निवडणूक आयोगाविरोधात ठाकरे बंधूंची गर्जना, गर्जना मोर्च्याच्या माध्यमातून आज राज-उद्धव ठाकरे रस्त्यावर
निवडणूक प्रक्रियेतील कथित अनियमितता आणि निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीविरोधात हा मोर्चा काढण्यात येत असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले आहे.
Raj and Uddhav Thackeray’s grand rally in Mumbai : पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात आज मुंबईत ठाकरे बंधूंच्या नेतृत्वाखाली भव्य गर्जना मोर्चा काढण्यात येणार आहे. लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी गर्जना या घोषवाक्यासह आयोजित करण्यात आलेल्या या मोर्चात मनसेप्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना उबाठाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे एकत्र सहभागी होणार आहेत. निवडणूक प्रक्रियेतील कथित अनियमितता आणि निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीविरोधात हा मोर्चा काढण्यात येत असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले आहे. ठाकरे बंधू एकाच व्यासपीठावर येणार असल्याने या मोर्चाकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे विशेष लक्ष लागले आहे. या आंदोलनाच्या निमित्ताने विरोधकांकडून निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता आणि लोकशाही संस्थांच्या विश्वासार्हतेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आणला जाणार आहे.
या मोर्चासाठी राज्यातील विविध विरोधी पक्षांनी पाठिंबा जाहीर केला आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष तसेच विविध डाव्या पक्षांनी या आंदोलनात सहभागी होण्याची भूमिका घेतली आहे. सर्व विरोधी पक्षांचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन ठाकरे बंधूंनी केले आहे. राज्याच्या विविध भागांतून कार्यकर्ते आणि समर्थक मुंबईत दाखल होत असून मोर्चात मोठी गर्दी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
पुण्यातील एमपीएससी सत्याग्रह आंदोलनाला राहुल गांधींचा जाहीर पाठिंबा, विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर सरकारला घेरलं
मोर्चात कोणत्याही राजकीय पक्षाचा झेंडा न आणता केवळ तिरंगा हातात घेऊन सहभागी व्हावे, असे विशेष आवाहन करण्यात आले आहे. सकाळी 10 वाजता मेट्रो सिनेमा येथून मोर्चाला सुरुवात होणार असून तो मुंबई महापालिका मुख्यालयापर्यंत जाणार आहे. मोर्चाच्या समारोपानंतर प्रमुख नेते उपस्थितांना संबोधित करणार असून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची भाषणे काय असतील, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि इतर निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या मोर्चातून कोणते राजकीय संदेश दिले जातात, याकडेही सर्वांचे लक्ष असेल.
दरम्यान, हा मोर्चा कोणत्याही पक्षाच्या राजकीय फायद्यासाठी नसून लोकशाही आणि संविधानाच्या संरक्षणासाठी असल्याचे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. सर्व राजकीय पक्षांना या आंदोलनात सहभागी होण्यासाठी निमंत्रण दिले जाणार असून सत्ताधारी पक्षातील प्रतिनिधींनाही व्यासपीठावर येण्यास हरकत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. गेल्या काही वर्षांतील निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीबाबत जनतेत निर्माण झालेल्या प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर हा मोर्चा आयोजित करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. निवडणूक प्रक्रियेवर जनतेचा विश्वास अधिक दृढ व्हावा आणि आयोगाने उपस्थित प्रश्नांवर स्पष्टीकरण द्यावे, अशी अपेक्षाही मोर्चाच्या आयोजकांनी व्यक्त केली आहे.
पुण्यातील श्री बालाजी विद्यापीठावर प्रशासक मंडळ नियुक्ती; उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार निर्णय
भाजपकडून विरोधक पराभवाचे खापर निवडणूक आयोगावर फोडत असल्याचा आरोप केला जात असताना, त्यावर प्रतिक्रिया देताना राज ठाकरे यांनी मिश्कील शब्दांत टोला लगावला. मराठीत एक म्हण आहे, खाई त्याला खवखवे, असे म्हणत त्यांनी भाजपच्या आरोपांवर एकाच वाक्यात उत्तर दिले. त्यामुळे आजच्या मोर्चात ठाकरे बंधूंची भूमिका, विरोधकांची एकजूट आणि निवडणूक आयोगाविरोधातील आरोप यावरून राजकीय वातावरण आणखी तापण्याची चिन्हे दिसत आहेत.