा प्रतापसिंह पाटील यांनी त्यांच्यासमोर मोठं आव्हान उभं केलं आहे. अपक्ष आणि इतर पक्षांच्या उमेदवारांमुळेही लढतीत चुरस निर्माण झाली आहे. सध्या मिळालेली आघाडी सतीश चव्हाण कायम ठेवणार की प्रतापसिंह पाटील पिछाडी भरून काढत निकालाला कलाटणी देणार, हे पूर्ण मतमोजणी झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.