काशीत मोरारी बापूंना विरोध; धर्माला धंदा बनवू नका, ‘या’ काळात रामकथा योग्य नाही– संतांचा आक्षेप

काशीत मोरारी बापूंना विरोध; धर्माला धंदा बनवू नका, ‘या’ काळात रामकथा योग्य नाही– संतांचा आक्षेप
Morari Bapu Controversy:  सध्या देशभरात चर्चेत असलेला एका धार्मिक वाद – कथावाचक आणि आपल्या शांतीप्रिय स्वभावामुळे वेगळेपण जपणारे मोरारी बापू यांच्या काशीमध्ये सुरू झालेल्या रामकथेचा, आणि त्या अनुषंगाने उठलेला ‘सूतक’ वाद. प्रकरण काय आहे ते आपण समजावून घेणार आहोत, कोण काय म्हणालं? नेमकं वादाचं कारण काय? ते जाणून घेऊया.

प्रसंग आहे उत्तर प्रदेशातील वाराणसीचा. १३ जुलैपासून तिथल्या ‘रुद्राक्ष कन्वेन्शन सेंटर’मध्ये मोरारी बापू यांची ‘रामकथा – मानस सिंदूर’ सुरू झाली. ही कथा ‘ऑपरेशन सिंदूर’ला समर्पित आहे, जे युद्धात देशासाठी प्राण अर्पण करणाऱ्या जवानांच्या कुटुंबियांसाठी आहे. कथा सुरू होण्याआधी बापूंनी काशी विश्वनाथ मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. इथंच वादाला सुरूवात झाली. कारण दोनच दिवस आधी, म्हणजे ११ जुलै रोजी, मोरारी बापू यांच्या पत्नी नर्मदाबेन यांचे निधन झाले होते. हिंदू धर्मशास्त्रानुसार, कुटुंबात मृत्यू झाल्यानंतर काही काळासाठी ‘सूतक’ पाळलं जातं. यामध्ये धार्मिक कार्य, पूजा, प्रवचन, देवदर्शन हे सर्व वर्ज्य मानलं जातं. पण या सर्व परंपरांचा फाटा देत  बापूंनी मंदिरात जात दर्शन घेतलं आणि कथा चालू केली. इथून सुरू झाला एक मोठा वाद – धर्म व श्रद्धा विरुद्ध व्यक्तिस्वातंत्र्य आणि परंपरा.

या घटनेनंतर अनेक वरिष्ठ संत आणि धर्मतज्ज्ञांनी बापूंवर आपला राग व्यक्त केला. अखिल भारतीय संत समितीचे महामंत्री स्वामी जितेन्द्रानंद सरस्वती म्हणाले की, “सूतक असताना कथा वाचन करणे निंदनीय आहे. व्यासपीठ हे कर्मकांडानुसार चाललं पाहिजे. मोरारी बापू यांनी व्यासपीठाचा अपमान केला आहे.” त्यांनी असा आरोप केला की, “बापू धर्मापेक्षा अर्थाची कामना करत आहेत. हे त्यांना शोभणारं नाही.” इतकेच नव्हे, तर त्यांनी पूर्वी बापूंनी “चितेच्या अग्नीसमोर फेरे घेऊन” केलेला विवाहसुद्धा अवैध आणि धर्मनियमांच्या विरोधी असल्याचे सांगितले.

काशीची विद्वत परिषद, आणि विशेषतः काशी हिंदू विद्यापीठाचे ज्योतिष विभागाचे माजी विभागप्रमुख डॉ. विनय पांडे यांनीही हे कृत्य धर्मक्षेत्राच्या नियमांचा अपमान असल्याचं म्हटलं आहे. ते म्हणाले, “सूतक असताना कथा, दर्शन, पूजन यांना परवानगी नाही. धर्मगुरू असलेल्या व्यक्तीकडून असं वर्तन अपेक्षित नाही.” या सगळ्यावर बापूंनी काय स्पष्टीकरण दिलं? ते म्हणाले – “मी वैष्णव आहे. सूतक गृहस्थांसाठी असते, संन्यासी किंवा संतांवर ते लागू होत नाही. माझ्या परंपरेत अशा गोष्टींना तितकं महत्व दिलं जात नाही. मी रामनाम जपतो, कथा सांगतोय – हे माझं कर्तव्य आहे.”

धर्माचार्य मात्र हे मान्य करायला तयार नाहीत. ते म्हणतात “सूतकापासून मुक्त असणाऱ्या परंपरा (उदा. अग्निहोत्री, राजे, ब्रह्मचारी/संन्यासी) यांपैकी बापूंनी कुठलीही मान्यता मिळवलेली नाही. ना ते अग्निहोत्री आहेत, ना त्यांनी संन्यास स्वीकारलेला आहे.” त्यामुळे त्यांच्या कथेला आणि दर्शनाला धर्मशास्त्रात कोणताही आधार नाही. या सर्व प्रकरणाचा परिणाम असा की, काशीमध्ये काही ठिकाणी बापूंविरोधात आंदोलन, निदर्शने झाली. सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया आल्या. कथाकार असूनही ‘परंपरा न पाळणं’ हे बऱ्याच लोकांना खटकलं. त्यांचं मत आहे की, जे व्यासपीठावर बसून धर्म सांगतात, त्यांनीच असे नियम मोडणं म्हणजे समाजाला चुकीचा संदेश देणे होय.

मोरारी बापूंनी यावर प्रतिक्रिया देत म्हटलं की, “जे काही माझ्या कृतीमुळे दुखावले गेले असतील, त्यांनी मला क्षमा करावी.” पण त्यांची एकूणच बाजू समजून घेतली तर ते परंपरागत धर्मसंकेतांपेक्षा आध्यात्मिक स्वातंत्र्य आणि व्यक्तिगत श्रद्धेवर विश्वास ठेवताना दिसत आहेत. म्हणजे नक्की मुद्दा काय? एकीकडे पारंपरिक धर्मशास्त्र आणि नियम आहेत जे शतकानुशतक लागू आहेत. दुसरीकडे बापूंसारखे संत आहेत जे या परंपरांत राहूनही काही गोष्टींपासून ‘बाहेर’ असल्याचे सांगतात. पण प्रश्न असा आहे – जर सर्वसामान्य भक्तांकडून सूतक पाळण्याची अपेक्षा केली जाते, तर कथा सांगणाऱ्या आणि लोकांना धर्म शिकवणाऱ्या व्यक्तीकडून तीच अपेक्षा ठेवली जाणं चुकीचं आहे का?
हिंदू समाजात सध्या यावर मोठी चर्चा सुरु आहे – जे धर्मशास्त्र आणि श्रद्धेच्या अधारावर आधारित आहे.

राम हा विष्णुचा अवतार आहे. विष्णुबाबत- यस्य स्मरणमात्रेण जन्मसंसारबन्धनात्। विमुच्यते नमस्तस्मै विष्णवे प्रभविष्णवे । (केवळ त्याचे स्मरण केल्याने जन्म आणि मृत्युच्या बंधनातून मुक्तता मिळते. मी त्या सर्वव्यापी परम भगवान विष्णूंना आदरपूर्वक वंदन करतो) हे जर खरं असेल तर एका मृत्युच्या सुतकात विष्णुलाच गुंतवणं हे कोणतं अध्यात्म झालं?

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

संबंधित बातम्या